शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी चिदंबरम, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार देवेंद्रनाथ बिस्वास व आसामचे माजी मंत्री दिवंगत अंजन दत्ता यांच्या संयुक्त मालकीच्या एका कंपनीची सहा कोटींची मालमत्ता जप्त केली, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी दिली.
‘ईडी’ने निवेदनात नमूद केले, की आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तीन कोटी ३० लाख रुपयांची जंगम मालमत्ता आणि तीन कोटींची स्थावर मालमत्ता जप्त करण्याचा तात्पुरता आदेश देण्यात आला आहे. या मालमत्ता शारदा समूहासह इतरांच्या मालकीच्या होत्या. या समूहाद्वारे करण्यात आलेल्या आर्थिक गुन्ह्यातील उत्पन्नाच्या लाभार्थीत नलिनी चिदंबरम, पश्चिम बंगाल क्लबचे अधिकारी देवब्रत सरकार, देवेंद्रनाथ बिस्वास, माजी ‘आयपीएस’ अधिकारी व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार देबेंद्रनाथ बिस्वास आणि आसामचे माजी मंत्री व माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अंजन दत्ता यांच्या मालकीच्या ‘अनुभूती प्रिंट्रर अँड पब्लिकेशन्स’चा सहभाग होता.
शारदा समूहाने २०१३ पर्यंत पश्चिम बंगाल, आसाम आणि उडिशात केलेल्या कथित ‘चिटफंड’ घोटाळय़ाशी संबंधित हा आर्थिक गैरव्यवहार आहे. या समूहाने उभारलेली एकूण रक्कम सुमारे दोन हजार ४५९ कोटी आहे. ज्या पैकी ठेवीदारांवर व्याजाची रक्कम वगळून आतापर्यंत सुमारे एक हजार ९८३ कोटी रुपये देणे बाकी असल्याचे ‘ईडी’ने सांगितले. ‘ईडी’ने या प्रकरणी आतापर्यंत सुमारे ६०० कोटींची मालमत्ता जप्त केली आहे.