सदावर्तेंना मोठा झटका, पुन्हा जेलमध्ये रवानगी
एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांना पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. कारण गिरगाव कोर्टाने सदावर्ते यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरणी एसटी कर्मचाऱ्यांची बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्ते हे दोन दिवसांपासून अटकेत आहेत. त्यांना कोर्टाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्याची मुदत आज संपली. त्यामुळे त्यांना आज पुन्हा कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी सरकारी वकील प्रदिप घरात यांनी पोलिसांची बाजू मांडली. सरकारी वकिलांनी यावेळी सदावर्ते यांच्याबद्दल अनेक मोठमोठे गौप्यस्फोट केले. तर सदावर्ते यांची बाजू मांडणारे वकील गिरीश कुलकर्णी यांनी सर्व आरोप खोटे असल्याची भूमिका मांडली. याप्रकरणी प्रचंड युक्तीवाद झाला. अखेर दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने सदावर्ते यांना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.
काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाल्याशिवाय
शांततापूर्ण संबंध शक्य नाही
पाकिस्तानचे होणारे पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी अर्ज दाखल केल्यानंतर आणि पंतप्रधानपदी विराजमान होण्याआधीच भारताविरोधात गरळ ओकली आहे. ते म्हणाले, आम्हाला भारतासोबतही शांततापूर्ण आणि चांगले संबंध हवे आहेत. मात्र शांततापूर्ण संबंध हे काश्मीर प्रश्नावर तोडगा निघाल्याशिवाय शक्य नाहीत,” असं वक्तव्य पंतप्रधान पदाचे उमेदवार पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे अध्यक्षांनी केलंय.
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, नवऱ्याने पत्नीला 4 वर्षांपासून घरात डांबून ठेवलं, बीडमधील घटना
चारित्र्यावर संशय घेऊन पतीने पत्नीला चार वर्षांपासून डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार बीड शहरातील जालना रोडवर उघडकीस आला आहे. या नराधम पतीने पीडित महिलेला मारहाण देखील केलेली आहे. तसंच दोन मुलं देखिल दहशतीखाली आहे. घरामध्ये राहून मरण यातना भोगणाऱ्या या महिलेची आज सामाजिक कार्यकर्ते पोलीस आणि पत्रकार यांनी सुटका केली. यावेळी त्या महिलेची अवस्था पाहून अक्षरशः सामाजिक कार्यकर्त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले.
चौकशी सुरु असताना
सोमय्या अचानक गायब
आयएनएस ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या निधीसंदर्भात चौकशी सुरु असताना सोमय्या अचानक गायब झाले आहेत. विरोधी पक्षांच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांकडून राजकीय हेतूने कारवाई होत असताना ‘कर नाही तर डर कशाला’ असे म्हणणारे किरिट सोमय्या, प्रविण दरेकर त्यांच्यावरील कारवाईवेळी कशाला घाबरत आहेत? त्यांनीही चौकशीला सामोरे जावे,” असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतिल लोंढे यांनी व्यक्त केले..
आरोपी मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या
यांची फार जुनी दोस्ती : राऊत
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपा नेते किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आर्थिक घोटाळ्याप्रकरणी फरार असलेला आरोपी मेहुल चोक्सी आणि किरीट सोमय्या यांची फार जुनी दोस्ती आहे. त्यामुळे चोक्सी जिथं लपलाय तिथं सोमय्या आणि त्यांचा मुलगा लपला नाही ना? असा सवाल संजय राऊत यांनी केला. त्यांनी या घोटाळ्याला भाजपाचा पाठिंबा आहे का? याबाबत भाजपाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली.
भाजपाचे लोक काय धुतल्या
तांदळाचे आहेत का? : जयंत पाटील
मविआचे निवडून आलेले आमदार फोडण्याचा प्रयत्न झाला, मात्र ते शक्य झाले नाही म्हणून ईडी, इन्कम टॅक्सची धाड टाकली जात आहे. ईडी काय महाराष्ट्रातच आहे का? भाजपाचे लोक काय धुतल्या तांदळाचे आहेत का? असा रोखठोक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे. आजपासून (११ एप्रिल) राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाला रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून झाली. जयंत पाटील बोलत होते. त्यांनी उरण मतदारसंघाचा आढावा घेतला.
आंदोलनाआधी बडतर्फ कर्मचाऱ्याने
केली पवारांच्या घराची पाहणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले होते. या आंदोलनाची गंभीर दखल घेत राज्य सरकारने कारवाईला सुरुवात केली. पवारांच्या घरावर अचानक आंदोलकांनी धडक दिल्याने पोलीस खात्यावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. ज्यामुळे काही पोलीस अधिकाऱ्यांवर ही कारवाई झाली आहे.
