सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. राज्य सरकारने ओबीसींच्या आरक्षणा संदर्भात अध्यादेश काढला होता. पण सुप्रीम कोर्टाने पुढील आदेशापर्यंत या आदेशाला स्थगिती दिली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिका येतात. या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासाठी राज्य सरकारने अध्यादेश काढला होता. त्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला आहे. पण सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाने राज्य सरकारला मोठा झटका बसला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये ओबीसींना
२७ टक्के आरक्षण देता येणार नाही
आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर राज्य सरकारला आज सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा धक्का बसला आहे. कारण, राज्य सरकारच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालायने स्थगिती दिली आहे. त्यामुळे आगामी काळातील निवडणुकांमध्ये ओबीसींना २७ टक्के आरक्षण देता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने तसे राज्य निवडणूक आयोगाला आदेशही दिले आहेत. न्यायमूर्ती खानविलकर आणि रवीकुमार यांच्या खंडपीठाने राज्य सरकारच्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या रीट याचिकेवर हा निर्णय दिला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांना
भारतरत्न पुरस्कार द्यावा
विश्व हिंदू परीषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण तोगडिया यांनी राम मंदिर आंदोलनाचा भाग असणाऱ्या आणि बाबरी मशीद पाडण्याच्या मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या चार नेत्यांना केंद्रामध्ये राम मंदिराच्या नावाने सत्तेत आलेल्या सरकारने भारतरत्न पुरस्कार द्यावा अशी मागणी केलीय. या चार जणांमध्ये शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचाही समावेश असून त्यांच्यासहीत अशोक सिंघल, गोरख पीठाधीश्वर अवेद्यनाथजी, रामचंद्र परमहंस यांनाही भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी तोगडीया यांनी केलीय. आज ६ डिसेंबर असून आजच्याच दिवशी २९ वर्षांपूर्वी बाबरी मशीद पाडण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये पत्रकरांशी संवाद साधताना तोगडीया यांनी ही मागणी केलीय.
शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन
वसीम रिझवी यांचा हिंदू धर्मात प्रवेश
शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी चेअरमन वसीम रिझवी यांनी हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यासोबतच त्यांनी आपलं नावदेखील बदललं आहे. वसीम रिझवी यांचं नवं नाव जितेंद्र नारायण सिंह त्यागी असणार आहे. इस्लाम सोडून हिंदू धर्म स्वीकारल्यानंतर बोलताना जितेंद्र नारायण सिंह त्यागी (वसीम रिझवी) यांनी म्हटलं की, “येथे धर्मांतराचा काही मुद्दा नाही, मला इस्लाममधून काढण्यात आलं असताना कोणत्या धर्माचा स्वीकार करायचा हा माझा हक्क आणि इच्छा आहे. सनातन जगातील सर्वात पहिला धर्म असून जितक्या चांगल्या गोष्टी येथे आहेत तितक्या कोणत्या धर्मात नाहीत. जुम्माला नमाज पठण केल्यानंतर शिर कापण्यासाठी फतवे काढले जात असताना अशा परिस्थिती कोणी आम्हाला मुसलमान म्हणणं आम्हालाच लाज वाटते.
आगामी काळात जीवघेणी साथ
येणार असल्याचा गंभीर इशारा
सध्या जगभरात करोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या संसर्गामुळे चिंताजनक वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे करोनाची तिसरी लाट येणार का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. ओमायक्रॉनचा हा संसर्ग अगदी भारतात आणि महाराष्ट्रातही येऊन पोहचला आहे. याच पार्श्वभूमीवर ऑक्सफर्ड-एस्ट्रोजेनेका करोना लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञ डेम सारा गिल्बर्ट यांनी आगामी काळात जीवघेणी साथ येणार असल्याचा गंभीर इशारा दिलाय. त्या ४४ व्या डिम्बलबी व्याख्यानात बोलत होत्या. यावेळी त्यांनी अशा साथीरोगांच्या तयारीसाठी निधीची गरज असल्याचं सांगत निधी उपलब्ध झाला तरच हा प्रकोप थांबवता येईल असंही नमूद केलं.
विलगीकरणात असतानाही
ओमायक्रॉनची लागण
जगावर भीतीचं सावट निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉनच्या अभ्यासातून धक्कादायक माहिती समोर आली असून यामुळे चिंता वाढली आहे. हाँगकाँगमध्ये हॉटेलमध्ये विलगीकरणात असतानाही ओमायक्रॉनची लागण झाल्याने चिंता व्यक्त होत आहे. विलगीकरणात ठेवण्यात आलेल्या हॉटेलमध्ये एकमेकांपासून दूर अंतरावर असतानाही दोघांना ओमायक्रॉनची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. Emerging Infectious Diseases या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, दोन्ही प्रवाशांचं लसीकरण झालं आहे.
