गेल्या अनेक महिन्यांपासून भारतात 5G सेवा सुरू होण्याबद्दल चर्चा सुरू होती. अनेक मोबाइल उत्पादक कंपन्यांनी 5G सेवा देणारे मोबाइल हँडसेट्स आधीच बाजारात आणले आहेत. त्यामुळे 5G नेटवर्क कधी सुरू होणार याबाबत ग्राहकांना उत्सुकता होती. आता ही प्रतीक्षा लवकरच संपण्याची शक्यता आहे. येत्या 1 ऑक्टोबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत 5G सेवेचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. ही सेवा भारतात सर्वांत आधी कोणत्या शहरात सुरू होईल, याबाबतही लवकरच खुलासा होईल.
स्मार्टफोन ग्राहक आतुरतेने वाट पाहत असलेल्या 5G सेवेचा शुभारंभ लवकरच होण्याची शक्यता आहे. देशाची राजधानी नवी दिल्लीतच ही सेवा सर्वप्रथम सुरू होण्याची दाट शक्यता आहे. मोबाइल नेटवर्क कंपन्यांनी याबाबत अजून कोणतीही घोषणा केली नाहीये; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 1 ऑक्टोबरला 5G सेवा सुरू होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान 1 तारखेला दिल्लीतल्या प्रगती मैदानावर इंडिया मोबाइलच उद्घाटन करणार आहेत. याच कार्यक्रमात 5G सेवेचा शुभारंभही होण्याची शक्यता आहे. अर्थात ग्राहकांना लगेचच ते वापरता येईलच असं नाही; मात्र मोबाइल कंपन्या लवकरच त्याबाबतची घोषणा करतील.
दिल्ली ही आधीपासूनच मोबाइल कंपन्यांच्या नियोजनात असलेली बाजारपेठ आहे. जिओची 5G सेवा सुरू होण्याच्या संभाव्य बाजारपेठेतही दिल्लीचा समावेश आहे. त्यामुळे ही सेवा पहिल्यांदा दिल्लीमध्ये सुरू होईल अशी अपेक्षा आहे.
5G सेवेच्या शुभारंभाची चर्चा सुरू झाल्याबरोबर बाजारात 5G स्मार्टफोनची धडाधड खरेदी सुरू झाली आहे. सध्याच्या फेस्टिव्ह सेलच्या काळात 5G मोबाइल फोन्सची अधिक विक्री होण्याची शक्यता असून, टेलिकॉम कंपन्यांच्या टार्गेट मार्केटमध्ये वाढ होऊ शकते.
इंटरनेटची 5G सेवा आल्यामुळे ग्राहकांना अल्ट्रा लो-लेटन्सीसोबतच हाय स्पीड नेटवर्क मिळेल. केवळ ग्राहकांनाच नाही, तर उद्योग-व्यवसायांनाही याचा फायदा होईल. भारतात एअरटेल व जिओ या कंपन्यांची 5G सेवा सर्वांत आधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर व्होडाफोन-आयडिया कंपनीही यात उतरेल.
4Gच्या तुलनेत 5G सेवेचे प्लॅन्स महाग असण्याची शक्यता आहे; मात्र त्याची किंमत खूप जास्त असणार नाही. टेलिकॉम कंपन्या ग्राहकांसाठी काय पद्धतीनं 5G सेवा देतील, याबाबत सध्या काही स्पष्टता नाही.
5G नेटवर्कच्या सेवेमुळे ऑपरेटर्सच्या ARPUच्या आकडेवारीत फारसा फरक दिसणार नाही, असं तज्ज्ञांना वाटतंय. थोडक्यात 5G सेवेमुळे टेलिकॉम कंपन्यांच्या नफ्यात फारशी वाढ होणार नाही, असं दिसतंय.