डोळ्यांदेखत 15 मिनिटात गारपीटीने 25 लाखाची माती
जिल्ह्यात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. गारपीट होऊन गेल्यानंतर याची दाहकता समोर येत आहे. धारूर तालुक्यात धुनकवड गावातील तरुण शेतकरी कल्याण कुलकर्णी यांच्या शेतातील 1100 आंब्याची झाडे आहेत. त्यावर बहरलेले आंबे पाहून यावर्षी आंबे कमी असल्याने भाव चांगला मिळून 25 ते 30 लाखाचे उत्पन्न निघेल अशी स्वप्न कल्याण कुलकर्णी यांनी पाहिली होती. मात्र, पंधरा मिनिटाच्या गारपिटीने या शेतकऱ्याच्या आंब्याच्या बागेचं होत्याचं नव्हतं केलं आहे. जवळपास अंदाजे 15 टन आंब्याचे सुमारे 25 लाख रुपयांचे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेल्याने शेतकरी हतबल झाला आहे.
संजय राऊतांवर निशाणा साधताना भुसेंनी घेतलं शरद पवारांचं नाव, अजितदादा संतापले
संजय राऊत यांनी शिवसेना नेते आणि मंत्री दादा भुसे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. संजय राऊत यांनी केलेल्या या आरोपांना दादा भुसे यांनी विधानसभेत प्रत्युत्तर दिलं, पण त्यांनी शरद पवारांचं नाव घेतल्यामुळे अजित पवारांसह विरोधक चांगलेच आक्रमक झाले, तसंच दादा भुसेंनी माफी मागावी, अशी मागणीही अजित पवार यांनी केली.’आम्हाला गद्दार म्हणाले, मात्र आमच्याच मतांवर निवडून गेलेले महागद्दार काल माझ्या संदर्भात बोलले. त्यांनी ट्वीट केलं, जर त्यात तथ्य असेल तर कारवाई करावी, नाहीतर खासदारकीचा राजीनामा द्यावा. हे मातोश्रीची भाकरी खातात आणि राष्ट्रवादीची शरद पवारांची चाकरी करतात. त्यांनी माफी मागावी, नाही तर त्यांना जागा दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही,’ असं दादा भुसे म्हणाले.
अंडे फेकले, शाई तोंडाला फासली, धुळे पालिकेत राष्ट्रवादीचा तुफान राडा
धुळे महापालिकेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने राडा केल्याचा प्रकार समोर आला आहे. कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराच्या व्यवस्थापकालाचा काळे फासून मारहाण करण्यात आली आहे. या घटनेमुळे महापालिकेमध्ये एकच गोंधळ उडाला.शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले असताना नियमित स्वच्छता होत नसल्याचा राष्ट्रवादी काँग्रेसने आरोप केला. यासाठी राष्ट्रवादीकडून आंदोलन करण्यात आलं. पण, आंदोलनादरम्यान ठेकेदाराच्या व्यवस्थापकाने धुळेकर नागरिकांबद्दल अपशब्द वापरला.धुळेकरांबद्दल अपशब्द वापरल्यामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संतापले आणि व्यवस्थापकाला जाब विचारला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी व्यवस्थापकाला चोपललं. एवढंच नाहीतर व्यवस्थापकावर शाई आणि अंडेदेखील फेकण्यात आले. तसंच शिवीगाळ करत मारहाणही करण्यात आली. कचरा संकलक ठेकेदारामुळे शहरात कचऱ्याचे ढिग साचले असून, मनमानी करत असल्याचा राष्ट्रवादीचा आरोप आहे. या घटनेमुळे पालिकेमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
उद्धव ठाकरेंनंतर निवडणूक आयोगाचा पवारांना धक्का, राष्ट्रवादीच्या घड्याळाबाबत मोठा निर्णय!
उद्धव ठाकरे यांच्याकडून शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर आता निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्याच्या तयारीत आहे. निवडणूक आयोग राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात आलेल्या राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाची समीक्षा करणार आहे, यासाठी निवडणूक आयोगाने पक्षाच्या प्रतिनिधीला आज निवडणूक आयोगाच्या कार्यालयात बोलावलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आता राष्ट्रीय पक्षाच्या दर्जाखाली राहू शकत नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
एखादा राजकीय पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून दर्जा तेव्हाच प्राप्त होतो जेव्हा त्याला लोकसभा निवडणुकीवेळी चार किंवा त्यापेक्षा जास्त राज्यांमध्ये 6 टक्क्यांपेक्षा जास्त मतं मिळतात. याशिवाय पक्षाला लोकसभेच्या एकूण जागांच्या 2 टक्के म्हणजेच तीन राज्यांमधून 11 जागा जिंकाव्या लागतात.
महाराष्ट्रात पाऊस अजून किती दिवस?
मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पाऊस थैमान घालू लागला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने राज्यात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे.दरम्यान राज्यातील विदर्भामध्ये बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या भागात जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागाने अंदाजही वर्तवला आहे.दक्षिण कर्नाटकपासून मराठवाडा, पश्चिम विदर्भापर्यंत समुद्रसपाटीपासून 900 मीटर उंचीवर हवेच्या कमी दाबाचा पट्टा तामिळनाडू ते छत्तीसगडपर्यंत विस्तारला आहे. यामुळे विदर्भासह मराठवाड्यात पावसाची शक्यता आहे.दरम्यान झालेल्या पावसाने राज्याती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आंबा, केळी, द्राक्षे, डाळिंब या फळबागांसह राज्यातील कांदा उत्पादकांना वादळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.
अनेक वर्ष ग्लॅमरस भूमिकेत दिसली अभिनेत्री अन् वयाच्या 55व्या वर्षी मिळाला बेस्ट सासूचा अवॉर्ड
‘मी आले निघाले’, ‘चोरीचा मामला’, ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला’ सारख्या गाण्यांची सुरेख नायिका म्हणजे मराठमोळी अभिनेत्री वर्षा उसगावकर. 80 आणि 90च्या दशकात मराठी सिनेमातील एक ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून वर्षा उसगावकर यांचं नाव समोर येतं. मराठी, हिंदी नाटक तसेच सिनेमा आणि आता मालिकेतून वर्षा उसगावकर यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मूळच्या गोव्याच्या असलेल्या वर्षा उसगावकर यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत आपली नवी ओळख निर्माण केली. सचिन पिळगावकर, अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे सारख्या दिग्गज कलाकारांबरोबर त्यांनी स्क्रिन शेअर करत प्रेक्षकांना आपल्या प्रेमात पाडलं. पण तुम्हाला माहिती आहे का, अनेक वर्ष मराठी सिनेसृष्टी आणि लाखो प्रेक्षकांच्या गळ्याती ताईत असलेल्या वर्षा उसगावकर यांना वयाच्या 55 व्या वर्षी सर्वोत्कृष्ट सासू पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.वर्षा उसगावकर या सध्या स्टार प्रवाहवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत काम करत आहेत. मालिकेत त्यांनी साकारलेली नंदिनी ही भूमिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. वयाच्या 55व्या वर्षी देखील वर्षा उसगावकर यांचं सौंदर्य कायम आहे. एखाद्या वीशीतील मुलीप्रमाणे त्या सुंदर आणि तितक्याच ग्लॅमरस दिसतात. मालिकेतील कोल्हापूरी बोलणारी तीन मुलांची आई आणि सासू वर्षा उसगावकर यांनी उत्तमरित्या साकारली आहे. नंदिनी या भूमिकेसाठी वर्षा उसगावकर यांना नुकताच स्टार प्रवाह पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट सासू हा मिळाला.
‘आपला देश राजकारणी लोकांनी जास्त लुटला… ‘ अभिनेते सयाजी शिंदेंचं मोठं वक्तव्य
मराठी-हिंदी आणि दाक्षिणात्य अशा सर्वच भाषिक चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडलेले अभिनेते म्हणजे सयाजी शिंदे होय. सयाजी शिंदेंचा मोठा चाहतावर्ग आहे. या अभिनेत्याने विविध सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. पडद्यावर खतरनाक खलनायक म्हणून प्रसिद्ध असणारे सयाजी खऱ्या आयुष्यात मात्र रिअल हिरो आहेत. सयाजी शिंदे राज्यात ठिकठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी ओळखले जातात. अभिनेते सयाजी शिंदे यांनी वृक्ष मित्र आणि नागरिकांच्या पुढाकारातून ठिकठिकाणी काम सुरु आहे. आता याबद्दल सयाजी शिंदे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.
बीड जिल्ह्यात काही ठिकाणी वृक्षलागवड करण्यात आली. या कार्यक्रमात सयाजी शिंदे सहभागी झाले होते. तेव्हा त्यांनी भारतात घटणाऱ्या वृक्षक्षेत्रावर आपलं मत मांडलं आहे. वनदिनानिमित्त आयोजित या कार्यक्रमात ‘झाड तोडणाऱ्यांना दहशत बसेल असे मजबूत कायदे करा..वन कायदे रिवाईस झाले पाहिजे..’ अशी मागणी सरकारकडे करणार असल्याचं सांगितलं आहे. यावेळी बोलताना वृक्ष लागवडीसह इतर 70 वर्षाचा हिशोब काढला तर इंग्रजां पेक्षा आपला देश आपल्याच राजकारणी लोकांनी जास्त लुटला असा आरोप सीने अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे.
जावयानंतर सासऱ्याचा संघही चॅम्पियन, आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्स ठरले LLC किंग
जावयानंतर सासऱ्यानेसुद्धा संघाला चॅम्पियन बनवलं. एक दिवस आधीच शाहीद आफ्रिदीचा जावई शाहीन आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली लाहोर कलंदर्सने पाकिस्तान सुपर लीगचं विजेतेपद पटकावलं. त्यानंतर आता शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखाली एशिया लायन्सने लीजेंड्स लीग क्रिकेट मास्टर्सचे विजेतेपद पटकावले. लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये एशिया लायन्स आणि वर्ल्ड जायंट्स यांच्यात अंतिम सामना झाला. दोहामध्ये झालेल्या या सामन्यात शाहीद आफ्रिदीच्या नेतृत्वाखील एशिया लायन्सने वर्ल्ड जायंट्सवर एकतर्फी विजय मिळवला. वर्ल्ड जायंट्सचा संघ पूर्ण सामन्यात एशिया जायंट्ससमोर हतबल दिसून आला.
