मुंबई उच्च न्यायालयातील कामकाज पुन्हा एकदा ऑनलाइन पद्धतीने चालवण्याची विनंती बॉम्बे बार असोसिएशनने मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांना पत्राद्वारे केली.वाढत्या करोनाबाधितांच्या संख्येमुळे नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठांचे कामकाज सध्या ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे असोसिएशनच्या विनंतीवर बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे.
न्यायदालनात होणारी गर्दी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने न्यायालयाचे कामकाज प्रत्यक्ष पद्धतीसोबतच आभासी पद्धतीने चालवण्याची विनंती असोसिएशनने पत्राद्वारे केली आहे. गेल्या वर्षी करोनाच्या पाश्र्वभूमीवर ऑनलाइन पद्धतीने सुरू असलेले न्यायालयाचे कामकाज १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आले, तर मुंबईबाहेरील वकील वा पक्षकारांच्या प्रकरणांची सुनावणी ही ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येते.
मुंबई खंडपीठाचे कामकाज अद्यापही प्रत्यक्षपणे चालवले जात आहे. मात्र मुंबईतील करोनाबाधितांच्या संख्येतही दिवसेंदिवस विक्रमी वाढ होत आहे. मोठ्या प्रमाणात वकीलवर्गही करोनाबाधित होत आहे. असे असतानाही न्यायदालनातील गर्दी काही कमी झालेली नाही. सार्वजनिक आरोग्याचा विचार करता यामुळे करोनाचा प्रसारच होईल. या सगळ्या परिस्थितीचा विचार करता मुंबई येथील मुख्य खंडपीठाचे कामकाज ऑनलाइन पद्धतीनेही चालवण्यात यावे, अशी विनंती असोसिएशनने मुख्य न्यायमूर्तींना केली आहे.