आज दि.३ एप्रिल च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

इम्रान खान यांच्याविरोधातील
अविश्वास ठराव फेटाळला

पाकिस्तानमध्ये नाट्यमय घडोमोडी घडताना दिसत आहेत. आज पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव फेटाळण्यात आल्यानंतर, देशाला संबोधित करताना पंतप्रधान इम्रान खान यांनी संसद बरखास्त करण्याची राष्ट्रपतींकडे शिफारस केली आहे. माझ्याविरोधात परकीय षडयंत्र रचले जात असल्याचे त्यांनी विरोधकांवर आरोप केला आहे. याचबरोबर देशातील जनतेने आता नव्या निवडणुकीची तयारी करावी, असे देखील इम्रान खान यांनी म्हटले आहे.

पाकिस्तान संसद बरखास्त करा,
इमरान यांची राष्ट्रपतींना सूचना

अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर देशाला संबोधित करताना इम्रान खान म्हणाले की”सगळ्या जनतेसमोर एक देशद्रोह होत होता, देशद्रोही बसलेले होते आणि षडयंत्र रचलं जात होतं. मी त्यांना संदेश देऊ इच्छितो, अल्लाहचं जनतेकडे लक्ष आहे. अशाप्रकारचं षडयंत्र जनता यशस्वी होऊ देणार नाही. सभापतींनी आज आपल्या अधिकारांचा वापर करून जो निर्णय दिला आहे. त्यानंतर मी आताच राष्ट्रपतींना सूचना पाठवली आहे. की सभागृह विसर्जित करा. एका लोकशाही समाजात आपण लोकशाही जनतेकडे जावं, निवडणुका व्हाव्यात जनता निर्णय घेईल.”

१३ दिवसांत ११ वेळा
इंधनची दरवाढ

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ सुरूच आहे. आज (रविवार) देखील हे दर ८० ते ८५ पैशांनी वाढले आहेत. आतापर्यंत १३ दिवसांत ११ वेळा इंधन दरवाढ झाली असुन ८ रुपयांनी दर वाढले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी जारी केलेल्या नव्या दरानुसार दिल्लीत इंधन दर ८० वाढले असून, पेट्रोल १०३.४१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९४.६७ रुपये प्रति लिटर झाले आहे. याचबरोबर मुंबईत ८४ पैशांची वाढ झाली असुन त्यानुसार पेट्रोल ११८.४१ रुपये आणि डिझेल १०२.६४ रुपये प्रति लिटर झाले आहे.

देशासमोर महागाईचा प्रश्‍न
गंभीर : शरद पवार

देशासमोर मुख्य तीन चार प्रश्न आहेत. समाजातील सर्व घटकांना जो त्रास होतो तो महागाईचा आहे. महागाईचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीचा प्रश्न आहे. याआधी किंमती वाढल्या नाहीत असं म्हणत नाही पण रोज अशाप्रकारे वाढत नव्हत्या. मी गाडीतून प्रवास करतो म्हणून मला एकट्याला त्रास होतो असं नाही. ट्रकचं भाडं, भाजीपाला, अन्नधान्याची वाहतुकीचा खर्च वाढतो आणि त्याची किंमत सर्वसामान्यांना सहन करावी लागते. पण सरकार याकडे ढुंकूनही पाहत नाही,” असं शरद पवार म्हणाले.

श्रीलंकेत आणीबाणी जाहीर,
संशयीतांना ताब्यात घेण्याचे आदेश

श्रीलंकेत सुरू असलेल्या निदर्शने थांबवण्यासाठी तेथील सरकारने शनिवारी संध्याकाळी सहापासून सोमवार सकाळी सहापर्यंत संचारबंदी लागू केली आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष राजपक्षे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली. अध्यक्षांनी याद्वारे संशयितांना कुठल्याही खटल्याविना दीर्घकाळासाठी ताब्यात घेण्याचे अधिकार लष्कराला दिले आहेत. राजपक्षे यांना देशाची आर्थिक परिस्थिती हाताळण्यात अपयश आल्याने त्यांनी पद सोडावे, अशी मागणी जोर धरत असून, तशी हिंसक निदर्शने होत आहेत. या पार्श्वभूमीवर ही आणीबाणी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पंतप्रधानांच्या जीवनातील घटना
दाखवणारे मोदी स्टोरी पोर्टल लॉन्च

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनाबद्दल माहित नसलेल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मोदी स्टोरी’ नावाचं एक पोर्टल तयार करण्यात आलंय. यामध्ये मोदींच्या आयुष्याच्या टप्प्यावर त्यांना भेटलेल्या विविध क्षेत्रातील व्यक्तींनी सांगितलेल्या त्यांच्या जीवनातील गोष्टींचा समावेश असेल. ‘मोदी स्टोरी’ हे पोर्टल आज रविवारी लाँच करण्यात आलंय.
मोदी स्टोरी पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार, “मोदी स्टोरी पोर्टलची घोषणा हा एक स्वयंसेवी उपक्रम आहे, मोदींच्या जीवनातील रंजक कथा सांगितल्या जातील.

तुंबलेल्या मोरीतून भाजपाचे
गांडूळ निघाले : किशोरी पेडणेकर

काल राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाची चांगलीच चर्चा सुरू आहे. राज ठाकरे दोन वर्षापासून भाषण केलेलं नाही, मोरीत खूप तुंबलंय. बरंच काही बोलायचंय, असं भाषणाची सुरुवात म्हणाले होते. याच मुद्द्यावरून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी हल्ला चढवला. तुंबलेल्या मोरीतून भाजपाचे गांडूळ निघाले. गगनाला भिडलेल्या महागाईबद्दल त्यांनी एक शब्दही काढला नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांच्याप्रती असलेल्या द्वेषातून राज ठाकरेंनी हा पक्ष स्थापन केला काय?, राज ठाकरेही घडले पण ते असे का बिघडले, हेच कळेना,” असं टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

घाटकोपर मध्ये मनसेच्या शाखेवर
लाऊड स्पीकर लावून हनुमान चालीसा सुरु

मशिदीवर भोंगे वाजत असेल तर त्याच्या समोर तुम्ही भोंगे लावून हनुमान चालिसा लावा, असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. त्याला सुरुवात झाली आहे. घाटकोपरच्या पश्चिमेकडील चांदिवली येथे मनसेच्या शाखेवर लाऊडस्पीकर सुरू करून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे. मनसेचे विभाग अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांच्या नेतृत्वात हे लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे. हनुमान चालिसा संदर्भात राज ठाकरे यांनी कोणतेही नियम लावले नाहीत. फक्त कालच्या भाषणातील राज यांचं आवाहन ऐकूनच हे भोंगे लावून हनुमान चालिसा सुरू करण्यात आली आहे, असं या कार्यकर्त्यांनी म्हटलंय.

महिला विश्वचषकावर ऑस्ट्रेलियाने
विक्रमी सातव्यांदा नाव कोरले

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाने (३ एप्रिल) ख्रिस्टचर्च येथे इंग्लंडला ७१ धावांनी पराभूत करत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकावर विक्रमी सातव्यांदा नाव कोरलं. ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करत ५० षटकात ३५६ धावांचा डोंगर उभा केला. ३५७ धावांच्या लक्षाचा पाठलाग करायला आलेला इंग्लंडचा संघ मात्र ४४ व्या षटकातच तंबुत परतला. इंग्लंडला केवळ २८५ धावा करता आल्या. एलिसा हिलीला सामनावीर, मालिकावीर म्हणून सन्मानित करण्यात आलं.

SD social media
98 50 6035 90

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.