आज दि.२९ जुलै च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा….

महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाची बातमी! एकनाथ शिंदे सरकारचा फैसला पुन्हा लांबणीवर जाणार?

महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा येत्या 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात फैसला होणार असल्याची चर्चा होती. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांवर अपात्रेच्या कारवाईच्या मागणीवरुन मुख्य शिवसेनेकडून करण्यात आलेल्या सर्व याचिकांवर 1 ऑगस्टला सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, असं मानलं जात होतं. पण ही सुनावणी आता लांबणीवर जाण्याती शक्यता आहे. राज्य सरकारबाबतच्या याचिकांवर 1 ऑगस्ट ऐवजी 2 ऑगस्टला सुनावणी होण्याची शक्यता आहे.

 ‘आमचं ठरलंय!’ अजित पवारांच्या आगमनापूर्वी शहरातील पोस्टरबाजीमुळे चर्चेला उधाण

विरोधी पक्षनेते अजित पवार सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते यवतमाळ शहराचा दौरा करणार आहेत. यवतमाळच्या आगमनापूर्वी विश्राम भवन परिसरात पोस्टरबाजीमुळे चर्चेला उधाण आलं आहे. ‘आमचं ठरलंय’ अशा आशयाच्या पोस्टर लावत पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मात्र नेमके हे फलक कोणी लावले आणि कशासाठी याबाबतचे कारण अद्याप समोर आलेलं नाही.

या फलकावर कोणत्याही पक्षाचं चिन्ह वा नेत्याचं नाव दिलेलं नाही. त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांमध्ये या फलकाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या गटबाजीतून ही फलकबाजी केली असल्याची चर्चा सुरू आहे. शिंदे गटातून ही फलकबाजी करण्यात आली असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आधी शिंदेंची भेट, नंतर रोखठोक पत्रकार परिषद, पुतण्याचा उद्धव ठाकरेंवर नेमका निशाणा काय?

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे दिवंगत थोरले चिरंजीव बिंदूमाधव ठाकरे यांचे पुत्र निहार ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेटली. निहार ठाकरे यांनी शिंदेंची भेट घेतल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा सख्खा पुतणा निहार ठाकरे शिंदेंना जावून मिळाला. त्यामुळे शिवसेना घरातूनच फुटली, अशा चर्चांना उधाण आलं. निहार यांनी शिंदेंच्या भेटीनंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपण शिंदेंना का भेटलो? याबाबत माहिती दिली. निहार यांनी एकनाथ शिंदे यांना कायदेशीर लढाईत पूर्णपणे मदतीचं आश्वासन दिलं आहे. निहार हे पेशाने वकील आहेत. त्यांचं स्वत:चं लॉ फर्म आहे. त्यामुळे कोर्ट-कायदेशीर लढाईत शिंदेंना त्यांची खरंच मदत होवू शकते. निहार यांनी उद्धव ठाकरेंच्या विरोधातील गटाला पाठिंबा दिल्याने मुख्य शिवसेनेला मोठा झटका मानला जातोय. दरम्यान, निहार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर प्रत्यक्ष टीका करणं टाळलं आहे.

महाराष्ट्रातही घुसला मंकीपॉक्स?

जगभर थैमान घालणारा मंकीपॉक्स भारतात घुसल्यानंतर दहशत निर्माण झाली आहे. केरळनंतर दिल्लीतही याचे रुग्ण आढळल्याने चिंता वाढली. उत्तर प्रदेशमध्ये याचे संशयित रुग्ण सापडले आहेत. दरम्यान महाराष्ट्रातही आता मंकीपॉक्सने शिरकाव केला की काय अशी भीती वाटू लागली आहे. कारण महाराष्ट्रातही मंकीपॉक्सचे संशयित रुग्ण सापडले. लाईव्ह मिंटच्या रिपोर्टनुसार राज्यातील महासाथीच्या संभाव्य आजारांवर देखरेख ठेवणारे अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितलं की, गेल्या महिन्यात एनआयव्हीला परीक्षणासाठी दहा नमुने पाठवण्यात आले होते. 9 नमुन्यांचा रिझल्ट निगेटिव्ह आहे. एका संशयित रुग्णाचा रिपोर्ट अद्याप आलेला नाही. याचा अर्थ अद्याप तरी राज्यात मंकीपॉक्स नाही.

मठात आलेल्या महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल झाल्यानंतर मलकापूरचे लोमटे महाराज फरार

दैवी चमत्कारामुळे राज्यभर प्रसिद्ध असणारे कळंब तालुक्यातील मलकापूर येथील एकनाथ सुभाष लोमटे महाराज यांच्यावर येरमाळा पोलिसात विनयभंगचा गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.लोमटे यांच्या विरोधात यापूर्वी भोंदूगिरी करण्यासारखे गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. हेच महाराज यांनी काल महिला दर्शनासाठी आली असता तिचा विनयभंग केला. इतकच नाही तर मी तुला गुंगीचं औषधं देऊन तुझ्यावर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडिओ देखील शूट केल्याची धमकी देखील लोमटे महाराज यांनी पीडित महिलेला दिल्याची माहिती समोर आली आहे. या पीडितेच्या तक्रारीवरून लोमटे महाराजांवर गुन्हा दाखल झाला आहे.

भारताच्या हरमनप्रीतने रचला इतिहास; राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ठोकले पहिले टी २० अर्धशतक

२०२२ बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये महिला टी २० क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. यातील पहिल्याच सामन्यात भारतासमोर जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचे आव्हान होते. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. असे असले तरी भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने सर्वांची मने जिंकली आहेत.इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात कर्णधार हरमनप्रीत कौरच्या (५२) अर्धशतकाच्या जोरावर भारताने कांगारूंसमोर १५५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. कौरने ३४ चेंडूत ५२ धावा फटकावल्या. यामध्ये आठ चौकार आणि एक षटकाराचा समावेश आहे. हरमनप्रीतचे अर्धशतक ऐतिहासिक ठरले. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत कुठल्याही महिला क्रिकेटपटूचे हे पहिलेच अर्धशतक ठरले आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.