नोव्हेंबर (November) महिना संपायला अवघे काही दिवस उरले आहेत. मात्र, राज्यात अद्यापही बऱ्याच भागात थंडीची चाहुल लागलेली नाहीये. उलट बऱ्याच भागात पावसाचा इशारा (Rain) हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. पुण्यासह राज्याच्या काही भागात पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
अरबी समुद्र आणि तामिळनाडूच्या किनारपट्टी परिसरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसासाठी पोषक हवामान असल्याचं हवामान विभागाने सांगितलं आहे. त्यामुळे पुणे वेधशाळेने 30 नोव्हेंबरपासून पुढील तीन दिवस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवली आहे.
त्यापार्श्वभूमीवर राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, नंदुरबार, धुळे, औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबाद, लातूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सातारा या जिल्ह्यांना ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागानं जारी केलेल्या माहितीनुसार 29 नोव्हेंबर आणि 30 नोव्हेंबरला मुंबईत पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. 30 नोव्हेंबरला मुंबईला यलो अॅलर्ट दिला आहे.
हवामान विभागानं सोमवारी 29 नोव्हेंबरसाठी रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, 30 नोव्हेंबरसाठी ठाणे, मुंबई, रायगड, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग, नाशिक आणि अहमदगर जिल्ह्यांना यलो अॅलर्ट जारी केला आहे. तर, सोमवारी यलो अॅलर्ट देण्यात आला नसला तरी ठाणे, मुंबई आणि सोलापूर जिल्ह्यात पाऊस होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे, मंगळवारी सोलापूर, औरंगाबाद आणि पालघर जिल्ह्यात देखील पाऊस होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.