जन्म. ४ मे १९३४.
हळुवार आणि सुरेल गाणे ही अरुण दाते यांची खासियत. शुक्रतारा मंदवारा, या जगण्यावर या मरण्यावर शतदा प्रेम करावे, भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी, दिवस तुझे हे फुलायचे अशी असंख्य गाणी आजही रसिकांच्या मनावर राज्य करतात. त्यांनी अजरामर केलेली गाणी पुढच्या पिढीच्याही कायम लक्षात राहतील यात काही शंका नाही. अरुण दाते यांचे मूळ नाव अरविंद. त्यांचे वडील म्हणजे इंदूरचे प्रसिद्ध रामुभैया दाते. ते स्वत: गायक व दर्दी रसिक, ते संस्थानामध्ये सेक्रेटरी दर्ज्याचे अधिकारी होते. रामूभैय्या दाते यांचा दरबार अत्यंत प्रतिष्ठेचा आणि तालेवार रसिकांचा मानला जाई. अरुण दाते इंदूरजवळच्या धारला कुमार गंधर्वांकडे अगदी सुरुवातीला गाणे शिकले. पुढील शिक्षण के. महावीर यांच्याकडे घेतले. अरुण दाते यांचा आवाज जरासा पातळ आणि तलत मेहमूदच्या जातकुळीतला, पण त्यात अस्सल घरंदाज गायकीचे रंग मिसळलेले. घरात असताना दिवसभर गाणे कानावर पडत असल्याने कान तयार आणि संगीताची उत्तम जाण. असे गुण असलेला आपला मुलगा गायक व्हावा हे रामूभैय्यांचे स्वप्न अरुणने पुढे प्रत्यक्षात आणले. अरुण दाते टेक्सटाइल इंजिनिअरिंगचा अभ्यास करण्यासाठी मुंबईत रहात असताना ते पु.ल.देशपांडे यांना भेटत असत. पुलंनीच अरुण दाते हे उत्तम गात असल्याचे पाहून रामूभैय्या दातेंना तसे सांगितले. संगीतातले दर्दी, कलावंतांबद्दल असीम जिव्हाळा, आणि त्यांच्या कलेबद्दल अतीव आदर असलेले रामूभैय्या दाते हे ऐकून प्रसन्न झाले. इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीच्या पराक्षेत अरुण दाते नापास झाल्याचे समजल्यावर ते म्हणाले “टेक्स्टाइल इंजिनिअर होणारे अनेक जण आहेत, पण तुझ्यासारखे गाणे किती जणांना येते ते सांग”. घरूनच असे प्रोत्साहन असल्याने, अरुण दाते यशस्वी टेक्सटाइल इंजिनिअरबरोबरच यशस्वी गायक झाले यात आश्चर्य नाही. १९५५ पासून अरुण दाते आकाशवाणीवर गाऊ लागले. वयाच्या पन्नाशीत म्हणजे १९८४ मध्ये अरुण दाते यांनी स्वत:ला पूर्णपणे भावगीताला वाहून घेतले. १९६२ मध्ये ’शुक्रतारा मंदवारा’ ह्या पहिल्या गीताची ध्वनिमुदिका प्रकाशित झाली आणि अरुण दाते यांना त्यानंतर जराही उसंत मिळाली नाही. हे गाणे त्यांनी गावे यासाठी संगीत दिग्दर्शक सतत तीन वर्षे त्यांच्या पाठीस लागले होते. “मी हिंदी मुलखातला, माझे मराठी उच्चार धड नाहीत, मी, हेच काय पण कोणतेही मराठी गीत म्हणू शकणार नाही” असे म्हणणाऱ्या अरुण दाते यांनी शेवटी हे भावगीत म्हटले. २०१० पर्यंत अरुण दाते यांचे ’शुक्रतारा’ या नावाने होणाऱ्या मराठी भावगीत गायनाचे २५०० हून अधिक कार्यक्रम झाले, आणि हे सर्व कार्यक्रम हाउसफुल्ल झाले आहेत. त्यांचे उर्दूतील आणि मराठीतील गीतांचे पंधराहून अधिक आल्बम आजही लोकप्रिय आहेत. मंगेश पाडगावकर, यशवंत देव आणि अरुण दाते या अनुक्रमे कवी, संगीत दिग्दर्शक आणि गायक या त्रिकुटाने मराठी भावगीताला परत झळाळी प्राप्त करून दिली असे म्हटले जाते. अरुण दाते यांनी लता मंगेशकर,आशा भोसले, अनुराधा पौडवाल, सुमन कल्याणपूर, सुधा मलहोत्रा, कविता कृष्णमूर्ती या सगळ्यांबरोबर दंव्वगीते गायली होती. आपल्या शुक्रतारा या नावाने ते करीत असलेल्या कार्यक्रमांत ते फक्त मुळात स्वत: गायलेली गीतेच सादर करतात आणि श्रोत्यांना तीच तीच गाणी परत परत ऐकायला आवडतात. अरुण दाते यांनी “शतदा प्रेम करावे” या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे. अरुण दाते यांनी या जुन्या पुस्तकात वडिलांचे (रामुभैयाचे) जवळ जवळ संपूर्ण जीवन सांगितले असून, अशा वडिलांच्या साहचर्यामुळे त्यांचे जीवन फुलण्यासाठी कशी मदत झाली ते वर्णले आहे. या पुस्तकाला ‘पुलंनी लिहिलेली प्रस्तावना लिहिली होती. त्याचे सुलभा तेरणीकर यांनी शब्दांकन केले आहे. पुस्तकात संगीताखेरीज इतरही अनेक गोष्टी आल्या आहेत. हे पुस्तक पूर्वी १९८६ साली प्रसिद्ध झाले होते, पण बाजारात मिळत नसल्याने नव्याने ‘शुक्रतारा’ या नावाने प्रकाशित झाले आहे. अरुण दाते यांचे ६ मे २०१८ रोजी निधन झाले.
संजीव वेलणकर ,पुणे