साहित्यसंपदा समूहाने प्रसिद्ध लेखक व. पु. काळे यांच्या जयंतीदिनी २५ मार्चला विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. वपु यांच्याविषयीचा चाहत्यांचा पत्रव्यवहार आणि त्यांच्या कन्येने रेखाटलेले त्यांचे भावचित्र यावर आधारित हे कार्यक्रम असणार आहेत.
वपु हयात असताना त्यांच्या चाहत्यांनी त्यांना पाठवलेली पत्रे सर्जनशीलतेने एकत्र गुंफत वपु यांनी ‘प्लेझर बॉक्स’ हे दोन भागांतील पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी आपल्या काही आठवणीही गुंफल्या आहेत. वपु यांच्या निधनानंतर त्यांची कन्या स्वाती काळे-चांदोरकर यांनी या पुस्तकाच्या दुसऱ्या भागात योगदान देत वडिलांविषयी लेखन केले आहे. याच संकल्पनेच्या पाश्र्वाभूमीवर साहित्यसंपदा फे सबुक समूहाने ‘प्लेझर बॉक्स पुन्हा एकदा’ या उपक्रमांतर्गत वपु यांना पत्र लिहिण्याचे आवाहन त्यांच्या चाहत्यांना केले आहे.
ही सर्व पत्रे स्वाती यांना पाठवली जातील. काही निवडक पत्रांना त्या स्वत: उत्तरे देतील. तसेच सर्व पत्रे एकत्र करून एक दीर्घ पत्र तयार केले जाणार आहे. चतुरस्रा व्यक्तिमत्त्व असलेल्या वपु यांच्या साहित्यिक, कलामय आणि त्यापेक्षाही प्रापंचिक व्यक्तिमत्त्वाचा मागोवा स्वाती यांनी ‘वपु’ या छोटेखानी पुस्तकात नेमकेपणाने घेतला आहे. वपु यांचा जीवनप्रवास वाचकांपर्यंत पोहोचावा यासाठी स्वाती यांची ऑनलाइन मुलाखत २५ मार्चला रात्री ८ वाजता साहित्यसंपदा फेसबुक पेजवरून प्रक्षेपित केली जाणार आहे.