आज दि.२९ सप्टेंबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

एक नेता…एक पक्ष…एक विचार…एक लव्य…एक नाथ, शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा पहिला टिझर

5 ऑक्टोबरच्या दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाच्या शिवसेनेकडून जोरदार तयारी सुरू आहे. मुंबईच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. या मेळाव्याचं पहिलं पोस्टर आणि टिझर आता समोर आलं आहे. या पोस्टरला एक नेता, एक पक्ष, एक विचार, एक लव्य, एक नाथ असं कॅप्शन देण्यात आलं आहे. सोबतच या पोस्टरमध्ये बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरण्यात आला आहे. तसंच सगळ्यात वरती डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आणि उजव्या बाजूला शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह लावण्यात आलं आहे.हिंदवी तोफ पुन्हा धडाडणार, गर्व से कहो हम हिंदू है, असंही या पोस्टरमध्ये लिहिण्यात आलं आहे. 5 ऑक्टोबरला संध्याकाळी 5 वाजता वांद्र्याच्या बीकेसी मैदानामध्ये शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला सुरूवात होणार आहे. याचवेळी उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादरच्या शिवाजी पार्कवर होईल.

मुंबईतून फक्त सहा तासांत गाठता येणार गुजरात!

भारतातील पहिली स्वदेशी विकसित ‘वंदे भारत’ ट्रेन गांधीनगर ते मुंबई दरम्यान धावणार आहे. आता या ट्रेनचं वेळापत्रक समोर आलं असून ही ट्रेन आठवड्यातून सहा दिवस धावणार आहे. सुरत, वडोदरा आणि अहमादबाद या तीन स्थानकांवर ही ट्रेन थांबणार आहे. ही ट्रेन मुंबई सेंट्रलपासून सकाळी 6:10 वाजता सुटेल आणि दुपारी 12:10 वाजता गांधीनगर स्टेशनला पोहोचेल.  तर दुपारी 2:05 वाजता गांधीनगरपासून ट्रेन सुटेल आणि रात्री 8:35 मुंबई सेंट्रल पोहोचेल. अलीकडेच वंदे भारत एक्स्प्रेसची चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. ट्रेनमध्ये ‘कवच’ तंत्रज्ञान (ट्रेन कोलिजन अव्हॉइडन्स सिस्टीम) आहे. ही एक स्वयंचलित सुरक्षा प्रणाली असून ही प्रणाली दोन गाड्यांची टक्कर होण्यापासून रोखते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान भारतातच विकसित करण्यात आलं असून परदेशातून आयात होणाऱ्या ट्रेनच्या तुलनेत कमी खर्चात बनवलं जातं.

‘बॉम्ब ब्लास्ट होतील, असे…’, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान

राज्याच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यात आज जे सरकार स्थापन झालेलं आहे ते सरकार अशा पद्धतीने स्थापन होईल, अशी कुणालाही कल्पना नव्हती. राज्यात तीन महिन्यांपासून भाजप आणि शिंदे गटाचं सरकार आहे. विशेष म्हणजे तीन महिन्यांनंतरच्या सत्ताबदलानंतरही महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी कमी होताना दिसत नाहीय. याशिवाय महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. बॉम्ब ब्लास्ट होतील असे प्रवेश भाजपमध्ये होतील, असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव करण्यासाठी भाजप प्रचंड कामाला लागली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वर्चवस्वाला सुरुंग लावण्यासाठी भाजप त्यांच्या बालेकिल्ल्यातच राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा पराभव करण्याच्या तयारीत लागली आहे. 

सर्रासपणे घेतल्या जाणाऱ्या ‘या’ औषधांमुळे बहिरे होण्याचा धोका

प्रत्येक व्यक्तीला आयुष्यात कधी ना कधी संसर्गाचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत प्रतिजैविक म्हणजे अँटिबायोटिक्स घेणे, आपल्यासाठी अत्यावश्यक बनते. परंतु अँटिबायोटिक्सचा अतिवापर आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे. अँटिबायोटिक्सच्या वापरामुळे काही लोकांच्या कानाच्या पेशी मरतात, त्यामुळे बहिरेपणाचाही सामना करावा लागू शकतो. वास्तविक बहिरेपणा अँटिबायोटिक्स अमिनोग्लायकोसाइडमुळे होतो. यामुळे ऐकण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट होऊ शकते.

