देशातील चलन व्यवस्थेतून आता दोन हजारच्या नोटा हळूहळू बाहेर करण्यात येत आहेत. गेल्या दोन आर्थिक वर्षांमध्ये आरबीआयने दोन हजाराच्या नोटांच्या छपाईचे आदेशच दिलेले नाहीत. त्यामुळे देशात या नोटांची संख्या आता ३.२७ वरून केवळ २.०१ टक्क्यांवर येऊन पोहोचली आहे.
येत्या काळात ही संख्या आणखी काही प्रमाणात घटण्याची शक्यता आहे. यासंदर्भात अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी सभागृहात ही माहिती दिली. एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, ३० मार्च २०१८ ला २००० रुपयांच्या ३३६.२ कोटी नोट अर्थव्यवस्थेत होत्या. २६ फेब्रुवारी २०२१ ला या नोटा केवळ २४९.९ कोटीवर येऊन पोहोचल्या आहेत.
कोणत्या किंमतीच्या किती नोटा छापायच्या, याचा निर्णय रिझर्व्ह बँक आफ इंडियाच्या सल्ल्यानंतर घेतला जातो. २०१९-२० आणि २०२०-२१ मध्ये या नोटांची छपाईच करण्यात आलेली नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.
आरबीआयने देखील यापूर्वीच दोन हजाराच्या नोटा कमी करण्याच्या प्रयत्नात असल्याचे स्पष्ट केले आहे. नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीच्या वेळी सरकारने देशात प्रचलित असलेल्या जुन्या ५०० व १००० च्या नोटा बाहेर केल्या आणि ५०० व २००० च्या नव्या नोटा चलनात आणल्या.
मोठ्या नोटांमुळे काळा पैसा गोळा करण्याची सोय होते, त्यामुळे नोटाबंदी केली असे सरकारने म्हटले होते. त्यावेळी विरोधीपक्षाने २००० च्या नोट्या चलनात आणण्यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की सरकराने त्यानंतर दोनच वर्षांत दोन हजाराच्या नोटा हद्दपार करण्याची प्रक्रिया सुरू केली