सप्टेंबर महिन्यात राज्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका असल्यामुळे पुण्यातील सार्वजनिक गणेश मंडळांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भाविकांना गणपतीचे दर्शन घेता यावे यासाठी फेसबुक व इन्स्टाग्रामसह अन्य व्यासपीठांवर ऑनलाईन स्ट्रीमिंग करण्यात येणार आहे. पुण्यातील मानाच्या आणि प्रतिष्ठित गणपती मंडळांना दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. मात्र, कोरोनाच्या निर्बंधांमुळे सलग दुसऱ्यावर्षी भाविक लाडक्या गणरायाच्या दर्शनाला मुकण्याची शक्यता होती.
त्यामुळे सर्व प्रतिष्ठित गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आपापल्या गणपतीचे दर्शन भाविकांना ऑनलाईन घेता येईल, यासाठी खास सोय करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठकीच्यावेळी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी गणेशमूर्ती या मंदिर आणि लहान मंडपात स्थापन करणार असल्याचेही सांगितले.
काही दिवसांपूर्वीच मुंबई महानगरपालिका आणि गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली होती. यामध्ये गणेशोत्सवासाठीची नियमावली निश्चित करण्यात आली होती. मोठ्या मंडळाच्या मूर्तींचं विसर्जन कृत्रिम तलावात न करता विसर्जनस्थळी (चौपट्यावर) विसर्जन करता येणार आहे. तसेच ठराविक कार्यकर्त्यांसह हे विसर्जन करता येणार असून, विसर्जन मिरवणूक काढता येणार नाही, असंही बैठकीत ठरलंय.
अशी असणार नियमावली?
• सार्वजनिक गणेशोत्सव मूर्तीच्या उंचीची मर्यादा 4 फूट राहणार
• घरगुती गणेशमूर्ती 2 फूट उंचीची असावी
• गर्दी होणार नाही याची काळजी गणेशमंडळांना घ्यावी लागणार
• 84 नैसर्गिक गणेश विसर्जन ठिकाणांची निर्मिती
• विसर्जन ठिकाणी महापालिकेला मूर्ती द्यावी लागेल
• त्यानंतर महापालिका गणेश विसर्जन करणार आहे
• सार्वजनिक मूर्ती विसर्जनासाठी 10 कार्यकर्त्यांना परवानगी
• लहान मुले आणि ज्येष्ठांनी विसर्जनच्या ठिकाणी जाऊ नये
• ऑनलाईन दर्शनाची सोय करावी
• नागरिक देतील ती वर्गणी स्वीकारावी
• शक्यतो मंडप परिसरात होणारी गर्दी टाळावी.
• सांस्कृतिक उपक्रमाऐवजी आरोग्य कार्यक्रम राबवावेत
• आरती, भजन, कीर्तन यादरम्यान होणारी गर्दी टाळावी.
• नागरिकांची गर्दी होऊ नये या अनुषंगाने गणपतीचे दर्शन ऑनलाईन पद्धतीने ठेवावे.
• गणपती मंडपात निर्जंतुकीकरण आणि थर्मल स्क्रिनिंगची पर्याप्त व्यवस्था करण्यात यावी