टीम इंडियाचं ‘मिशन टी20 वर्ल्ड कप’ संकटात? रोहितसमोर ही आहे सर्वात मोठी समस्या

टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतीमुळे पुन्हा एकदा जायबंदी झाल्यानं भारतीय संघव्यवस्थापन अडचणीत सापडलं आहे. किंबहुना टीम इंडियाच्या ‘मिशन टी20 वर्ल्ड कप’ला बसलेला हा सर्वात मोठा धक्का आहे. ऑस्ट्रेलियातल्या खेळपट्ट्यांवर बुमरासारखा बॉलर भारतीय संघात नक्कीच हवा. भुवनेश्वर कुमारचा अपवाद वगळता सध्याच्या भारतीय संघातला तोच एक अनुभवी गोलंदाज आहे. बुमराकडे तिन्ही फॉरमॅटचा तगडा अनुभव आहे. त्यामुळे त्याचं संघात नसणं अनेक दृष्टीनं भारताच्या फायद्याचं नाही. कारण गेल्या काही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजी हाही एक चर्चेचा विषय बनली आहे.

2014 चा प्लान कसा फसला? शिंदेंबाबत गौप्यस्फोट करताना काँग्रेसचं टार्गेट राष्ट्रवादी!

काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत केलेल्या गौप्यस्फोटामुळे खळबळ उडाली आहे. राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असं अशोक चव्हाण म्हणाले आहेत.काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन सरकार स्थापन करू, अशा आशयाचा प्रस्ताव घेऊन शिवसेनेचे वरिष्ठ नेते ज्यात सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही समावेश होता. या सर्वांनी माझी, माझ्या मुंबईतील कार्यालयात भेट घेतली होती, असा दावा अशोक चव्हाण यांनी केला आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना जलेबी तयार करण्याचा मोह अनावर

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा नेहमी काहीना काही कारणाने चर्चेत असतात. दोन दिवसांपूर्वी नवनीत राणा यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ समोर आला होता. राणा यांचा तो व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. त्यांचा तो व्हिडीओ ताजा असतानाच नवनीत राणा यांचा आणखी एक नवा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत नवनीत राणा जलेबी बनवताना दिसत आहेत. खरंतर त्यांना जलेबी बनवता येत नाही किंवा त्यांनी याआधी आयुष्यात कधीही जलेबी बनवलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी पहिल्यांदा जलेबी बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जलेबी बनवण्याचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियावरदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमुळे नवनीत राणा पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत.

पावसानं तारलं पण अळीनं मारलं! शेतकऱ्यांच्या त्रासात रोज नवी भर

सातारा जिल्ह्यातील पूर्व दुष्काळी भागात यंदा निसर्गाने शेतकऱ्यांची चांगलीच साथ दिली. सुरुवातीला कमी पाऊस असल्याने शेतकऱ्यांनी धूळ वाफेवर पेरण्या केल्या. नंतर सतत झालेल्या दमदार पावसाने शिवारात डौलदार पिके डोलू लागली आहेत. मात्र, अचानक संकट आले आणि पिकावर अळीचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. अळी उभे पिकं फस्त करीत आहे. हाताशी आलेले पिक हिरावून घेत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय: अविवाहित महिलांनाही 24 आठवड्यांपर्यंत मिळेल गर्भपाताचा अधिकार

गर्भपाताबाबत सर्वोच्च न्यायालयानं आज (29 सप्टेंबर 22) ऐतिहासिक निकाल दिला आहे. विवाहित किंवा अविवाहित सर्व स्त्रियांना गर्भ राहिल्यापासून 24 आठवड्यांपर्यंत कायदेशीररित्या सुरक्षित गर्भपात करता येऊ शकतो, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या आदेशात स्पष्ट केलं आहे. याच निकालादरम्यान सर्वोच्च न्यायालयानं वैवाहिक बलात्काराविषयीही मत नोंदवलं आहे. महिलेच्या मनाविरुद्ध नवऱ्याने संबंध ठेवल्यामुळे गर्भधारणा झाल्यास त्याला वैवाहिक बलात्कार मानता येईल, असंही न्यायालयाने म्हटलं आहे. ‘लाईव्ह मिंट’नं याबाबत सविस्तर वृत्त दिलं आहे.

