येत्या वर्षात औरंगाबाद महापालिकेने श्वान प्रेमींना श्वान पाळण्यासाठीचा परवाना अनिवार्य केला आहे. कोरोना काळामुळे अनेकांनी घरात विरंगुळा म्हणून पाळीव प्राणी घेतले आहेत. यात श्वानांचे प्रमाण अधिक आहे. शहरातील हौशी श्वानप्रेमींची संख्याही मोठी आहे. मात्र अनेक नागरिक नियमानुसार, महापालिकेकडून श्वान परवाना घेत नाहीत. त्यामुळे महापालिकेने 1 जानेवारी 2022 पासून परवाना नसलेले श्वान जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
श्वान पाळण्यासाठी महापालिकेकडून परवाना घेणे बंधनकारक असतो. आतापर्यंत महापालिकेने 3 हजार श्वान परवाने दिले. एक वर्षाची मुदत संपल्यानंतर अनेकजण नूतनीकरणासाठी येत नाहीत. नवीन परवान्यासाठी 750 रुपये शुल्क आकारले जाते. नूतनीकरणासाठी 500 रुपये घेतले जातात. शहरात किमान 10 हजार नागरिकांनी असा परवाना घेतला नसल्याचा मनपाचा प्राथमिक अंदाज आहे.
शहरातील श्वान प्रेमींनी आपल्या पाळीव प्राण्यासाठीचे परवाने येत्या 31 डिसेंबर 2021 पर्यंत काढून घ्यावेत तसेच ज्यांच्याकडे परवाना असेल त्यांनी त्याचे नूतनीकरण करून घ्यावे, असे आवाहान महापालिकेचे उपायुक्त सौरभ जोशी यांनी केले आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या नागरिकांचे श्वान जप्त केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.