एटीएम मशीनमधून पैसे काढताना तांत्रिक बिघाड करून लाखो रुपये काढणाऱ्या 4 जणांच्या आंतरराज्यीय टोळीला वाशिम पोलिसांनी जेरबंद केलं आहे. या प्रकरणातील सर्व 5 ही आरोपी हे उत्तर प्रदेशातील असून मुख्य आरोपी कानपूरच्या जेलमध्ये आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम अर्बन बँकेच्या विविध एटीममधून रक्कम काढत असताना आरोपी एटीममधून पैसे निघतात त्यावेळी त्या ठिकाणी बोट किंवा पेन लावून धरत, त्यामुळे एटीएमचं पैसे निघण्याचं शटर बंद होत नव्हतं. त्यामुळे एटीएममध्ये तांत्रिक बिघाड दिसत होता. तरी आरोपींना प्रत्यक्ष रक्कम मिळत होती आणि ती रक्कम त्यांच्या खात्यातून वजा होत नव्हती.
या आरोपींनी अशी 7 लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली. यासाठी या आरोपींनी वेगवेगळ्या दहा बँकेचे स्वतःच्या खात्याचे 20 एटीम कार्ड वापरल्याची माहिती पोलिसांनी दिली. वाशिम अर्बन बँकेच्या तक्रारी नंतर वाशिम शहर पोलीस स्टेशन मध्ये फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या मधील मुख्य आरोपी अरविंद कुमार अवस्थी त्याच्या जवळचे वेगवेगळे एटीएम कार्ड वैभव ऋषभदेव पाठक, सत्यम शिवशंकर यादव, सौरभ मनोज गुप्ता आणि प्रांजल जयनारायण यादव या आरोपींना देऊन परराज्यातील एटीएम मधून पैसे काढण्यास सांगत असे. या चार आरोपींना अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आलं असून यापैकी मुख्य आरोपी अरविंद कुमार अवस्थी सध्या उत्तर प्रदेशच्या कानपूर कारागृहात आहे. त्याला ताब्यात घेऊन या अनोख्या पद्धतीनं एटीएम मधून लाखोंची रक्कम हडपणाऱ्या आंतरराज्यीय टोळी कडून आणखी कोणते कोणते गुन्हे उघडकीस येतात याचा तपास वाशिमचे स्थानिक गुन्हे शाखेचं पथक करत आहे.