एनडीएच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू काल मुंबईत आल्या होत्या. राष्ट्रपतीपदाचे उमेदवार मुंबईत आले तर शिवसेना प्रमुखांच्या मातोश्री या निवासस्थानी भेट घेतात, अशी एक राजकीय पंरपरा मानली जात होती. पण गुरुवारी तसं घडलं नाही. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. तरीदेखील द्रौपदी मुर्मू काल मातोश्रीवर आल्या नाहीत. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे याच गोष्टीवरुन मनसेचे नेते यशवंत किल्लेदार यांनी ट्विटरवरुन उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक टीका केली आहे. ‘मातोश्रीचं आता पूर्वीचं वजन संपलं आहे आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत’, अशी खोचक टीका किल्लेदार यांनी केली.
“राष्ट्रपती पदाचे उमेदवार मुंबईत आले की पाठिंब्यासाठी मातोश्रीवर जरूर जातात. पण यावेळेस आताचे उमेदवार द्रौपदी मुर्मू या मुंबईत येऊन देखील मातोश्रीवर का गेल्या नाहीत? मातोश्रीचे पूर्वीचे वजन संपलं आणि याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. आजच्या शिवसैनिकांनी अभिमान बाळगायला हवा”, अशी टीका यशवंत किल्लेदार यांनी केली.
शिवसेनेने याआधी राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रपती निवडणुकीच्या वेळी प्रणव मुखर्जी जेव्हा मुंबईत आले होते तेव्हा त्यांनी मातोश्रीवर जावून शिवसेना प्रमुखांची भेट घेतली होती. पण आज तसं घडलं नाही. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी मातोश्रीवर जाणं टाळलं.
दरम्यान, यशवंत किल्लेदार यांनी न्यूज18 लोकमतला प्रतिक्रिया देताना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावरदेखील टीका केली आहे. “काल झालेल्या मुसळधार पावसामुळे शिवाजी पार्क परिसरात पाणी साचले होते. काही दिवसांपूर्वीच शिवाजी पार्क मैदानाचे काम चालू होते. संपूर्ण शिवाजी पार्कमध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कुचकामी ठरला आहे. याला 2 कोटी पूर्ण खर्च असताना ४ कोटी खर्च का दाखवण्यात आला? 2 कोटींचे काय झाले?” असा सवाल मनसे उपाध्याक्ष यशवंत किल्लेदार यांनी केला. यामध्ये आदित्य ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप किल्लेदार यांनी केला.