मुंबई शासकीय रुग्णालयाबाहेर
निवासी डाॅक्टराचे काम बंद आंदोलन
देशाबरोबरच मुंबईमध्येही ओमायक्रॉन या करोनाच्या नवीन विषाणूच्या संसर्गाचा धोका वाढत असतानाच मुंबईमधील शीव येथील शासकीय रुग्णालयाबाहेर मार्डच्या निवासी डाॅक्टरांनी आज सकाळपासून आंदोलनाला सुरुवात केलीय. नीट पीजी काऊन्सिलिंग सतत पुढे ढकलण्यात येत असल्याने निवासी डाॅक्टरांनी संपाचं हत्यारं उपसलं आहे. डॉक्टरांनी आक्रमक पवित्रा घेत मागण्या पूर्ण करण्यासाठी आता काम बंद आंदोलनाची हाक दिलीय. राज्यातील सरकारी रुग्णालये आणि काॅलेजमधल्या बाह्यरुग्ण विभागातील डाॅक्टरांनी आजपासून हे आंदोलन सुरु केलंय.
हा गांधींचा भारत नाही तर
नथुराम गोडसेचा भारत : मेहबुबा मुफ्ती
हा माझ्या गांधींचा भारत नाही तर नथुराम गोडसेचा भारत वाटत आहे. गोडसेचं काश्मीर बनवण्याचा कट रचला जात आहे. इथे लोकांना बोलण्याचं स्वातंत्र्यही नाही, असं वादग्रस्त विधा पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या अध्यक्षा मेहबुबा मुफ्ती यांनी केलं आहे. सोमवारी दिल्लीतल्या जंतर-मंतर इथं झालेल्या एका आंदोलनादरम्यान त्या बोलत होत्या. काश्मीरची सद्यस्थिती सर्वांसमोर ठेवण्यासाठी आपण राजधानी दिल्लीत आल्याचं मुफ्ती म्हणाल्या.
पहिल्या टप्प्यात ६२३
एस टी कर्मचाऱ्यांच्या बदल्या
जे एस टी कर्मचारी संपात सक्रिय आहे आणि त्यांच्याकडून समाजमाध्यमावरून संस्थेबद्दल अपप्रचार करणे, अफवा पसरवून कर्मचाऱ्यांना कामावर जाण्यापासून रोखणे, आगाराच्या प्रवेशद्वारावर हिंसक आंदोलन सुरू ठेवणे, कामावर रुजू झालेल्या कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करणे अशी कृत्ये करून प्रशासकीय कामकाजात अडथळा आणला जात आहे. अशा संपकरी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती एसटीतील अधिकाऱ्यांनी दिली. पहिल्या टप्प्यात ६२३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्याची माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
आतापर्यंत १५० अनोळखी लोकांच्या
अंत्यसंस्काराला ती जाऊन आलीय
एखाद्या अंत्यविधीच्या किंवा अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमाला गेले असाल तर तेथील वातावरण आणि परिस्थितीचा तुम्हाला नक्कीच अंदाज असेल. आपल्या प्रिय व्यक्तीला गमावल्याने रडणारे लोक, उदास चेहरे आणि शांतता असं वातावरण सामान्यपणे दिसून येतं. याच कारणामुळे अनेकजण अंत्यसंस्काराला जाणं टाळतात. पार्थिव पाहिल्याने भिती वाटते आणि मनात निराशा निर्माण होते असं अनेकजण सांगतात. मात्र इंग्लंडमधील एका महिलेला अंतिमसंस्काराच्या कार्यक्रमांना जाण्याची आवड आहे. त्यामुळेच ती आतापर्यंत १५० अनोळखी लोकांच्या अंत्यसंस्काराला जाऊन आलीय. लंडनमधील इजलिंग्टन परिसरामध्ये राहणारी ५५ वर्षीय जीन ट्रेंड हिल या अभिनेत्री आहेत.
शिवेंद्रराजेंना मोठा धक्का! शरद पवारांच्या एका मताने शिवेंद्रराजेंचा पत्ता कट
सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीमध्ये चांगलंच राजकीय नाट्य रंगल्याचं पाहायला मिळालं होतं. आता या निवडणुकांच्या बाबतीत अजून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे नितीन पाटील यांची निवड करण्यात आली आहे.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या शिफारसीनंतर नितीन पाटील यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे. या निवडीमुळे भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. अध्यपदी नितीन पाटील यांची तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची निवड करण्यात आली आहे.
SD social media
9850 60 3590