ऑक्सीजन पुरवठ्यात किती दिवसात फरक पडेल, सरकारला हे सांगावे लागेल : न्यायालय
देशात दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर आज सर्वोच्च न्यायालयात ऑक्सिजन पुरवठा, औषध पुरवठा व इतर धोरणां संबंधीच्या मुद्यांवर सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी म्हटले की, ऑक्सिजन पुरवठ्याबाबत एक अशी व्यवस्था बनवली जावी, ज्याद्वारे लोकांना कळाले पाहिजे की ऑक्सिजनचा किती प्रमाणात पुरवठा केला गेला आहे आणि कोणत्या रूग्णालयात किती ऑक्सिजन उपलब्ध आहे. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, नागरीक ऑक्सिजन सिलिंडरसाठी रडत आहेत. सरकारला आम्हाला हे सांगाव लागेल की सुनावणीनंतरच्या दिवसापासून परिस्थीतीत काय फरक पडेल.”
मदत मागणाऱ्यांवर कारवाई
करणाऱ्यांना न्यायालयाने खडसावले
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात आरोग्य सुविधांचा बोजवारा उडाला आहे. लोक ऑक्सिजन, बेड आणि औषधींविना तडफडून मरत असल्याचं दृश्य असून, याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयाने स्यू मोटू याचिका दाखल करून घेतली होती. आजही न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती एल. नागेश्वर राव आणि न्यायमूर्ती एस. रवींद्र भट यांच्या खंठपीठाने केंद्र आणि राज्ये सरकारांना फैलावर घेतले. सोशल मीडिया वरून मदत मागणाऱ्यांवर काही राज्यात कारवाई केल्याचा संदर्भ व घेत न्यायालयाने अशा राज्यांना खडे बोल सुनावले आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून एसओएस संदेश पाठवणाऱ्या नागरिकांवर काही राज्यांत कारवाई करण्यात आल्याच्या घटनांवर न्यायालयाने संताप व्यक्त केला.
१०० टक्के लसी केंद्र सरकारच
का विकत घेत नाही : न्यायालय
देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातलेलं असतानाच सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावरुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने निरक्षर व्यक्तींची लसीकरणासाठी नोंदणी कशी करणार आहे असं न्यायालयाने विचारलं आहे. ज्या लोकांकडे इंटरनेटची सुविधा नाहीय त्यांची नोंदणी कशी होणार असा प्रश्न न्यायालयाने उपस्थित केलाय. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी ‘राष्ट्रीय लसीकरण धोरणा’चे पालन करोना लसीकरणाच्या प्रक्रियेत केलं पाहिजे असं मत नोंदवलं आहे. तसेच सर्व करोना लसींची खरेदी म्हणजेच १०० टक्के लसी केंद्र सरकारच का विकत घेत नाही, असा प्रश्न देखील सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला विचारला आहे.
माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी
यांचं करोनामुळे निधन
भारताचे माजी अॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचं करोनामुळे निधन झालं आहे. ते ९१ वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. दक्षिण दिल्लीमधील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते अशी माहिती कुटुंबातील सूत्रांनी दिली आहे.
मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड
याचं नुकतंच करोनामुळे निधन
करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला असून दैनंदिन रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्याही उच्चांक गाठत असून चिंतेचा विषय ठरत आहे. मात्र अद्यापही अनेकजण आपण एकदम ठणठणीत असून करोना होणार नाही अशा गैरसमजात आहेत. तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर थांबा…कारण ही बातमी वाचून तुम्हीदेखील खडबडून जागे व्हाल. कारण मराठमोळा बॉडीबिल्डर जगदीश लाड याचं नुकतंच करोनामुळे निधन झालं आहे. तो ३४ वर्षांचा होता. बडोद्यात त्याने अखेरचा श्वास घेतला.
पत्रकार रोहित सरदाना यांचं
करोनामुळे निधन
वरीष्ठ टीव्ही पत्रकार आणि आज तक वाहिनीचे न्यूज अँकर रोहित सरदाना यांचं करोनामुळे आज सकाळी निधन झालं. त्यांचे एकेकाळचे सहकारी आणि झी न्यूजचे मुख्य संपादक सुधीर चौधरी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रोहित सरदाना हे झी न्यूजसोबत होते. २०१७मध्ये त्यांनी झी न्यूज सोडून आजतकमध्ये आपल्या प्रसारमाध्यमातील प्रवासाला सुरुवात केली. २०१८मध्ये त्यांना पत्रकारितेतील मानाच्या गणेश विद्यार्थी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २४ एप्रिल रोजी रोहित सरदाना यांनी स्वत:च आपल्याला करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं.
मिशन ऑक्सिजन मोहिमेसाठी
तेंडुलकरने दिले एक कोटी
भारताचा क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर करोनाविरोधातील लढ्यात मैदानात उतरला आहे. सचिनने मिशन ऑक्सिजनसाठी तब्बल एक कोटी रुपयांची मदत केली आहे. सचिन तेंडूलकरने मिशन ऑक्सिजन या मोहिमेसाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. 250 उद्योजक तरूणांनी सुरू केलेल्या या मोहिमेत सचिनने सहभाग घेतला आहे. यापूर्वी गेल्या वर्षीही सचिनने अशीच मदत केली होती. तेव्हा त्याने पंतप्रधान सहाय्यता निधी आणि महाराष्ट्रातील मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी प्रत्येकी 25 लाख रुपयांचा निधी दिला होता. ऑक्सिजन मोहिमेसाठी एक कोटी रुपयांची मदत करत असल्याची माहिती सचिनने ट्विटरद्वारे दिली.
तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात
घेऊन नियोजन करा : मुख्यमंत्री
कोविडच्या तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन सर्व जिल्ह्यांनी कोणत्याही परिस्थितीत त्यांच्याकडील ऑक्सिजन प्रकल्प तात्काळ उभारले जातील, आवश्यक औषधांचा साठा राहील याची अतिशय काटेकोरपणे काळजी घ्यावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. निर्बंधाच्या काळात दुर्बल घटकांसाठीच्या जाहीर पॅकेजप्रमाणे या घटकांना तात्काळ लाभ द्यावा. केवळ घोषणा नव्हे तर त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी झालेली दिसली पाहिजे, अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनांना दिल्या. ते कोविड परिस्थितीसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलत होते.
लहान मुलांच्या भविष्याचा विचार
करा सोनू सूदची मागणी
अभिनेता सोनू सूदने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ शेअर केलाय. सध्याच्या करोना काळात ज्या लहान मुलांच्या आई-वडीलांचा मृत्यू झालाय, त्या मुलांच्या भविष्याबाबत विचार करा, अशी मागणीच सोनू सूदने सरकारकडे या व्हिडीओमधून केलीये. सोनू सूद म्हणाला, ” नमस्कार, मी सरकार आणि सगळ्या संस्थांकडे विनंती करतोय…आपण पाहतोय, सध्याच्या करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे अनेकजण आपल्या परिवारातील कोणत्या ना कोणत्या सदस्यांना गमावून बसतोय…लहान मुलांनी देखील त्यांचे आई-वडील गमावलेत…कुणाची आई या लहानग्यांपासून दूरावली तर कुणाचे वडील…कुणी केवळ ९ वर्षाचा तर कुणी ८-१२ वर्षाची लहान मुलं..या लहान मुला-मुलींचं पुढचं भविष्य काय असेल याचा विचार कायम डोक्यात फिरतोय..”
मृत रुग्णाच्या खिशातील
35 हजार रुपये लंपास
माणुसकीचे अध:पतन करणाऱ्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत. यामध्ये आता आणखी एका घटनेची भर पडली आहे. धुळ्यातील एका रुग्णालयात उपचाराधीन असलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांनी त्याच्या खिशातील पैसे चोरल्याचे समोर आले आहे. या घटनेमुळे माणुसकी खरंच संपली आहे की काय, असा प्रश्न पुन्हा एकदा उद्भवला आहे. धुळ्यातील श्री गणेशा मल्टी स्पेशालिटी दवाखान्यात हा प्रकार घडला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
इस्राईलमध्ये चेंगराचेंगरी
15 लोकांचा मृत्यू
इस्राईलमध्ये धार्मिक उत्सवाच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत जवळपास 12 ते 15 लोकांचा मृत्यू झालाय. देशातील नॅशनल इमरजन्सी सर्व्हिस ‘मॅगन डेव्हिड एडम’ ने दुर्घटनेला दुजोरा दिला आहे. परंतु या दुर्घटनेत नक्की किती लोकांचा जीव गेलाय, याचा आकडा त्यांनी सांगितलेला नाही. इस्राईलच्या ईशान्य भागात झालेल्या चेंगराचेंगरीत अनेक लोक जखमीही झाले आहेत. या चेंगराचेंगरीत 38 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी ‘हारेत्झ’ वृत्तपत्राने दिली आहे. सध्या आपत्कालीन सेवा घटनास्थळावरून जखमींना बाहेर काढण्यात व्यस्त आहे.
भाजपाचे प्रवक्ते म्हणतात, आम्हाला
दाभोळकरांचे संस्कार नको
नागपुरातील 85 वर्षीय भाऊराव दाभाडकर यांनी एका तरुणासाठी आपला बेड सोडला. त्यानंतर दोन दिवसांत त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आता भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी “आम्हाला दाभाडकरांचे संस्कार हवेत, दाभोळकरांचे नाही…….” असे वादग्रस्त ट्विट केले. त्यांच्या या ट्विटनंतर राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
15 मे पर्यंत पुण्यात
लॉकडाऊन कायम
रुग्णांची संख्या वाढत असल्याने पुण्यातील लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. येत्या 15 मे पर्यंत पुण्यात लॉकडाऊन कायम असणार असल्याची माहिती पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. त्यामुळे पुणेकरांना 15 मेपर्यंत सक्तीने कोरोना नियमांचं पालन करावं लागणार आहे.
जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर
यांना कोरोनाची लागण
बॉलिवूडचे जेष्ठ अभिनेते रणधीर कपूर यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना सध्या मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याक्षणी त्यांची प्रकृती अधिक चांगली आहे. रणधीर यांच्या कर्मचारी वर्गातील 5 सदस्यही कोरोना पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांनाही या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दरम्यान रणधीर यांनी आता एक मोठा खुलासा केला आहे. त्यांनी सांगितले की, ते ज्या ठिकाणी मोठे झाले, ते त्यांचे वडिलोपार्जित चेंबूरचे घर लवकरच विकण्यात येणार आहे.
SD social media
9850 60 3590