दक्षिण आफ्रिकेतून १९ दिवसांत
एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत
दक्षिण आफ्रिकेतून गेल्या १९ दिवसांत एक हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आल्याची धक्कादायक माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी दिली आहे. आफ्रिका आणि युरोपीय देशांमध्ये ओमिक्राॕन वेगाने फैलावत असल्याने संपूर्ण जगाला चिंता सतावत आहे. आफ्रिकेत करोनाच्या या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध आणली आहेत. केंद्र सरकारसोबत राज्य सरकारने तेथून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध आणले असताना आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीने चिंता वाढवली आहे.
ओमिक्रॉनचे उत्परिवर्तन लसी
त्यावर तितक्या प्रभावी नसतील
दिल्लीच्या एम्स हॉस्पिटलचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया म्हणाले की अशा परिस्थितीत जगातील सर्व कोविड लसींचा आढावा घ्यावा लागेल कारण बहुतेक लसी स्पाइक प्रोटीनच्या विरूद्ध प्रतिपिंडे विकसित करतात आणि त्या आधारावर ही लस कार्य करते. डॉ गुलेरिया म्हणाले, “आता या प्रदेशात ओमिक्रॉनचे उत्परिवर्तन होत आहे, म्हणजेच रूप बदलत आहे, तेव्हा अनेक लसी त्यावर तितक्या प्रभावी नसतील.”
कृषीविषयक कायदे मागे
घेण्याचे विधेयक मंजूर
हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषीविषयक कायदे परत करण्याबाबत दिलेले आश्वासन पूर्ण झाले आहे. लोकसभेनंतर आता राज्यसभेतूनही कृषीविषयक कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर झाले आहे. विरोधकांच्या गदारोळात हे विधेयक मंजूर करण्यात आले आहे. आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने कायदे मागे घेण्याची औपचारिकता पूर्ण होणार आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी मांडल्यानंतर लोकसभेने शेती कायदे रद्द करण्याचे विधेयक कोणत्याही चर्चेविना मंजूर केले.
बलात्कार प्रकरणात
24 तासात दिला निकाल
बिहारमधील अररिया जिल्हा न्यायालयाने एका दिवसात निकाल देऊन संपूर्ण देशासमोर एक आदर्श निर्माण केला आहे. पोक्सो कायद्यान्वये दाखल झालेल्या गुन्ह्याची सुनावणी करताना जिल्हा न्यायालयाने त्याच दिवशी साक्ष व युक्तिवाद ऐकून आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. पॉक्सो कायद्यासाठी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत राय यांनी हा निर्णय दिला आहे. २३ जुलै रोजी अररियातील नरपतगंज पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
५० पेक्षा जास्त एसटी
कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हे
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला हिंसक वळण लागले असून आतापर्यंत ५० पेक्षा जास्त गुन्हे एसटी प्रशासनाने नोंदविले आहेत. यात ३१ गुन्हे एसटीवर दगडफेक केल्याप्रकरणी असून एका प्रकरणातील गुन्हेगार हा महामंडळाचा वाहक असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. रविवारी सायंकाळी ६ वाजेपर्यंत एक हजार १०८ गाडय़ा धावल्या, तर १८ हजार ३७५ कर्मचारी कामावर रुजू झाले.
सरकार पडणार आहे, कुणाच्या पोटात
दुखण्याचं काय कारण?
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी तीन दिवसांपूर्वी दिल्लीत माध्यमांशी बोलताना राजकीय भविष्यवाणी करत, राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार असल्याचं म्हटलं. त्यानंतर त्यांच्या या विधानाला विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील दुजोरा देत, राज्यात भाजपाचं सरकार येणारचं असं ठासून सांगितल्यानंतर, आता खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील अशाच प्रकारचं विधान केल्याने, राज्यात सत्ताबदल होणार की काय? अशा चर्चांना उधाण आलं आहे. सरकार पडणार आहे असं म्हटल्यामुळे कुणाच्या पोटात दुखण्याचं काय कारण? माझ्या प्रत्येक म्हणण्याला आधार असतो. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
विषाणूला रोखण्यासाठी जे जे
आवश्यक आहे ते सर्व करा : मुख्यमंत्री
कोरोनाचा नवा अवतार म्हणजेच ओमिक्रॉन व्हायरसची पूर्ण जगाने धास्ती घेतलीय. कोरोनाला थोपवण्यासाठी देशपातळीवर आवश्यक ती सर्व काळजी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी तसेच अन्य अधिकारी आणि मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली आहे. या बैठकीत कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते सर्व करा, असे स्पष्ट निर्देश ठाकरे यांनी दिले आहेत.
भारत विजयाच्या जवळ;
न्यूझीलंडचा सातवा गडी माघारी!
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील कानपूर कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि विल सोमरविले यांनी १ बाद ४ धावांवरून पुढे फलंदाजीला सुरुवात केली. पण भारतीय फिरकीपुढे न्यूझीलंडची फलंदाजी ढेपाळली. चहापानानंतर न्यूझीलंडचे सात गडी तंबूत परतले. तत्पूर्वी श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला.
SD social media
9850 60 3590