कांगारूंना चिरडण्यासाठी टीम इंडिया सज्ज, चार खेळाडूंची वाईल्ड-कार्ड एण्ट्री!

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीसाठी भारत आणि ऑस्ट्रेलियाची टीम कोणतीही कसर ठेवू इच्छित नाही. भारतामध्ये आल्यानंतर लगेचच ऑस्ट्रेलियाने बँगलोरमध्ये सरावाला सुरूवात केली आहे. तर शुक्रवारपासून टीम इंडियाच्या नेट प्रॅक्टिसलाही सुरूवात झाली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी टीम इंडिया घाम गाळत आहे. याच कारणासाठी भारताने टीममध्ये चार क्रिकेटपटूंना वाईल्ड-कार्ड एण्ट्री दिली आहे. या चार क्रिकेटपटूंमध्ये एक ऑलराऊंडरही आहे, ज्याच्यामुळे टीम इंडियाचा गाबा टेस्टमध्ये 22 वर्षांनी ऐतिहासिक विजय झाला.

वॉशिंग्टन सुंदरने 2021 च्या सुरूवातीला गाबा टेस्टवेळीच आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. दुखापतीमुळे टीम इंडियाचे क्रिकेटपटू खेळू शकत नव्हते, त्यामुळे टीमला 11 खेळाडू मैदानात उतरवणंही कठीण झालं होतं.

अशावेळी नेट बॉलर म्हणून ऑस्ट्रेलियाला गेलेल्या वॉशिंग्टन सुंदरला टेस्ट मॅच खेळण्याची संधी मिळाली. अजिंक्य रहाणे या टीमचं नेतृत्व करत होता. 22 वर्षांमध्ये गाबाच्या मैदानात कोणत्याच टीमला ऑस्ट्रेलियाचा पराभव करता आला नव्हता. आपल्या पदार्पणाच्या सामन्यातच सुंदरने धमाका केला होता.

वॉशिंग्टन सुंदरने डेब्यू मॅचमध्ये अर्धशतक ठोकत 62 रन केले होते. दुसऱ्या इनिंगमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सुंदरने 22 रनचं महत्त्वाचं योगदान दिलं. तसंच त्याने मॅचमध्ये एकूण 4 विकेटही घेतल्या. गाबा टेस्टच्या विजयाचं श्रेय ऋषभ पंतला दिलं गेलं, पण वॉशिंग्टन सुंदरनेही मोलाचं योगदान दिलं होतं.

वॉशिंग्टन सुंदरची पुन्हा एकदा टीम इंडियाचा नेट बॉलर म्हणून निवड झाली आहे. भारताचा घरच्या मैदानात पराभव करण्यासाठी ऑस्ट्रेलिया खास रणनीती तयार करून आली आहे, या रणनीतीला छेद देण्यासाठी टीम इंडियाने सुंदरला नेट बॉलर म्हणून आणलं आहे.

क्रिकबझने दिलेल्या वृत्तानुसार वॉशिंग्टन सुंदरशिवाय साई किशोर, सौरभ कुमार आणि राहुल चहर यांनाही नेट बॉलर म्हणून यायला सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.