शिवसेनेच्या व्हीपला एकनाथ शिंदेंचं एका वाक्यात उत्तर

विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना आता वेग आला आहे. विधानसभेच्या अध्यक्षपदाची आज निवडणूक होणार आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून कुलाब्याचे आमदार राहुल नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ही निवडणूक आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळे कोण कुणाला मत देणार हे उघडपणे स्पष्ट होईल. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात असलेल्या शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्व आमदारांसाठी व्हीप लागू केला आहे. या व्हीपमध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राजन साळवी यांना मतदान करण्याबाबतचा आदेश देण्यात आला आहे. हा व्हीप सर्व शिवसेनेच्या आमदारांसाठी लागू असणार आहे. पण शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या व्हीपला विरोध केला आहे. शिवसेनेचा व्हीप आम्हाला लागू होणार नाही. कारण दोन तृतीयांश संख्याबळ आमच्या बाजूने आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

“व्हीप आमच्यावर लागू होणार नाही. कारण शिवसेनेचं दोन तृतीयांश संख्याबळ आमच्याकडे आहे. त्यामुळे व्हीप आम्हाला लागू होत नाही. आम्ही विश्वासदर्शक ठरावाला सामारं जाणार आहोत”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेकडून विधीमंडळाचं गटनेतेपद हे अजय चौधरी यांना देण्यात आलं आहे. पण ते शिंदे गट मानण्यास तयार नाही. आपल्याला दोन तृतीयांश आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आपणच शिवसेनेचे गटनेता असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. गटनेते पद आणि इतर तांत्रिक मुद्द्यांवरुन महाविकास आघाडी कोर्टात गेली आहे. कोर्टात या प्रकरणी खटला सुरु आहे. पण उद्या विधानसभेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन शिवसेना आणि बंडखोर यांच्यात संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.