‘टाइम’च्या 100 इमर्जिंग लीडर्सच्या यादीत आकाश अंबानींचा समावेश; यादीतले एकमेव भारतीय

अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांचे पुत्र आणि जिओ या भारतातल्या सर्वांत मोठ्या टेलिकॉम कंपनीचे प्रमुख आकाश अंबानी यांचं नाव प्रतिष्ठित टाइम मॅगझिनने प्रसिद्ध केलेल्या जगातल्या उदयाला येत असलेल्या ताऱ्यांमध्ये समाविष्ट झालं आहे. Time100 Next या 100 जणांच्या यादीत आकाश अंबानी यांचा समावेश झाला आहे. या यादीत समाविष्ट झालेले आकाश अंबानी एकमेव भारतीय उद्योगपती आहेत. त्यांच्याव्यतिरिक्त आम्रपाली गण या जन्माने भारतीय असलेल्या अमेरिकन बिझनेस लीडरचाही या यादीत समावेश आहे. ‘पीटीआय’ या वृत्तसंस्थेच्या हवाल्याने ‘सीएनबीसी टीव्ही 18’ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट, 10 जनपथमधील भेटीदरम्यान गहलोतांनी मागितली माफी

राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय संकटादरम्यान मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. साधारण दीड तास ही बैठक सुरू होती. या बैठकीत गहलोत यांच्या निर्णयामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.गेहलोत म्हणाले की, गेल्या 50 वर्षांत अगदी इंदिरा गांधीच्या कार्यकाळातही शिवाय कोणीही पक्षाचा अध्यक्ष असला तरी काँग्रेसने नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला. आमदाराच्या त्या बैठकीनंतर अनेकांना धक्का बसला होता. सर्वांना वाटत होतं की, मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. या सर्व प्रकरणानंतर मी सोनिया गांधींची माफी मागितली आहे.

‘कमांडो श्वान’ करणार कुनो अभयारण्यातील चित्त्यांचं संरक्षण!

तब्बल सात दशकांनंतर भारत सरकारने नामिबियातून आठ चित्ते भारतात आणले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: त्या चित्त्यांना मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय अभयारण्यात सोडलं. भारतात आलेले हे चित्ते इथल्या पर्यावरणाशी कसं जुळवून घेणार? हा प्रश्न उपस्थित होत असतानाच त्यांच्या सुरक्षेची पुरेपुर काळजी घेण्याच्या दृष्टीनंही योग्य ती पावलं उचलली जात आहेत. चित्त्यांना शिकारी व इतर वन्य प्राण्यांपासून वाचवण्यासाठी जर्मन शेफर्ड जातीच्या श्वानांना भारत-तिबेट सीमा पोलीस दलाच्या म्हणजेच आयटीबीपीच्या हरियाणातील पंचकुला इथल्या राष्ट्रीय श्वान प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित केलं जातंय. ‘अमर उजाला हिंदी’नं या संदर्भात वृत्त दिलंय.

फिफा अंडर-१७ महिला फुटबॉल विश्वचषक इंडिया २०२२ स्पर्धेला ११ ऑक्टोबरपासून सुरुवात

फिफा अंडर-१७ महिला विश्वचषक इंडिया येत्या ११ ते ३० ऑक्टोबर दरम्यान भुवनेश्वर, गोवा आणि महाराष्ट्रातील नवी मुंबई अशा तीन शहरात आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या तिकीट विक्रीचा प्रारंभ भारताचे केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री अनुराग ठाकूर, फिफाचे लिंडसे टारप्ले, माजी भारतीय कर्णधार सुनील छेत्री व आशालता देवी यांच्या उपस्थितीत पार पडला. fifa.com/tickets या वेबसाईटवर फुटबॉल चाहत्यांना आपली जागा आरक्षित करता येणार आहे. यावेळी असंख्य फुटबॉल चाहते, प्रेक्षक आणि मान्यवर उपस्थित होते.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.