सोनी टीव्हीचा सिंगिंग रिअलिटी शो, ‘इंडियन आयडॉल 12’च्या पॉवर प्लेमध्ये नुकतेच एक एलिमिनेशन पार पडले. याने प्रेक्षकांना मोठा धक्का बसला आहे. झीनत अमान स्पेशल एपिसोडनंतर शोचा होस्ट आदित्य नारायण याने जाहीर केले की, आज इंडियन आयडॉलला त्यांचे ‘टॉप 8’ स्पर्धक मिळणार आहेत आणि यामुळे पॉवर प्लेमध्ये दिलेल्या मतांच्या आधारे पहिल्या 9 स्पर्धकांपैकी एक स्पर्धक शो बाहेर होणार आहे. यावेळी आयडॉलची प्रसिद्ध स्पर्धक अंजली गायकवाड हिला कमी मते मिळाल्यामुळे ती शोमधून बाहेर पडली आहे.
गायकवाड हिने तिच्या वडिलांकडून शास्त्रीय संगीताचे धडे घेतले आहेत. ‘इंडियन आयडॉल 12’मध्ये सामील झालेली अंजली या स्पर्धेची सर्वात तरुण स्पर्धक होती. अंजलीने 2017 मध्ये पार पडलेल्या सिंगिंग रिअलिटी शो ‘सा रे गा मा पा लिटिल चॅम्प’चे विजेतेपद मिळवले होते.
अंजली एक प्रतिभावान पार्श्वगायिका आहे. अंजलीने ए.आर. रहमान यांच्यासारख्या दिग्गज संगीत दिग्दर्शकांसोबत काम केले आहे. इंडियन आयडॉलच्या टॉप 9 पर्यंत पोहोचलेल्या या स्पर्धेत तिने तिच्या आवाजाच्या जादूने परीक्षक आणि प्रेक्षकांना वेड लावले होते. तिचे एलिमिनेशन परीक्षकांसाठीसुद्धा धक्का होता
शोमधून बाहेर पडल्यामुळे अंजली गायकवाड हिचे तिच्या कुटुंबीयांना मदत करण्याचे स्वप्न अपूर्ण राहिले. वास्तविक अंजलीचे वडील संगीत शिक्षक आहेत आणि आई गृहिणी आहे. गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान अंजलीच्या कुटुंबीयांना बर्याच अडचणींचा सामना करावा लागला होता. शाळा बंद पडल्यामुळे तिचे वडील मुलांना संगीत शिकवू शकले नाहीत. आता त्यांनी मुलांना ऑनलाईन संगीत शिकवायला सुरुवात केली आहे. अंजलीला या कठीण काळात आयडॉलचे विजेतेपद मिळवून आपल्या कुटुंबाची मदत करायची होती. अंजलीची बहीण नंदिनी गायकवाडसुद्धा एक अप्रतिम गायिका आहे.