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांना मातृशोक
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांच्या मातोश्री आणि हिंदू महासभेचे माजी अध्यक्ष व ‘प्रज्वलंत’ मासिकाचे संपादक दिवंगत विक्रम सावरकर यांच्या पत्नी स्वामिनी सावरकर यांचे आज मंगळवारी २१ मार्च २०२३ या दिवशी पुणे येथे निधन झाले. त्या ८४ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर पुणे येथे वैकुंठ स्मशानभूमीत सायंकाळी ७ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आदित्य ठाकरेंच्या लग्नावरून सभागृहात पिकला हशा! फडणवीस म्हणाले,”आम्ही जबाबदारी घ्यायला तयार”
महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे आरोप-प्रत्यारोपांची पेटती भट्टीच म्हणता येईल. कारण विरोधक आरोप करतात, सरकार उत्तर देतं. कधी सरकार भूमिका मांडतं आणि विरोधक शांत होतात. अशा या खडाजंगी पाहिल्या जाणाऱ्या विधानसभेत आदित्य ठाकरेंच्या लग्नाचा विषय निघाला आणि एकच हशा पिकला. सभागृहातले सत्ताधारी आणि विरोधी बाकांवरचे आमदार खळखळून हसले. एवढंच काय आदित्य ठाकरेही मनमुरादपणे हसताना दिसले.
Foxcon ‘या’ राज्यात करणार तब्बल ८ हजार कोटींची गुंतवणूक, ५० हजार रोजगार निर्मिती होणार
iPhone ची सर्वात मोठी कंत्राटी उत्पादक कंपनी फॉक्सकॉन बंगळुरूमध्ये एक प्लांट उभा करणार आहे. यासाठी फॉक्सकॉनची कर्नाटक सरकारशी चर्चा सुरु होती. अखेर कर्नाटक सरकारने या प्लांट उभारणीला मंजुरी दिल्याने फॉक्सकॉन कंपनीचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्नाटक सरकारने ८ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून बांधण्यात येणाऱ्या आयफोन निर्मितीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे.मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या अध्यक्षतेखालील राज्य उच्चस्तरीय मंजुरी समितीने होन हाय टेक्नॉलॉजी ग्रुप (फॉक्सकॉन) च्या मोबाईल फोन उत्पादन युनिटला मंजुरी दिली आहे. यातून सुमारे ५०,००० नोकऱ्या निर्माण होतील असा सरकारचा अंदाज आहे. फॉक्सकॉनचा नवा प्लांट बंगळुरू आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ ३०० एकर जागेवर बांधला जाणार आहे. या कंपनीचा भारतातील सर्वात मोठा उत्पादन कारखाना असणार आहे. यामुळे पुढील १० वर्षांमध्ये तब्बल १ लाख रोजगार निर्माण होण्याची अपेक्षा आहे. याबाबतचे वृत्त डेक्कन हेराल्ड या वृत्तसंस्थेने दिले आहे.
चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यातील काही भागांसह तेलंगणा राज्यात भूकंपाचे धक्के
जिल्ह्यातील गोंडपिंपरी तालुका तसेच गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यातील महागाव (बु.) येथे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याची माहिती आहे. तेलंगणा राज्यातही काही भागांना भूकंपाचे सौम्य धक्के बसले आहेत. भूकंपाची तीव्रता ३.१ रिष्टर स्केल होती. जमिनीच्या ५ किमी आत हे धक्के बसल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.
किरण खेर यांना करोनाची लागण, ट्वीट करत दिली माहिती
ज्येष्ठ अभिनेत्री आणि भाजपा खासदार किरण खेर यांना करोनाची लागण झाली आहे. स्वतः किरण यांनी याबद्दल माहिती दिली आहे. किरण यांना दोन वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं, अशातच आता त्यांना करोना झाला आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
जितेंद्र आव्हाडांच्या लढ्याला मोठं यश, महेश आहेर यांच्याबद्दल विधानसभेत अखेर घोषणा
ठाणे महापालिकेचे वादग्रस्त साहाय्यक आयुक्त महेश आहेर यांचा कार्यभार काढल्याची घोषणा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधान परिषदेत केली आहे. आहेर यांच्याविरोधात आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या कुटुंबियांना आहेर यांच्यापासून धोका असल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आहेर यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फतही स्वतंत्र चौकशी करण्यात येत होती. अखेर आहेर यांच्यावर कारवाई करण्यात आली असून त्यांचा कार्यभार काढून घेण्यात आला आहे.
SD Social Media
9850 60 3590