आज दि.७ अ़ॉक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

हे तर रामायणाचं इस्लामीकरण! ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या दिग्दर्शकाला कायदेशीर नोटीस

अभिनेता प्रभास आणि सैफ अली खान यांचा सर्वांत लोकप्रिय अभिनेत्यांमध्ये समावेश होतो. जगभरात त्यांचे कोट्वधी चाहते आहेत. मात्र, याच लोकप्रिय अभिनेत्यांना सध्या जोरदार टीकेचा सामना करावा लागत आहे. दोघांनी रामायणातील पात्रांवर आधारित ‘आदिपुरुष’ या चित्रपटात काम केलं आहे. प्रभास, सैफ अली खान आणि कृती सेनन स्टारर आदिपुरुष हा चित्रपट टीझर लाँचपासून जोरदार चर्चेत आला आहे. या चित्रपटात हिंदू धर्माची खिल्ली उडवल्याचा आरोप दिग्दर्शक आणि कलाकारांवर होत आहे. विशेषत: रावणाची भूमिका साकारणाऱ्या सैफ अली खानच्या लूकमुळे सर्वांत जास्त वाद सुरू आहे. त्याच्या लूकवर लोकांनी आक्षेप घेतला आहे. सर्व ब्राह्मण महासभेनं गुरुवारी चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत याला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. सात दिवसांत चित्रपटातील सर्व वादग्रस्त दृष्यं काढून टाकावीत, अन्यथा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही महासभेनं दिला आहे. टीव्ही 9 भारतवर्षनं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

काँग्रेसच्या 2 आमदारांचं धावत्या ट्रेनमध्ये महिलेसोबत धक्कादायक कृत्य

एकीकडे काँग्रेस नेते राहुल गांधी भारत जोडो यात्रा करत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसच्या दोन आमदारांनी धक्कादायक कृत्य केल्याची घटना समोर आली आहे. या बाबतीत मध्य प्रदेशातील सागर येथून मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेसच्या दोन आमदारांवर चालत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. वास्तविक, चालत्या ट्रेनमध्ये महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या दोन आमदारांविरुद्ध विनयभंगाच्या कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यावेळी दोन्ही आमदारांनी मद्यप्राशन केल्याचाही आरोप आहे.प्रमोद अहिरवार यांच्या म्हणण्यानुसार ही घटना सागरच्या आधी घडली आहे. ते म्हणाले की, आमच्या कर्मचाऱ्यांनी चालत्या ट्रेनमधील महिलेची तक्रार ऐकली आणि संपूर्ण घटनेची लेखी नोंद केली. प्रमोद अहिरवार म्हणाले की, तक्रारीच्या प्रतीच्या आधारे आमदार सिद्धार्थ कुशवाह आणि सुनील सराफ यांच्या विरोधात विनयभंगाच्या कलमाखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

‘पंतप्रधान मोदींच्या हत्येचा कट’, बॉम्बस्फोटाची धमकी, पुण्यात एकाला बेड्या

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील देहू रोड पोलिसांनी एका संगणक अभियंत्याला अटक केलीय. वसाहतीमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या आवाजाचा त्रास होतो म्हणून त्याने चक्क 112 या पोलीस कंट्रोलला फोन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट आहे आणि तो आमच्याच वसाहतीत होत असल्याचा फेक कॉल पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांकावर केला. मुबंई आणि पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बस्फोट करणार असल्याचेही त्याने सांगितले. या फोनमुळे पोलिसांचे चांगलेच धाबे दणाणले. पण चौकशीनंतर हा खोटा फोन असून वसाहतीमधल्या लोकांच्या आवाजाला कंटाळून मनोज अशोक हसे याने हा फोन केल्याचे स्पष्ट झालंय.

चंद्रमुखी फेम अमृता खानविलकर पहिल्यांदा ऐतिहासिक भूमिकेत; “हर हर महादेव”मधील पहिला लुक आला समोर

यंदाची दिवाळी प्रेक्षकांसाठी खास होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचा शूरवीर मावळा बाजीप्रभू देशपांडे यांच्या पराक्रमाची गाथा सांगाणार हर हर महादेव हा सिनेमा येत्या 25 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेता शरद केळकर बाजीप्रभूंच्या प्रमुख भूमिकेत आहेत. तर अभिनेता सुबोध भावे पहिल्यांदा छत्रपती शिवादी महाराजांच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. प्रसिद्ध गायक सीड श्रीराम याच्या आवाजातील गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलीत. आता सिनेमातील इतर पात्रांची नावं देखील समोर आलीत. महाराष्ट्राला चंद्रा म्हणून वेड लावणारी अभिनेत्री अमृता खानविलकर सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. सोनाबाई देशपांडेंची भूमिका अमृता साकारणार आहे. सिनेमातील अमृताचा पहिला लुक समोर आला आहे.