शरद पवार यांच्या घरावर हल्ला होण्यापूर्वी अभिषेक पाटील या व्यक्तीने पवारांच्या घराची रेकी केली होती. अशी माहिती पोलिसानी कोर्टात दिली आहे. अभिषेक पाटील हा लातूरचा बडतर्फ एसटी कर्मचारी आहे.
रोपवेचे दोन डबे एकमेकांवर
आदळल्याने दोन जण ठार
झारखंडच्या देवघर जिल्ह्यातील बाबा बैद्यनाथ मंदिराजवळील त्रिकुट टेकडीवर रोपवेवरचे दोन डबे एकमेकांवर आदळल्याने दोन जण ठार आणि अनेक जखमी झाले आहेत. अधिका-यांच्या म्हणण्यानुसार, रोपवेमधील किमान १२ केबिनमध्ये ४८ लोक अजूनही अडकले आहेत आणि भारतीय हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरच्या मदतीने बचाव कार्य सुरू आहे. तांत्रिक बिघाडामुळे केबल कारची टक्कर झाल्यामुळे ही घटना घडल्याचे दिसते, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं, मात्र, नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रोपवे मॅनेजर आणि इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळावरून पळ काढला, अशी माहिती पीटीआय या वृत्तसंस्थेने दिली
राज ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे,
त्यांचे वारसदार नाहीत : आठवले
रामदास आठवले म्हणाले,”कोणाला लाऊडस्पीकर लावायचा असेल, मंदिरांवर लाऊडस्पीकर लावायचा असेल तर हरकत नाही. काही मंदिरांवर लाऊडस्पीकर आहेत. त्यामुळे मशिदीवर जे त्यांचे परंपरागत लाऊडस्पीकर लावलेले आहेत. ते लावतायत म्हणून आम्ही लावू अशी भूमिका घेणं योग्य नाही. पूर्वीपासून ज्या ठिकाणी भोंगे आहेत, तिथे आहेत, मंदिरांवरही लाऊडस्पीकर असल्याचं आम्ही पाहिलं आहे. त्यामुळे विरोधाला विरोध करण्याची भूमिका योग्य नाही. राज ठाकरे हे एका पक्षाचे मुख्य नेते आहेत. ते बाळासाहेब ठाकरेंचे पुतणे आहेत, पण ते त्यांचे वारसदार नाहीत. बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार उद्धव ठाकरे आहेत आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे वारसदार असूनही आमच्यासोबत येत नाहीत, याचा आम्हाला खेद आहे. “
कीर्तनकाराचा महिलेसोबत व्हिडिओ
व्हायरल, तृप्ती देसाई यांची तक्रार
भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील कीर्तनकार बाळकृष्ण रामभाऊ मोगल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केलीय. मोगल यांचा एका महिला किर्तनकारासोबतचा अश्लील व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तृप्ती देसाई यांनी संताप व्यक्त करताना अशा किर्तनकारांवर पोलीस कारवाईबरोबरच वारकरी संप्रदायातील संस्थांनीही कारवाई केली पाहिजे अशी मागणी केलीय. देसाई यांनी यासंदर्भात ईमेलवरुन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडेही गुन्हा दाखल करण्यासंदर्भातील मागणी केलीय.
युझवेंद्र चहलचा गौप्यस्फोट, मुंबई इंडियन्सच्या या खेळाडूची चौकशी होणार!
भारताचा लेग स्पिनर युझवेंद्र चहलने त्याच्यावर झालेल्या अत्याचाराबाबत गौप्यस्फोट केले, यानंतर आता मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू अडचणीत सापडला आहे. इंग्लंडची क्रिकेट काऊंटी असलेला डरहम क्लब त्यांचा मुख्य प्रशिक्षक जेम्स फ्रॅन्कलीन याची चौकशी करणार आहे. चहलने केलेल्या आरोपांबाबत फ्रॅन्कलीनसोबत वैयक्तिक बोलण्यात येईल, असं डरहम क्लबने सांगितलं आहे. वर्षाच्या सुरुवातीला आरसीबीच्या पॉडकास्टमध्ये चहलने 2011 साली घडलेली घटना सांगितली होती. चॅम्पियन्स लीगची फायनल जिंकल्यानंतर मुंबई इंडियन्समधल्या फ्रॅन्कलीन आणि एण्ड्रयू सायमंड्स यांनी मला बांधून ठेवल्याचा आरोप चहलने केला होता.
‘2011 साली घडलेल्या घटनेबाबत समोर आलेल्या वृत्ताबाबत आम्हाला माहिती मिळाली आहे. यात आमच्या कोचिंग स्टाफमधल्या सदस्याचं नाव आलं आहे. क्लबशी संबंधित असलेल्या गोष्टींचं तथ्य जाणून घेण्यासाठी आम्ही संबंधित व्यक्तींशी वैयक्तिक बोलू,’ असं डरहम काऊंटी क्लबने इएसपीएन क्रिकइन्फोला सांगितलं.
SD social media
9850 60 35 90