नाशिक येथे नुकतीच भारतीय जनता पार्टीची प्रदेश पदाधिकारी बैठक पार पडली. या कार्यक्रमातून भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे गटासह महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या महाराष्ट्रात जे सरकार स्थापन झालं आहे, ते सरकार खुद्दारांचं आहे. २०१९ मध्ये स्थापन झालेलं सरकार गद्दारांचं होतं, अशा शब्दांत फडणवीसांनी टीकास्त्र सोडलं.
उपस्थित भाजपा पदाधिकाऱ्यांना संबोधित करताना फडणवीस म्हणाले, “आज राज्यात जे सरकार स्थापन झालं आहे. ते गद्दारांचं सरकार नाही, हे खुद्दारांचं सरकार आहे. ज्यांची खुद्दारी जनतेसाठी, विचारांसाठी आणि हिंदुत्वासाठी आहे, अशा खुद्दारांचं हे सरकार आहे. पण ते (महाविकास आघाडी) रोज सकाळी उठून हे सरकार बेकायदेशीर आहे, असं म्हणतात. कारण त्यांना भीती आहे की, उरले-सुरलेले १०-१५ आमदारही निघून जातील. म्हणून त्यांना दररोज सांगितलं जातं की, हे सरकार बेकायदेशीर आहे. हे सरकार अपात्र ठरणार आहे. सर्वोच्च न्यायालयात आपण जिंकणार आहोत. हा संदेश आपल्यासाठी नाही. जे उरले-सुरले आहेत, त्यांच्यासाठी हा संदेश आहे.”
“मी त्यांना स्पष्टपणे सांगू इच्छितो की, काहीही काळजी करू नका. आपण जे केलंय ते नियमाने केलंय. कायद्याने केलंय. कायद्याचा अभ्यास करून केलंय. मला पूर्ण विश्वास आहे, सर्वोच्च न्यायालयात निश्चितपणे आपल्याच बाजुने निकाल लागेल. कारण आपण संविधानासंमत राहून काम केलंय. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्या बाजुने निकाल दिला, तर सर्वोच्च न्यायालय उत्तम आहे. पण न्यायालयाने त्यांच्याविरोधात निकाल दिला, तर न्यायालय दबावाखाली आहे. निवडणूक आयोगाबद्दलही त्यांनी असंच म्हटलं आहे. देशातील सर्वोच्च संस्थांवर प्रश्नचिन्ह उमटवण्याचं काम विरोधकांकडून केलं जात आहे,”
पण एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं सरकार १०० टक्के कायदेसंमत आहे. ते संविधानसंमत आहे. हे सरकार आपला कार्यकाळ तर पूर्ण करणारच आहे. पण पुन्हा एकदा आम्ही महाराष्ट्रात नव्याने दीडपट अधिक जागा जिंकून येणार आहोत. कारण आम्ही जनतेची सेवा आम्ही करत आहोत.” असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.