Digital Currency च्या दिशेन RBI ची वाटचाल

क्रेप्टोकरन्सी सारखंच भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआयने एक मोठा निर्णय घेतला आहे. लवकरच आरबीआय डिजिटल करन्सी आणण्याच्या तयारीत आहे. ई रुपयाबाबत लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. याबाबत सध्या चर्चा सुरू असल्याची माहिती मिळाली आहे.

RBI ने कॉन्सेप्ट नोट जारी करून ई नोट कशी असेल याबाबत माहिती दिली आहे. Central Bank Digital  Currency.दोन वेगवेगळ्या स्वरुपात असणार आहेत. रिटेल ई रुपया आणि होलसेल ई रुपया असे दोन प्रकार यामध्ये असणार आहेत.

शिवसेनेला आता फक्त पुढच्या 21 तासांची मुदत, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीत प्रचंड घडामोडी

महाराष्ट्राच्या राजकारणासाठी दिल्लीतील घडामोडींना वेग आला आहे. महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पक्षांपैकी एक पक्ष असलेल्या शिवसेनेत मोठी फूट पडली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात पक्षाचं चिन्ह आणि हक्कावरुन संघर्ष सुरु आहे. त्यांच्या या संघर्षावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. निवडणूक आयोगात पक्षाच्या चिन्हावरुन आज महत्त्वाची सुनावणी झाली. या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे पक्ष सदस्यात्वाचे तब्बल सात लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. तर उद्धव ठाकरे यांच्या गटाने अडीच लाख प्रतिज्ञापत्र सादर केले आहेत. शिंदे गटाने आज कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रचंड धावाधाव केली. त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे गटाकडूनही कागदपत्रे सादर करण्यासाठी धावाधाव सुरु आहे. ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे कागदपत्रे सादर करण्यासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला. निवडणूक आयोगाने मात्र ठाकरे गटासाठी उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ दिला आहे. महराष्ट्राच्या राजकारणासाठी या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आज दोन्ही गटाने कागदपत्र सादर केले. यामध्ये शिंदे गटाने सकाळी निवडणूक आयोगात सर्व कागदपत्रे दिली. तर उद्धव ठाकरेंच्या वतीने दुपारी जेष्ठ वकील देवदत्त कामत यांच्या माध्यमातून कागदपत्र सादर करण्यात आली. खरंतर दोन्ही गटासाठी ही लढाई ‘करो या मरो’ या स्वरुपाचीच आहे. शिवसेनेची बाजू मांडण्यासाठी आज शिवसेनेचे ज्येष्ठ नेते अनिल देसाई हे देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. पक्षचिन्हावर आज निवडणूक आयोगात अंतिम सुनावणी होईल, असा अंदाज होता. पण शिवसेनेकडून आणखी मुदतवाढ मागण्यात आल्याने निवडणूक आयोगाने उद्या दुपारी दोन वाजेपर्यंतचा वेळ शिवसेनेला दिला. त्यामुळे उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत शिवसेनेला आपली बाजू मांडता येणार आहे.

कोकणावरील संकटामुळे राज्यभरात टेन्शन; हवामान विभागाकडून अलर्ट जारी

राज्यात अनेक ठिकाणी सध्या जोरदार पाऊस सुरू आहे. अनेक ठिकाणी पावसाची अपेक्षा शेतकरी वर्गाला होती. त्यामुळे या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे. तर यातच काही ठिकाणी पावसामुळे नद्या नाल्यांना पूरही आले आहेत.तर चिनी समुद्रात नोरु चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे राज्यामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच गेले दोन दिवस समुद्रातील वातावरण बदल झाल्यामुळे त्याचा मासेमारीवर मोठा परिणाम झाला आहे. खराब हवामान व पावसामुळे मासेमारी बोटीने किनारा गाठला आहे. त्यामुळे कोट्यावधींची उलाढाल ठप्प झाली आहे.

‘उद्धव ठाकरेंसोबत 35 वर्षे राहिलो, पण ..’; शिंदेंच्या नातवावरील वक्तव्यामुळे गुलाबराव पाटील नाराज

उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नातवाबाबत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आता उमटायला सुरूवात झाली आहे. यावरही गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, की ‘मी उद्धव ठाकरेंच्या 35 वर्षे जवळ राहिलो आहे, पण त्यांना कधीही बोलताना घसरलेलं पाहिलं नाही. दीड वर्षांच्या मुलावर ते टीका करतात, राजकारणाची पातळी इतक्या खाली जाऊ नये’, असं म्हणत पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.

