परकीय आक्रमणाचा धोका बघता भारतानं गेल्या काही वर्षांत आपल्या सीमा अधिक बळकट करण्यावर विशेष भर दिला आहे. यासाठी प्रगत तंत्रज्ञान, आधुनिक शस्त्रास्त्रांचा वापर केला जात आहे. तसंच शस्त्रास्त्र निर्मितीत स्वयंपूर्ण होण्यासाठीदेखील भारत प्राधान्यानं पावलं उचलत आहे. याच पार्श्वभूमीवर काल (19 ऑक्टोबर 22) उत्तर गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या दीसा येथे नवीन लष्करी हवाईतळ अर्थात एअरबेसचा भूमिपूजन सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. हवाई दलाचा हा एअरबेस पाकिस्तानच्या सीमेजवळ असल्याने सामरिकदृष्टया तो खूप महत्त्वाचा मानला जात आहे. या एअरबेसची खास अशी वैशिष्ट्ये आहेत.
उत्तर गुजरातमधील भारत-पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या दीसा येथील नवीन लष्करी विमानतळ अर्थात एअरबेसचं भूमिपूजन काल (19 ऑक्टोबर 22) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालं. हा एअरबेस भारत-पाक सीमेपासून केवळ 130 किलोमीटर अंतरावर आहे. या एअरबेसमुळे भारतीय सैन्याची ताकद वाढणार आहे. पाकिस्तान हा आपला पारंपरिक शत्रू आहे. हा देश कायमच भारतातील शांतात भंग करण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करत असतो. त्यामुळे भविष्यात युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास दीसा एअरबेस त्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
केंद्रातील मोदी सरकारने 2020 मध्ये दीसा एअरबेस निर्मितीचा निर्णय घेतला होता. या एअरबेसच्या बांधणीसाठी सुमारे एक हजार कोटी रुपये खर्च येईल. संरक्षण तज्ज्ञांच्या मते, युद्धाच्या काळात एअरबेसचं महत्त्व लक्षणीय वाढतं. येथे डिटॅचमेंट लागू केली जाते. त्यामुळे येथून शत्रू देशाशी मुकाबला करणं सोपं जातं. दीसा हा साउथ वेस्टर्न एअर कमांड अर्थात स्वॅकच्या गांधीनगर येथील मुख्यालयांतर्गत येणारा नववा एअरबेस आहे. या मुख्यालयाअंतर्गत गुजरात, महाराष्ट्र आणि राजस्थानमधील हवाईतळ येतात.
दीसा एअरबेस पाकिस्तानच्या सीमेपासून जवळ असल्याने संरक्षक विमानांच्या हालचालींसाठी तो महत्त्वाचा आहे. यामुळे हवाई दलाच्या विमानांच्या माध्यमातून पाकिस्तानमधील घडामोडींवर लक्ष ठेवता येणार आहे. या हवाईतळाच्या बांधकामाच्या पहिल्या टप्प्यात धावपट्टी, टॅक्सीवे आणि एअरक्राफ्ट हॅंगर उभारले जातील. पुढील टप्प्यात इतर तांत्रिक पायाभूत सुविधा उभारल्या जातील. हा एअरबेस स्मार्ट फेंसिंग, भूजल पुनर्भरण सुविधा, सेन्सर आधारित प्रकाशयोजना आणि सौर ऊर्जा फार्मने सुसज्ज असेल.
दीसा एअरबेस दक्षिण-पश्चिम हवाई कमांडसाठी महत्त्वपूर्ण लोकेशन ठरणार आहे. या एअरबेसमुळे महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांच्या सुरक्षेसाठी मदत होणार आहे. या एअरबेसवर बोईंग सी-17 ग्लोबमास्टरसह नवीन पिढीतील विमानं तैनात केली जातील. 2024 पर्यंत या एअरबेसचं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा एअरबेस 4500 एकरवर तयार केला जाणार आहे. दक्षिण-पश्चिम हवाई कमांडचे गुजरातमधील कच्छ येथील भूज आणि नलियामध्ये एअरबेस आहेत. त्याचप्रमाणे राजस्थानमधील जोधपूर, जयपूर आणि बाडमेरमध्ये एअरबेस आहेत. दीसा एअरबेसच्या निर्मितीमुळे गुजरातसह दक्षिण-पश्चिम हवाई कमांडची ताकद वाढणार आहे.
दीसा येथे सध्या एकच धावपट्टी आहे. येथील सुमारे एक हजार मीटर धावपट्टीचा उपयोग नागरी आणि चार्टर विमानांच्या ऑपरेशनसाठी तसेच व्हीव्हीआयपींच्या हेलिकॉप्टर लॅंडिंगसाठी केला जातो. ही धावपट्टी अनारक्षित म्हणून वर्गीकृत आहे. त्यामुळे ती प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम अर्थात आरसीएस – उडान अंतर्गत विकासासाठीदेखील पात्र आहे.