शक्तीमान’ मालिकेमुळे घराघरात पोहोचलेले दिग्गज अभिनेते मुकेश खन्ना यांचं निधन झाल्याच्या खोट्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत. ऑनस्क्रीन शत्रूंचा खात्मा करणाऱ्या शक्तीमानचा कोरोनाने बळी घेतल्याच्या अफवा पसरल्या होत्या. त्यानंतर खुद्द मुकेश खन्ना यांनीच व्हिडीओ शेअर करत टवाळखोरांची तोंड बंद केली.
62 वर्षीय मुकेश खन्ना यांनी फेसबुकवर व्हिडीओ शेअर केला. “तुम्हा सर्वांच्या प्रार्थनांमुळे मी पूर्णपणे स्वस्थ आहे, मी सुरक्षित आहे. मला कोणत्याही रुग्णालयात दाखल केले नव्हते, ना मला कोरोना झाला. अशी दिशाभूल करणारी निराधार, खोटी बातमी कोण पसरवतं, मला माहिती नाही, त्यांचा हेतू काय आहे? हेही समजत नाही. अशा प्रकारे कित्येक जणांच्या भावनांशी खेळले जाते. मानसिकदृष्ट्या आजारी असलेल्या लोकांवर काय उपचार केले पाहिजेत, त्यांच्या दुष्कर्मांबद्दल त्यांना शिक्षा कोण देईल. कायद्यावर खूप भार पडला, आता तर हद्द झाली. अशा फेक न्यूजवर आता बंदी आणली पाहिजे” अशा भावना मुकेश खन्ना यांनी व्यक्त केल्या.
“तुम्ही व्यक्त केलेल्या काळजीबद्दल मनापासून धन्यवाद. मला पुष्कळ फोन येत आहेत आणि म्हणूनच मला माझ्या चाहत्यांना कळवावेसे वाटते की मी अगदी ठणठणीत आहे” असे मुकेश खन्ना यांनी व्हिडीओमध्ये म्हटले. त्यांच्या चाहत्यांनीही देवाचे आभार मानत कमेंटमध्ये मुकेश खन्ना यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
1990 च्या उत्तरार्धात शक्तिमान या शोमुळे मुकेश खन्ना प्रसिद्धीस आले. त्यात त्यांनी भारतातील पहिला वहिला सुपरहिरो शक्तीमानची मुख्य भूमिका साकारली. ते बी. आर. चोप्रा यांच्या पौराणिक महाभारत मालिकेतही दिसले. त्यांनी महाभारतमध्ये भीष्म पितामहची भूमिका केली होती