वल्लभभाई पटेलांपेक्षाही श्रीरामाची उंची अधिक; पीएम मोदींच्या ड्रिम प्रोजेक्टमुळे रेकॉर्डही बदलणार?

संपूर्ण देशाला प्रतिक्षा असलेले उत्तर प्रदेशातील अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. डिसेंबर 2023 पर्यंत येथे राम मंदिर तयार होईल, त्यानंतर जानेवारी 2024 पर्यंत भगवान आपल्या गर्भगृहात विराजमान होतील. अशा परिस्थितीत अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या सातत्याने वाढत आहे.हे पाहता सरकार अयोध्येच्या विकासासाठी सातत्याने काम करत आहे. याच भागात रामनगरीमध्ये रामाचा जगातील सर्वात उंच 251 मीटरचा पुतळा बसवण्याची तयारीही सुरू झाली आहे. त्याचे बांधकाम पद्मश्री पुरस्काराने सन्मानित शिल्पकार अनिल सुतार करणार आहेत, ज्यांनी गुजरातमधील केवडिया येथे स्टॅच्यू ऑफ युनिटी बांधली आहे.

वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी अपघात! म्हशींना धडकल्याने ‘नाक’ तुटलं

मोठा गाजावाजा करत सुरू करण्यात आलेल्या ‘वंदे भारत एक्स्प्रेसला’ला सलग दुसऱ्या दिवशी अपघाता झाला आहे. सेमी हायस्पीड वंदे भारत एक्स्प्रेसला सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा जनावरांनी धडक दिली. मुंबईहून जाणाऱ्या रेल्वेला शुक्रवारी कंझरी आणि आनंद स्थानकांदरम्यान हा अपघात घडला. कालच्या (गुरुवारी) अपघातात ट्रेनचं नाक तुटलं होतं.

सौरव गांगुली राजीनामा देण्याच्या तयारीत, बीसीसीआयला मिळणार नवा अध्यक्ष

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) दिग्गजांच्या दोन महत्त्वाच्या बैठका गुरुवारी दिल्लीत पार पडल्या. यामध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह, उपाध्यक्ष राजीव शुक्ला, माजी अध्यक्ष एन. श्रीनिवासन, कोषाध्यक्ष अरुण सिंग धुमाळ, आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, माजी सचिव निरंजन शहा, आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा सहभागी झाले होते.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सौरव गांगुली पुढील निवडणूक लढवणार नाही, मात्र मंडळाचे सचिव जय शहा हे नवीन अध्यक्षपदाच्या शर्यतीत नाहीत. १९८३ च्या विश्वचषक चॅम्पियन संघातील सदस्यांपैकी एक, रॉजर बिन्नी आणि काँग्रेस नेते राजीव शुक्ला, जे कर्नाटकचे आहेत, ते अध्यक्ष, सचिव किंवा आयपीएल चेअरमन होऊ शकतात. विद्यमान खजिनदार आणि केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचे भाऊ अरुण हे त्याच पदासाठी पुन्हा उमेदवारी देऊ शकतात. बीसीसीआयच्या एजीएममध्ये कर्नाटक राज्याकडून सचिव संतोष मेनन सहभागी होत होते. 

पाकिस्तानने रोखला भारताचा विजयरथ, १३ धावांनी केला पराभव

बांगलादेश येथे सुरू असलेल्या महिला आशिया चषक स्पर्धेतील तेरावा सामना आज भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात खेळला गेला. महिला आशिया चषकातील भारत पाकिस्तान महामुकाबल्यात पाकिस्तानने भारतावर १३ धावांनी मात केली. विशेष म्हणजे कालच थायलँडने पाकिस्तानचा पराभव केला होता आणि आज पाकिस्तानने भारताचा पराभव करत भारताला मोठा धक्का दिला. पाकिस्तानने भारतासमोर विजयासाठी १३८ धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताचा संपूर्ण डाव १२४ धावात संपुष्टात आला. पाकिस्तानकडून नाशरा संधूने सर्वाधिक ३ गडी बाद करत भारताला बॅकफूटवर ढकलले. तर सादिका इक्बाल निदा दार यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. फलंदाजीत निदा दारने नाबाद ५६ धावांची खेळी केली.

राम मंदिराचं ५० टक्के काम पूर्ण – योगी आदित्यनाथांची माहिती

अयोध्येतील राम मंदिराचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तर मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय २०२० मध्ये सुरू झालेले मंदिराचे काम २०२४च्या शेवटापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पावनधाम श्री पंचखंड पीठाच्या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ जयपूर येथे आले होते, यावेळी त्यांनी राम मंदिराच्या कामाबाबत माहिती दिली.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.