देशातील सर्वात मोठ्या उद्योगसमूह असणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजकडून जस्ट डायल ही कंपनी विकत घेण्यात आली आहे. हा व्यवहार पूर्ण झाला असून आता जस्ट डायलवर पूर्णपणे रिलायन्सची मालकी आहे. रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून (RRVL) जुलै महिन्यात 3,497 कोटी रुपये मोजून जस्ट डायल कंपनी खरेदी करण्यात आली होती. सगळ्या कायदेशीर प्रक्रियेनंतर आता जस्ट डायलचा संपूर्ण ताबा RRVL कडे आला आहे.
सध्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडे जस्ट डायल कंपनीचे 40.90 टक्के समभाग आहेत. आता रिलायन्स अन्य शेअरधारकांकडून 26 टक्के हिस्सा खरेदी करेल.
इन्फोर्मेशन सर्च अँण्ड लिस्टिंग कंपनी आहे. संपूर्ण देशात या कंपनीचे नेटवर्क आहे. ही कंपनी रिलायन्सच्या ताब्यात आल्यामुळे त्यांना मोठ्याप्रमाणावर मर्चंट डेटाबेस उपलब्ध होईल. प्रत्येक तिमाहीत मोबाईल, APP, संकेतस्थळ आणि 8888888888 या टेलिफोन हॉटलाईनच्या माध्यमातून जस्ट डायलला तब्बल 15 कोटी युनिक व्हिजिटर्स भेट देतात.
जस्ट डायल ही कंपनी 1996 साली सुरु झाली होती. तेव्हा ही कंपनी केवळ फोन बेस्ड होती. त्याकाळात जस्ट डायलची बाजारपेठ प्रचंड मोठी होती. मात्र, अलीकडच्या काळात आलेल्या अर्बन क्लॅप, प्रॅक्टो, अरबन कंपनी, झोमॅटो आणि मेक माय ट्रिप यासारख्या कंपन्यांमुळे जस्ट डायल कंपनीसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.
रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेडकडून विटालिक हेल्थ आणि नेटमेडस् या दोन कंपन्याही विकत घेण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच रिलायन्सने अर्बन लॅडर या कंपनीत 96 टक्के हिस्सेदारी खरेदी करण्यात आली होती.