एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला खिंडार पडलं आहे. आमदार आणि खासदारांना आपल्या गटात खेचल्यानंतर आता एकनाथ शिंदे मोठा खेळ करण्याच्या तयारीत आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांची भेट घेत आहेत. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्यांची आपण सदिच्छा भेट घेत असल्याचं शिंदे सांगत असले तरी यामागे शिवसेना ताब्यात घेण्याची त्यांची रणनिती तर नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे ज्या नेत्यांची भेट घेत आहेत यातले सगळेच नेते हे शिवसेना पक्षाच्या नेतेपदी निवड झालेले आहेत, तसंच त्यांच्या नावांची नोंदणी निवडणूक आयोगाकडेही आहे.
शिवसेना संघटनेमधली पदं
शिवसेना संघटनेमध्ये एकूण 9 पदं आहेत, यात शिवसेना पक्षप्रमुख, शिवसेना नेते, शिवसेना उपनेते, सचिव, संसदेच्या दोन्ही सभागृहांचे खासदार, दोन्ही सभागृहांचे आमदार, जिल्हा संपर्क प्रमुख आणि मुंबईचे विभागप्रमुख अशा 9 पदांवर 282 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघाचे 6 विभागप्रमुख शिवसेनेच्या या कार्यकारिणीमध्ये आहेत.
शिवसेना तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह नेमकं कुणाचं? हा वाद आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. निवडणूक आयोगाच्या सुनावणीवेळी शिवसेनेच्या 9 पदांवरचे 282 जण नेमकी काय भूमिका घेणार, यावर शिवसेना एकनाथ शिंदेंची राहणार का उद्धव ठाकरेंची यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. शिंदेंनी आधीच आमदार-खासदारांना आपल्याबाजूला वळवून शिवसेना विधीमंडळ पक्ष आपल्या ताब्यात घेतला आहे. आता त्यांची पुढची पावलं पक्षावर पकड मिळवण्याकडे जात असल्याचं या भेटींवरून दिसत आहे.
निवडणूक आयोगाच्या कायद्यानुसार देशातल्या प्रत्येक पक्षाला प्रत्येक 5 वर्षांनी संघटनात्मक निवडणूक घ्यावी लागते. या निवडणुकीमध्ये पक्षप्रमुखासह इतर पदांचाही समावेश असतो. याआधी 2018 साली शिवसेनेमध्ये अंतर्गत निवडणूक झाली होती. या निवडणुकीनंतर शिवसेनेमध्ये झालेल्या नियुक्त्यांबाबतची माहिती त्यांनी निवडणूक आयोगाला दिली आहे. शिवसेनेने दिलेलं हे पत्र निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरही उपलब्ध आहे.
शिवसेनेची संस्थात्मक रचना
पक्षप्रमुख
उद्धव ठाकरे
नेते
आदित्य ठाकरे, मनोहर जोशी, सुधीर जोशी, लिलाधर ढाके, सुभाष देसाई, दिवाकर रावते, रामदास कदम, संजय राऊत, गजानन किर्तीकर, अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ, एकनाथ शिंदे
शिवसेना नेत्यांमधल्या सुधीर जोशी यांचं काहीच महिन्यांपूर्वी निधन झालं आहे.
शिवसेना उपनेते
अनंत गिते, अरविंद सावंत, रवींद्र मिर्लेकर, अनंत तरे, विश्वनाथ नेरुरकर, सूर्यकांत महाडिक, चंद्रकांत खैरे, विनोद घोसाळकर, आनंदराव अडसूळ, गुलाबराव पाटील, बबनराव घोलप, अनिल राठोड, अशोक शिंदे, यशवंत जाधव, नीलम गोऱ्हे, विशाखा राऊत, मीना कांबळी, विजय कदम, सुहास सामंत, नितीन बानगुडे पाटील
शिवसेना उपनेत्यांमध्ये अमोल कोल्हे यांचंही नाव होतं, पण त्यांनी 2019 निवडणुकीआधी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला.
2017 साली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अनंत गिते, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना नेते म्हणून नियुक्ती केली होती. तसंच उपनेते म्हणून ठाकरेंनी आणखी 12 नियुक्त्या केल्या होत्या. यात सुबोध आचार्य, दशरथ पाटील, विजय नाहाटा, शशिकांत सुतार, शरद पोंक्षे, हाजी अराफत शेख, लक्ष्मण वडळे, राजकुमार बाफना, अल्ताफ शेख, तानाजी सावंत, रघुनाथ कुचिक आणि विठ्ठलराव गायकवाड यांचा समावेश होता.
शिवसेनेचे सचिव अनिल देसाई यांनी निवडणूक आयोगाला 27 फेब्रुवारी 2018 साली शिवसेनेच्या या सगळ्या संघटनात्मक नावांची यादी दिली होती.
पुढे काय होणार?
आता एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांना हे नेते नेमके कुणासोबत आहेत, हे निवडणूक आयोगापुढे सिद्ध करावं लागेल. यानंतर ज्यांच्याकडे सर्वाधिक नेते, उपनेते, आमदार, खासदार, सचिव, जिल्हा संपर्क प्रमुख तसंच विभाग प्रमुख असतील, त्यांनाच खरी शिवसेना म्हणून मान्यता दिली जाऊ शकते. या गोष्टींच्या सुनावणीची प्रक्रिया फारच किचकट असल्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय येईपर्यंत शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलंही जाऊ शकतं. शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यात आलं तर मात्र ठाकरे गट आणि शिंदे गट यांना निवडणुका वेगळ्या चिन्हावर लढवाव्या लागू शकतात.