शक्तीपीठ आदिशक्ती एकविरा देवी

लोणावळ्याजवळील कार्ल्या लेण्या म्हणजे इ. स. च्या पहिल्या शतकातील शिल्पकला आणि लेणी कलेचा उत्तम नमुना आहेत. प्राचीन लेणी गड-किल्ले भरपूर जलसाठा अशा विविधतेने नटलेल्या मवाळ तालुक्याच्या वैभवात भर टाकणाऱ्या आहेत. या परिसरात एकवीरा देवीचे मंदिर आहे. मंदिराच्या भोवती घनदाट झाडी, पाण्याचे धबधबे सगळीकडे हिरवळ आहे. निसर्गाचे वरदान लाभलेल्या एकविरा आईच्या दर्शनाला हा उंच डोंगर चढून जावे लागते.

नवसाला पावणारी

दूरवर असलेल्या या आईच्या दर्शनासाठी, तिला नवस करण्यासाठी, केलेला नवस फेडण्यासाठी, दूरवरून येणाऱ्या भक्तांना साधारण दोनशे पायर्‍या चढून वर जावे लागते. चढताना बाजूने वाहणारा इंद्रायणीचा प्रवाह, विपुल निसर्गसंपदा मन मोहून घेते. त्यामुळे थकवा जमत नाही. पण देवी दर्शनही सोप नाही. देवीला बेहेरगावची यमाई अंबामाता किंवा परशुराम माता रेणुका असेही म्हणतात. महाराष्ट्रात साडेतीन देवीची शक्तीपीठ आहेत. त्यापैकी यमाई , रेणुका मातेचा अवतार म्हणजे एकवीरादेवी आहे. बेहेरगाव कार्ला गडावरील आई एकविरा देवी आदिशक्ती असून एक जागृत देवस्थान आहे. अशी त्याची ख्याती आहे.

एकवीरेची कोरीव मूर्ती

स्तुपाच्या बाजूला ला घुंगटेवजा मंदिर असून मंदिरात मागील खडकात कोरलेली एक गुहा असून त्यात एकवीरेची मूर्ती कोरलेली आहे. शेंदूर लिम्पित तांदळ्यावर वर देवीचा नाकीडोळी अतिशय रेखीव पितळी मुखवटा बसवलेला आहे. नवरात्राच्या नवमीच्या दिवशी पहाटे तीन वाजता आईला पंचामृता अभिषेक असतो. षोडशोपचारे पूजा झाल्यानंतर देवीला ला नानाविध सुवर्णालंकार, सुगंधी पुष्पे, सुगंधीपुष्प माळांच्या साज शृंगार केलेला असतो. देवीचे मोहक रूप अधिकच खुलून दिसते या मुर्ती दर्शनासाठी भक्त आसुसलेली असतात. कोळी बांधवांचा आराध्यदैवत असलेली एकवीरा देवी इतक्या उंचावर आहे की तिला उंचावरून आपल्या भक्तांवर सहज नजर ठेवता यावी म्हणून तिने आपले स्थान उंचावर ठेवले असावे असा समज आहे. मंदिरातील देवीची मूर्ती अति प्राचीन अतिशय लोभसवाणी आहे. कार्ल्याच्या लेणीमध्ये स्थापित मंदिरावर बुद्धकालीन लेण्यांच्या निर्मितीचा बाज आढळतो. चांद्रसेनीय आणि कोळी समाजाची कुलस्वामिनी. त्यांच्या समाजात देवीला विशेष स्थान आहे. सामान्य पर्यटक किंवा भक्तांच्या मनात तिच्याबद्दल अतूट श्रद्धा आहे. ती स्फूर्ती देवता आहे नवसाला पावणारी देवी म्हणून देवीची वेगळी प्रतिमा भक्तांच्या मनात आहे. तेजस्विनी चेहऱ्यावर सौम्य हास्य अशी मूर्ती स्वयंभू आहे.

दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी

वर्षातून दोनदा येणाऱ्या नवरात्रात देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. चैत्र शुक्ल अष्टमी ते पौर्णिमेपर्यंत असणाऱ्या जत्रेत कार्ल्याच्या डोंगर पायथ्याशी एक गाव आहे त्या गावापर्यंत देवीची भव्य मिरवणूक निघते या मिरवणुकीत भक्त असंख्य संख्येने सहभागी होतात. भक्तांच्या मनोकामना इथे पूर्ण होतात. दर्शनासाठी लाखो भाविक गर्दी करतात. लांबच लांब रांगा इथे असतात. पूजा आरती आणि नैवैद्य घ्यायच्या वेळा ठरलेल्या असतात. गावकऱ्यांच्या दृष्टीने नवरात्रोत्सव म्हणजे दिव्याचा झगमगाट
असतो. जणू त्यांची दिवाळीत असते. एकविरेची एक आख्यायिका अशी आहे की ती श्री रेणूकेचा अवतार आहे. आदितीने तप करून शंकराला प्रसन्न केले. शंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर दिला. या भूतलावर तू इश्वाकू राजाच्या घरी जन्म घेशील. तुझं नाव रेणुका असेल तुला पाच पुत्र असतील. त्यापैकी एक महापराक्रमी असेल, परमवीर असेल. त्याच्या पराक्रमामुळे तू एकविरा या नावाने ओळखली जाशील. अशी ही स्वयंभू तेजस्विनी एकवीरा ची आई म्हणून तिला एकविरा आई असे म्हणतात .जसे जसे भाविक विखुरले तसे श्रद्धा-भावाने अनेक ठिकाणी देवीची मंदिरं बांधली गेली.

लोणावळ्याजवळील कार्ल्याचे मंदिर अद्वितीय आणि वैशिष्ट्यपूर्ण आहे. या सुंदर मंदिराचा उल्लेख पुराणातही आढळतो. या प्राचीन पुरातन मंदिराचा अठराशे सहासष्ट मध्येजिर्णोद्धार झाला. या मंदिरातील घंटा अठराशे सत्तावन्न पासून आहे. आई एकवीरा एकनाथांची कुलस्वामीनी होती. आईच्या प्रेरणेतूनच लोकगीतांमधून एकनाथांनी समाज प्रबोधनास सुरुवात केली. डोंगर माथ्यावरून दूर शेकडो मैलावर असलेल्या आपल्या भक्तांना संकट वेळी आई मदतीला येते असा विश्वास आहे.

सौ. अंजली हांडे, जळगाव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.