द्रोनागिरी पर्वताचा एक भाग असलेला सप्तश्रुंगी गड. राम आणि रावण युद्धात लक्ष्मण जख्मी झाला. त्यावेळी हनुमंताने द्रोणागिरी आणता आणता त्याचा भाग सह्याद्री पर्वतात पडला तो भाग म्हणजे सप्तशृंगी गड.
पुराणात असलेल्या एकशेआठ पीठांपैकी आणि महाराष्ट्रातील साडेतीन देवी शक्तीपीठांपैकी वणीच्या गडावरील सप्तशृंगी देवीचे अर्धे पीठ म्हणून ओळखले जाते. हे एक जागृत देवस्थान आहे. अठरा हाताच्या या जगदंबेच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येत असतात. महाराष्ट्रातील नाशिक जवळील नांदुरी गावात वसलेला सप्तशृंगी एक किल्ला आहे. अनेक कुटुंबाची कुलस्वामिनी असलेले सप्तशृंगी मातेचे हे स्थान अत्यंत पवित्र तिर्थक्षेत्र आहे. ब्रह्मदेवाच्या कमंडलूपासून निघालेल्या गिरिजा महानदीचे रूप म्हणजे सप्तशृंगीदेवी असे मानले जाते. आदिशक्तीचे हे मुळस्थान आहे. देवीची मूर्ती स्वयंभू आहे…
रक्तवर्णी आदिशक्ती सप्तशृंगी
महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी या त्रिगुणात्मक देवीं मिळून देवीचे स्वरूप आहे. ओंकाराचे अर्धचंद्र स्वरुप सप्तशृंग क्षेत्री पूर्ण होते म्हणून हे अर्ध शक्तीपीठ आहे. माता येथे बिंदु स्वरूपिणी आहे. ओं म्हणजे आदिशक्ती स्वरूप या आदिशक्तीने सर्व विश्व व्यापले आहे. मार्कंडेय ऋषी देवी समोर सप्तशतीचा पाठ वाचत असताना देवी कान देऊन ऐकत असावी, त्यामुळे देवीची नकळत मान झुकलेली आहे असा समाज आहे. सकाळी बालिका, माध्यान्ही तरुणी, दुपारी वयस्क आणि संध्याकाळी वृद्धा अशा स्वरूपात देवी भाविकांना दर्शन देत असते. देवीचे हे आगळेवेगळे वैशिष्ट्य आहे. तिच्या मुखातील विड्याला खूप मान असतो. रोज देवीला विडा भरवला जातो. दैत्यांना मारत आदिशक्ती सप्तशृंगी त्यांच्या रक्ताने जणू न्हाऊन निघाली होती म्हणून तिला रक्तवर्णी आदिशक्ती मानले जाते.
संत ज्ञानेश्वरांची ही कुलस्वामीनी
शिवा, चामुंडा, वाराही, वैष्णवी, इंद्राणी, कार्तिकेय, नरसिंह अशा सात मातृका वणीच्या गडावर सात शिखरांवर वास्तव्यास आहेत. श्री मच्छिंद्रनाथांना देवीने शबरी विद्येचे धडे दिले त्यांची समाधी ही या सप्तशृंगी गडावर आहे. देवीच्या द्वारी कासव आहे. कासविण जशी प्रेमळ नजरेने आपल्या पिल्लाचे पालनपोषण करते, तसेच माता सप्तशृंगी आपल्या भक्तांचा सांभाळ करते. येथील गाभाऱ्याला शक्तिद्वार, सूर्यद्वार आणि चंद्रद्वार असे तीन दरवाजे आहेत .असे म्हणतात की, संत ज्ञानेश्वरांची ही कुलस्वामीनी आहे. ज्ञानदेवांचे थोरले बंधू निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी वणी गडावर आले होते. भगवतीच्या आदेशानुसार त्यांनी त्रंबकेश्वर येथे समाधी घेतली त्यांना माता सप्तशृंगी मध्ये विठू माऊली चे दर्शन झाले.
किन्नरांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती
गडावर असलेल्य कुंडावर अर्धनारीनटेश्वर ची मूर्ती आहे त्याचा संबंध किन्नरांशी आहे. कोजागरी पौर्णिमेला किन्नर मोठ्या प्रमाणात येथे हजेरी लावतात. देवीच्या सेवेसाठी कृष्णाने किन्नरांना धर्तीवर पाठवले आणि सांगितले त्या आदिमायेच्या कृपेने तुम्ही भक्तांची संकटे स्वतःवर घ्याल आणि तुमची सेवा देवी पर्यंत पोहोचेल. तुमचा उद्धार होईल. शापमुक्त करणारी शरद पौर्णिमा किन्नरांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. श्रद्धा आणि भक्तीपोटी दर शरद पौर्णिमेला हे किन्नर आईचा जागर करतात. पुढचा जन्म चांगला मिळावा या जन्माचे सार्थक व्हावे. आई जगदंबे कडे मागणं मागतात. देवीच्या महिषासुर वधानंतर देवी तांडव करू लागली तिचा आक्रोश शांत करण्यासाठी भगवान शंकर मांसाच्या ढिगाऱ्यात पडून राहिले नकळत त्यांच्या छातीवर देवीचा पाय पडूनही हाडांचा चुरा झाला नाही. ही छाती कुणाची? देवीसमोर प्रश्न पडला. आपण आपल्या पतीच्या छातीवर पाय ठेवला हे लक्षात येताच ती हळहळली तिची जीभ बाहेर निघाली. त्याच अवस्थेत आजही देवी आहे. अशी आख्यायिका आहे.
युद्धामुळे थकलेले रूप विसावा घेण्यासाठी आपल्या अठरा हातासह विसावले आणि वणीगड पावन झाले. श्रीनिवासिनि भगवती चामुंडा असेही म्हणले जाते. सप्तशृंगी पूर्वीचे दंडकारण्य. या पर्वताला सात शिखर आणि सात साज-शृंगार केलेल्या देवी आणि सप्त शिखरावर विराजित आहे. या वास्तवामुळे त्याला सप्तशृंग निवासिनी सप्तशृंगी असे म्हणतात.
सौ. अंजली हांडे, जळगाव