जन्म. ६ मे १९८२ साली मुंबई येथे.
अद्वैत दादरकरचे बालमोहन विद्यामंदिर मुंबई येथून शालेय शिक्षण झाले तर त्याने डी. जी. रुपारेल कॉलेज मुंबई येथून पुढील शिक्षण पूर्ण केले. अद्वैत दादरकरचे आजोबा म्हणजे जुने संगीत नाटककार विद्याधर गोखले व दिग्दर्शक विजय गोखले हे मामा व विजय गोखले यांची बहीण शुभदा दादरकर या त्यांच्या आई होत. शास्त्रीय गायक ओंकार दादरकर हा त्याचा भाऊ होय. अद्वैत दादरकरचे वडील श्रीकांत दादरकर हे माणिक वर्माचे भाऊ त्यामुळे ते वंदना गुप्ते आणि इतर तीन भगिनी या आत्या आहेत. अद्वैत दादरकर या तरुण रंगकर्मीनं लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या तिन्ही क्षेत्रांत अतिशय आश्वासक कामगिरी बजावून अल्पावधीतच नाव कमावलं आहे. कलेचा वारसा सांगणार्याय कुटुंबातल्या अद्वैत दादरकरने आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धांपासून कारकिर्दीला सुरुवात केली. ‘सवाई एकांकिका स्पर्धेत’ सलग तीन वर्षं सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचं पारितोषिक त्यांनी पटकावलं आहे. ‘मिथक’ या त्यांच्या संस्थेद्वारे ते नाटक सादर करतात. दि. बा. मोकाशी लिखित ‘पालखी’, विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं ‘एक हट्टी मुलगी’, रत्नाकर मतकरी लिखित ‘जावई माझा भला’ या नाटकांचं दिग्दर्शन अद्वैत यांनी केलं आहे. ‘मायक्रोवेव्ह चकणा’, ‘तीच ती दिवाळी’, ‘चाफा’ ही त्यांनी लिहिलेली व दिग्दर्शन केलेली महत्त्वाची नाटकं. अभिनेता म्हणूनही त्यांनी ‘बॅरिस्टर’, ‘फॅमिली ड्रामा’ या नाटकांमधून आपला ठसा उमटवला आहे.
अद्वैत दादरकर याने केलेली अग्निहोत्र ही पहिली मालिका होती. ई टीव्ही मराठी वरील ‘तू माझा सांगाती’ ही त्याने केलेली दुसरी मालिका होती. ह्या आधी त्याने अनेक नाटके केली. ‘जावई माझा भला’, ‘दम असेल तर’, “दादा गुड न्युज आहे” ह्या नाटकांमध्ये त्याने अभिनयासोबत कथा लेखन, डायलॉग लेखनही केले आहे. “दादा गुड न्युज आहे” हे नाटक रंगमंचावर तुफान गाजले, ह्या नाटकात त्याने केलेला अभिनय प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहीला.
झी युवा वरील अंजली मालिकेत डॉक्टर रोहिणीची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री भक्ती देसाई हिच्यासोबत अद्वैत दादरकरने २०१३ मध्ये लग्न केले. अद्वैत दादरकर आणि भक्ती देसाई या दोघांनी रंगभूमीवर अनेक नाटकांत एकत्र काम केले आहे. मास्तर ब्लास्टर, मोरूची मावशी, फॅमिली ड्रमा तसेच संगीमय नाटक ‘कोणे एके काळी’ या नाटकांत एकत्रित कामे केली आहेत.
‘फूबाई फु सीजन ५’ मध्ये भक्ती देसाईने केलेला अभिनय सर्वांच्याच लक्षात राहिला. २०१० साली ‘अमर प्रेम हे’ या मालिकेत वैभव तत्ववादी सोबत काम केले. २०१२ साली झी मराठी वरील ‘अरुंधती’ या मालिकेतील तिची भूमिका खूपच गाजली होती.
संजीव वेलणकर , पुणे