उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण

कोरोनाशी लढताना रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यामुळे घरी परतणाऱ्या अनेक रुग्णांना आता म्युकोरमायकोसिसची लागण होत असल्याची प्रकार समोर येत आहेत. हे प्रमाण आता झपाट्याने वाढत असून हा रोगही आता भविष्यात साथीच्या आजाराप्रमाणे झपाट्याने फैलावू शकतो, अशी भीती आता डॉक्टरांकडून व्यक्त केली जात आहे.

म्युकोरमायकोसिसचा हा आजार इतका गंभीर आहे की, रुग्णाच्या जगण्याची शक्यता केवळ 50 टक्के इतकी असते. तसेच यामुळे अंधत्त्व आणि इतर गंभीर व्याधी उद्धवू शकतात. सध्या उत्तर महाराष्ट्रात आणि विदर्भात म्युकोरमायकोसिसचे अनेक रुग्ण सापडत आहेत. रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता म्युकोरमायकोसिस साथीच्या आजाराप्रमाणेही फैलावू शकतो, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. रुग्णांची संख्या वाढत असल्याने आतापासूनच दोन्ही जिल्ह्यांमध्ये म्युकोरमायकोसिसच्या औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. ही औषधेही प्रचंड महाग आहेत. त्यामुळे म्युकोरमायकोसिसचा वाढता संसर्ग राज्यासाठी नव्या संकटाची चाहुल मानली जात आहे.

राज्य सरकारने तातडीने उपाययोजना करण्याची गरज

सध्याच्या घडीला मुंबईच्या परळ येथे म्युकोरमायकोसिसवर उपचार होणारे एकमेव स्पेशालिटी रुग्णालय आहे. या रुग्णालयात म्युकोरमायकोसिसच्या 31 रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. यापैकी 25 जण हे मुंबईबाहेरील आहेत. याचा अर्थ राज्यात म्युकोरमायकोसिसचा संसर्ग वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारने वेगाने उपाययोजना करण्याची गरज असल्याचे ग्लोबल रुग्णालयातील डॉ. मिलिंद नवलाखे यांनी सांगितले.

तर केईएम रुग्णालयात सध्याच्या घडीला म्युकोरमायकोसिसचे 25 रुग्ण आहेत. बहुतशांत रुग्ण हे मुंबईबाहेरील असून त्यांची प्रकृती गंभीर आहे. म्युकोरमायकोसिसच्या संसर्गाला साधारण नाकापासून सुरुवात होते. त्यानंतर हा संसर्ग तोंडाचा जबडा आणि मेंदूपर्यंत पसरत जातो. हा संसर्ग मेंदूपर्यंत पोहोचल्यानंतर डॉक्टरांच्या हातात उपचार करण्यासारखे फार काही उरत नाही, असे डॉ. हेतल मारफातिया यांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.