संसदेत अदानीवर प्रश्न विचारणाऱ्यांचे माईक आपोआप बंद होतात. लोकशाहीतली ही भुताटकी आहे. त्याच भुताटकीवर राहुल गांधी यांनी लंडन येथे सवाल निर्माण केले. लंडन ही लोकशाहीची जननी आहे असे मानले जाते. आपण दीडशे वर्षे इंग्रजांचे गुलाम होतो. त्या गुलामीच्या बेड्या तोडताना मोदी व भाजपा कोठेच नव्हता, असा घणाघात शिवसेनेने ( ठाकरे गट ) केला आहे.
“इंग्रज शेवटी आपण घालवलेच, पण जाता जाता ते ‘लोकशाही’ची भेट देऊन गेले हे विसरता येणार नाही. राहुल गांधी यांनी लोकशाहीवरील खदखद व्यक्त करण्यासाठी लंडनचे व्यासपीठ निवडले ते त्यासाठीच,” असेही शिवसेनेनं ‘सामना’ अग्रलेखातून म्हटलं आहे.
“हिंदुस्थानात लोकशाही उरली आहे का, हाच प्रश्न निर्माण झाला असताना लोकशाहीचा अपमान वगैरे झाला असा कंठशोष करणे हा निव्वळ फार्स आहे. ‘हिंदुस्थानातील लोकशाही धोक्यात आहे. विरोधी पक्षनेते बोलत असताना संसदेतील माईक बंद केले जातात,’ अशी टीका गांधी यांनी केली. त्यामुळे भाजप नेत्यांचे लोकशाहीवरील पुतनामावशीचे प्रेम उतूमातू जाताना दिसत आहे. संसदेच्या पहिल्याच दिवशी भाजप खासदारांनी गदारोळ केला व कामकाज बंद पाडले. पंतप्रधान मोदींना तर लोकशाहीच्या नावाने जणू हुंदकेच फुटत आहेत,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
“जगातील कोणतीही शक्ती हिंदुस्थानच्या लोकशाही परंपरेचे नुकसान करू शकत नाही हे मोदी यांचे म्हणणे खरे आहे, पण हिंदुस्थानातील लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम प्रत्यक्ष सत्ताधारी भाजपा करीत आहे व त्याच भाजपाचे नेतृत्व मोदी करीत आहेत. मुळात राहुल गांधी यांनी लोकशाहीबाबत लंडन येथे केलेली विधाने चूक आहेत काय याचे आत्मचिंतन मोदी पक्षाने करायला हवे,” असा सल्ला शिवसेनेनं दिला आहे.
“हिंदुस्थानात जन्म घेणे हे दुर्भाग्य असल्याचे लोक मानत होते, असे विधान पंतप्रधान मोदी यांनी परदेशात जाऊन केले. तेव्हा देशासाठी रक्त सांडलेल्या सैनिकांच्या आत्म्यास किती वेदना झाल्या असतील? पण मोदी यांना व त्यांच्या बगलबच्च्यांना देश मालकी तत्त्वाने चालवायचा आहे. त्यासाठी मर्जीतल्या एकाच उद्योगपतीला एअर इंडियापासून एलआयसी, बँका, सर्वच सार्वजनिक उपक्रम विकून लोकशाहीच्या पाठीवर शेवटची काडी ठेवण्यात आली आहे,” असं टीकास्र शिवसेनेनं भाजपावर केलं आहे.