वर्षानुवर्षे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या टीव्ही मालिकेत दिसणारे ‘नट्टू काका’ उर्फ अभिनेता घनश्याम नायक यांनी या जगाला कायमचा निरोप दिला आहे. अभिनेते घनश्याम नायक यांनी रविवारी वयाच्या 77व्या वर्षी त्यांच्या अखेरचा श्वास घेतला. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. एवढेच नाही, तर ते त्यांच्या शेवटच्या दिवसांत ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या सेटवर देखील जाऊ शकले नव्हते. गेल्या 13 वर्षांपासून ते या मालिकेशी संबंधित होते.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेत ते जेठालालचे दुकान ‘गडा इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये काम करताना दाखवले होते. अशा परिस्थितीत, जेव्हा चाहत्यांना त्यांच्या निधनाची माहिती मिळाली, तेव्हा प्रत्येकजण साश्रू नयनांनी लाडक्या अभिनेत्याला श्रद्धांजली वाहताना दिसले.
‘नट्टू काका’ म्हणजेच घनश्याम नायक यांनी आपल्या आयुष्यात खूप प्रसिद्धी मिळवली आहे. पण, प्रत्येक सामान्य माणसाप्रमाणे त्यांना त्यांच्या कारकिर्दीत यश मिळवण्यासाठी खूप संघर्ष करावा लागला, जो त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितला होता. चला तर जाणून घेऊया त्यांच्या कारकिर्दीबद्दल…
बालपणीपासूनचे स्वप्न
घनश्याम नायक हे अशा कलाकारांपैकी एक होते, ज्यांनी लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न पाहिले होते. या कारणास्तव, त्यांनी अगदी लहान वयातच अभिनयाची वाट पकडली आणि बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली. 1960मध्ये आलेल्या ‘मासूम’ या चित्रपटातून त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर घनश्याम नायक यांनी ‘बेटा’, ‘आँखें’, ‘आंदोलन’, ‘बरसात’ यासह अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातही ते दिसले होते.
3 रुपयांसाठी 24 तास काम!
अभिनेते घनश्याम नायक यांनी त्यांच्या एका मुलाखतीत त्यांच्या संघर्षाच्या दिवसांना उजळणी दिली होती. या दरम्यान, त्यांनी सांगितले की, त्यांनी आपल्या आयुष्यात अनेक कठीण प्रसंगांना तोंड दिले आहे. त्यांनी असे दिवस देखील पाहिले आहेत, जेव्हा ते फक्त 3 रुपयांसाठी दिवसाचे 24 तास काम करत असायचे, कारण त्या दिवसांत चित्रपटसृष्टीत फारसे पैसे दिले जात नव्हते.
‘तारक मेहता..’मधून मिळाली ओळख
मात्र, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेने ‘नट्टू काकां’चे आयुष्यच बदलून टाकले. या मालिकेने त्यांना पैशांसह नावही मिळवून दिले. या मालिकेचा एक भाग झाल्यानंतरच दिवंगत अभिनेत्याने मुंबईत स्वतःची दोन घरे विकत घेतली. त्यांनी त्यांच्या एका मुलाखतीत सांगितले होते की, या शो नंतर त्यांचे आयुष्य बदलले होते आणि त्यांना पैसे मिळू लागले होते.
अभिनेते घनश्याम नायक यांच्या निधनाची दुःखद बातमी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’चे निर्माते असित कुमार मोदी यांनी शेअर केली होती. त्यांनी सांगितले की, नट्टू काका बराच काळ कर्करोगाशी लढत होते. काही महिन्यांपूर्वी त्यांची दोन ऑपरेशनही झाली होती. वाढत्या वयामुळे ते रोज शूटिंगला जाऊ शकत नव्हते, पण ते सुरुवातीपासून आतापर्यंत ‘तारक मेहता..’च्या टीमचा महत्त्वपूर्ण भाग होते.