कोरोना महामारीची दुसरी
लाट ओसरण्याचे संकेत
कोरोना महामारीची दुसरी लाट ओसरण्याचे संकेत पहिल्यांदाच मिळत आहेत. गेल्या दोन महिन्यांत मंगळवारी संपूर्ण देशात बाधितांपेक्षा बरे झालेल्या रुग्णांची संख्या अधिक नोंदविण्यात आली आहे. राष्ट्रीय स्तरावरील संसर्गाच्या दरातही घट झाल्याचे दिसत आहे. सर्वाधिक प्रभावित राज्ये दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्रसारख्या राज्यांमध्येही रुग्णसंख्येत घट होत आहे. पण पंजाब, ओडिसा, बंगाल, केरळ आणि कर्नाटकसारख्या दीड डझनहून अधिक राज्यात रुग्णसंख्या वाढत असल्याने केंद्र सरकार चिंतेत आहे.
कोरोना पासून बचावासाठी
उंटावर संशोधन
कोरोनापासून बचावासाठी यूएईमध्ये उंच पाठ असलेल्या उंटांवर संशोधन करण्यात येत आहे. या संशोधनात उंटांना कोरोनाच्या मृत नमुन्यांचे इंजेक्शन दिले जाते. इंजेक्शन दिल्यानंतर त्यांच्यामध्ये काय बदल होत आहेत यावर अगदी बारकाईने लक्ष दिले जात आहे. अँटीबॉडीसाठी त्यांच्या रक्ताचे नमुने घेतले जात आहेत. त्या रक्ताची चाचणी केली जात आहे. उंच पाठ असलेल्या उंटांवर कोरोनाचा काहीच परिणाम झाला नाही, असे सध्याच्या संशोधनातून निष्पन्न होत आहे.
२ ते १८ वर्षे वयोगटासाठी
लशीच्या परीक्षणाची शिफारस
२ ते १८ वर्षे वयाच्या लोकांसाठी भारत बायोटेकच्या कोविड लशीच्या दुसऱ्या – तिसऱ्या टप्प्यासाठी परीक्षण करण्याची शिफारस एका तज्ज्ञांच्या समितीने केली होती. त्याला केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आलेली आहे. भारत बायोटेकची कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्यासाठी क्लिनिकल ट्रायलला मंजुरी देण्यात यावी, अशी शिफारस कोरोनाशी संबंधित सब्जेक्ट एक्सपर्ट कमिटीने (एसईसी) मंगळवारी शिफारस केली. २ ते १० वयोगटातील मुलांवर हे परीक्षण करावे. हे परीक्षण दिल्ली, पाटणा येथील एम्समध्ये नागपूरमध मेडिट्रिना वैद्यकीय विज्ञान संस्थेत केले जाणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोग गट ब,
गट क च्या परीक्षा घेणार
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं राज्य सरकारच्या विविध विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या गट ब आणि गट क च्या पदांसाठी परीक्षांचं आयोजन करण्यास तयारी दर्शवली आहे. महापोर्टल म्हणजेच महापरीक्षा पोर्टलद्वारे घेण्यात येणाऱ्या गट ब आणि गट क, ड च्या परीक्षा एमपीएससीतर्फे घेण्यात याव्यात, अशी मागणी हजारो विद्यार्थी करत होते. विद्यार्थ्यांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं लोकसेवा आयोगाकडे याबाबत पत्राद्वारे विचारणा केली होती. लोकसेवा आयोगानं राज्य सरकारला पत्राद्वारे त्यांची भूमिका कळवली आहे.
राज्यात 12 मे ते 16 मे दरम्यान
पूर्वमोसमी पावसाची शक्यता
यंदा देशात नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे आगमन 1 जून रोजी होणार आहे. तर महाराष्ट्रात मान्सूनचा पाऊस 10 जूनच्या आसपास दाखल होईल. त्यापूर्वी आता राज्यात पूर्वमोसमी पावसाची शक्यता आहे. 12 मे ते 16 मे या पाच दिवसांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पूर्वमोसमी पाऊस बरसण्याची शक्यता आहे. यामध्ये मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.
गोव्यात ऑक्सिजन अभावी
चार तासात 26 रुग्णांचा मृत्यू
गोव्यातील बांबोळी येथील सरकारी रुग्णालयात ऑक्सिजनअभावी बुधवारी पहाटे दोन ते सहा वाजेदरम्यान २६ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. बांबोळीच्या रुग्णालयाला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मंगळवारी भेट देऊन ऑक्सिजनअभावी रुग्णांचा मृत्यू होणार नाही, याची काळजी घेतली जाईल असे जाहीर केले होते. ऑक्सिजन सिलिंडर वेळेत पोहोचत नसल्याची बाब त्यांनी मान्य केली होती. त्यावरून त्यांनी ऑक्सिजन पुरवठादारांना इशाराही दिला होता.
मराठा आरक्षण प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी
घेतली राज्यपालांची भेट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ठाकरे म्हणाले की, मराठा आरक्षणाबद्दल सर्वोच्च न्यायालयानस जो निकाल दिला त्यासंदर्भात राज्यपालांची भेट घेतली. त्या निकालात आरक्षण देण्याचा अधिकार राज्यांना नसून राष्ट्रपतींना आहेत, असं सांगण्यात आलं. आमच्या भावना राज्यपालांना कळवण्यासाठी आम्ही भेट घेतली. आम्ही राज्यपालांना विनंती केली की त्यांनी पंतप्रधान व राष्ट्रपती यांना मराठा आरक्षणाबाबत आग्रह धरावा.
भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समिती
करणार मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा अभ्यास करून त्यासंदर्भात राज्य शासनाला मार्गदर्शन करण्यासाठी तसेच पुढील कार्यवाहीची दिशा ठरविण्यासाठी राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने श्री. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्याचा शासन निर्णय आज जारी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची समीक्षा व विश्लेषण करून त्याबाबतचे समग्र मार्गदर्शन करणे व पुढील दिशा ठरविण्यासाठी मार्गदर्शनात्मक अहवाल तयार करून तो शासनास ३१ मे २०२१ पर्यंत ही समिती देणार आहे.
दोन डोस घेतल्यानंतरही
अभिनेते मोहन जोशी कोरोना बाधित
कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतल्यानंतरही ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना सुद्धा कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ‘अगंबाई सुनबाई’ या मराठी मालिकेचे गोव्यात शुटींग सुरु असताना जोशी यांच्यासह अन्य चार जणही कोरोना बाधित झाले आहेत. त्यात दोन लाइटमन, कला विभागाचा सदस्य आणि वाहन चालक यांचा समावेश आहे. सेटवर कोरोनाचा संसर्ग पसरल्यानंतर संपूर्ण टीम मुंबईत परतली आहे.
पत्रकार, कॅमेरामन यांना
फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करा
राज्यातील प्रसिद्धी आणि दृकश्राव्य माध्यमांतील सर्व पत्रकार, कॅमेरामन यांना तत्काळ फ्रंटलाईन वर्कर्स घोषित करून लसीकरणात त्यांना प्राधान्य देण्याबाबत आज (बुधवार) विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र पाठवून मागणी केली आहे.
काँग्रेस जनतेची दिशाभूल
करत आहे : जे. पी. नड्डा
भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले आहे. या पत्रात म्हटले आहे की, आरोग्य व अन्य क्षेत्रातील कोविड योद्धे आपल्या जीवाची पर्वा न करता अखंडपणे या संकटाचा मुकाबला करीत आहेत. मात्र आपल्या पक्षाची काही जबाबदार मंडळी कोरोना स्थितीबाबत सामान्य जनतेची दिशाभूल ‘होईल अशा पद्धतीची माहिती प्रसारीत करत आहेत. या स्थितीचा राजकीय फायदा उठविण्याच्या हेतूनेच जनतेची दिशाभूल करण्याचे प्रयत्न चालू आहेत, याचा मला मनस्वी खेद वाटतो आहे. आपल्या पक्षाची सत्ता असलेल्या राज्यांचे मुख्यमंत्रीही सहभागी आहेत हे मोठे दुर्दैव आहे हे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते.
देशाच्या राजधानीत कोरोनाच्या
पाचव्या लाटेचा इशारा
देशाच्या राजधानीत कोरोनाच्या पाचव्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, गेल्या अनेक दिवसांपासून राजधानीत कोरोनाची नवीन प्रकरणे समोर येऊ लागली आहेत. यातून असे स्पष्ट होते की, सध्याच्या परिस्थितीतून बाहेर पडण्याच्या दिशेने वाटचाल सुरू असताना नागरिक कोरोना निर्बंध पाळत नाहीत. त्यामुळे संसर्गाची पाचवी लाट येणार असून ही लाट किती प्रभावी असेल याबाबत काहीही सांगण्यास वैज्ञानिकांनी असमर्थता दर्शविली आहे.
अशोक चव्हाण करणार
विधानसभा निकालांची समीक्षा
देशभरात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकींची समीक्षा करण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय समिती स्थापन जाहीर केली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या निर्देशानुसार काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के.सी. वेणुगोपाल यांनी या समितीची घोषणा केली आहे.
मराठा आरक्षणाचा पोपट मेला,
हे राज्यकर्त्यांनी सांगून टाकावे
मराठा आरक्षणाचा पोपट मेला आहे, ही गोष्ट राज्यकर्ते लोकांना सांगत का नाहीत, असा सवाल ब्राह्णण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी उपस्थित केला आहे. सर्वांना सर्व काळ फसवता येणार नाही, याची सर्वच नेत्यांना कल्पना आहे. फक्त लोकांना सांगणार कोण, ही समस्या असल्याचे आनंद दवे यांनी म्हटले.
इस्त्रायलचा गाझा पट्टीत एयरस्ट्राईक
सध्या इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनमध्ये मोठ्या प्रमाणात युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. इस्लामी गट आणि इतर पॅलेस्टाईनमधील अतिरेक्यांनी तेल अवीव आणि बिर्शेबा येथे रॉकेट हल्ले केल्यामुळे इस्रायलने बुधवारी सकाळी गाझावर शेकडो हवाई हल्ले केले आहेत. यामध्ये ३५ पॅलेस्टाइनमधील नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर इस्त्रायलमधील पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याआधी गाझा पट्टीवरील हमास या संघटनेने तेल अविव येथे १३० रॉकेट सोडले होते. प्रतिउत्तरादाखल इस्त्रायलने एयरस्ट्राईक केला आहे.
रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर
गृह विभागाच्या सूचना
संपूर्ण महाराष्ट्रात जमावबंदी आणि संचारबंदी असून कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय किंवा सांस्कृतिक कार्यक्रमासाठी एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुस्लीम धर्मीयांचा पवित्र सण रमजान ईदच्या अनुषंगाने गृह विभागाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. यावर्षी 13 एप्रिलपासून मुस्लीम धर्मियांच्या पवित्र रमजान महिन्याचा प्रारंभ झाला.
SD social media
9850 60 3590