जागतिक स्तरावर करोना लसीकरणात मोठी वाढ झाली आहे. २०२१ मध्ये ७५.२ टक्के लसीकरण झाले होते, तर २०२२ मध्ये ७९.१ टक्के लसीकरण झाले आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली. विशेष म्हणजे २३ देशांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाल्याचे सांगण्यात आले.
स्पेनमधील बार्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ आणि अमेरिकेतील न्यूयॉर्क विद्यापीठाच्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ अँड हेल्थ पॉलिसी या संस्थेने हा अभ्यास केला आहे. हा अभ्यास देशांमधील व्यापक परिवर्तनशीलता आणि लससंकोच सोडवण्यासाठी अनुकूल संवाद धोरणांची आवश्यकता अधोरेखित करतो.
२३ देशांमध्ये ६० टक्क्यांपेक्षा अधिक लसीकरण झाले असले तरी आठ देशांमध्ये मात्र लस स्वीकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे. या देशांमध्ये विशेषत: तरुणच वर्धक मात्र घेण्यास टाळाटाळ करत आहेत, असे अभ्यासात म्हटले आहे. ‘नेच मेडिसिन’ या वैद्यकीय नियतकालिकात हे निष्कर्ष प्रकाशित करण्यात आले आहेत. हा डाटा मिळविण्यासाठी या संस्थांनी आंतरराष्ट्रीय सहकार्याने २०२० पासून २३ उच्च लोकसंख्या असलेल्या देशांमध्ये सर्वेक्षणांची मालिका सुरू केली, ज्यांना साथीच्या रोगाचा जोरदार फटका बसला. ब्राझील, कॅनडा, चीन, इक्वेडोर, फ्रान्स, जर्मनी, घाना, भारत, इटली, केनिया, मेक्सिको, नायजेरिया, पेरू, पोलंड, रशिया, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका, दक्षिण कोरिया, स्पेन, स्वीडन, तुर्कस्तान, ब्रिटन आणि अमेरिका या देशांमधून हा डाटा मिळविण्यात आला आहे.