राज्यभरात कोरोनाचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली. कोरोना लसीकरणाच्या जनजागृतीचा विडाच त्यांनी उचलला. कोरोनाची आलेली तिसरी तीव्र लाट पाहता एकीकडे राज्यासह जिल्ह्यात कोरोनाच्या बूस्टर डोसला सुरुवात झाली. मात्र, दुसरीकडे नाशिक जिल्ह्यातील तब्बल 22 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनीच कोरोना लसीचा दुसरा डोसच घेतला नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. त्यामुळे आरोग्य प्रशासनाचे धाबे दणाणले आहे. हे पहिल्या फळीतले कर्मचारीच ऐनवेळी आजारी पडले आणि लाट तीव्र झाली, तर करायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये सुरुवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, तत्पूर्वी नाशिक जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोसच घेतला नसल्याचे समोर आले आहे. 16 जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरू होऊनही अद्याप जिल्ह्यातील जवळपास 22 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. याबद्दल आरोग्य विभागाने चिंता व्यक्त केली आहे. याता या कर्मचाऱ्यांचे लसीकरण कसे वाढवायचे, लोकांचे प्रबोधन करणाऱ्या कर्मचाऱ्यांचेच प्रबोधन कसे करायचे, असे कोडे या विभासमोर तूर्तास आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यात असलेल्या लासलगावजवळील निमगाव वाकडा प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणासाठी नाशिक जिल्ह्यात आघाडीवर असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. येथे 15 ते 18 वय गटातील 2 हजार 443 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले आहे. तसेच आतापर्यंत लसीकरणाचा पहिला डोस 43 हजार 382 जणांना देत 102 टक्क्यांवर गेले असून, तर लसीकरणाचा दुसरा डोस 23 हजार 980 जणांना देत ते 55 टक्क्यांवर गेले आहे. आता बूस्टर डोसला सुरुवात झाली असून, 50 जणांना आज बूस्टर डोस देण्यात आले असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
नाशिकमध्ये बूस्टर डोसला सुरुवात करण्यात आली आहे. नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांना पहिला बूस्टर डोस देण्यात आला. जिल्ह्यात 45 हजार हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर बंधनकारक आहे. 10 एप्रिल 2021 पू्र्वी डोस घेतलेले असे 45 हजार हेल्थ वर्कर्स या मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. शिवाय नागरिकांच्या लसीकरणालाही गती देण्यात येणार आहे.