सॅनिटायझर पिऊन कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. संचित रजा नामंजूर केल्याचा राग आल्याने कैद्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र कारागृह प्रशासनाला वेळीच हा प्रकार समजल्याने त्याचे प्राण बचावले आहेत.
नाशिक कारागृहातील कैदी अविनाश जाधव याने सॅनिटायझर पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कारागृहातील अधिकारी त्रास देत असल्याची सुसाईड नोटही त्याने तयार केली होती. अविनाश जाधववर नाशिकच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कारागृह प्रशासनाकडून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम सुरु आहे.
काही दिवसांपूर्वीच पॅरोलवर तुरुंगाबाहेर आलेल्या माजी आमदारपुत्राने गळफास घेतल्याची घटना समोर आली होती. पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱ्या सुनील पाचपुते याने नांदेडमध्ये आत्महत्या केली होती. 53 वर्षीय सुनील पत्नीच्या हत्येप्रकरणी औरंगाबादमधील हर्सूल जेलमध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
तळोजा कैद्याची खारघरमध्ये आत्महत्या
खारघरमध्ये क्वारंटाईन असलेल्या आरोपीने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात समोर आला होता. ड्रग्ज बाळगल्याच्या आरोपाखाली शिक्षा भोगत असलेल्या महम्मद सुलेमान याने क्वारंटाईन सेंटरमध्येच गळफास घेतला होता. तळोजा जेलमधील कैद्यांना कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी खारघरमधील गोखले हायस्कूलमध्ये विलगीकरण कक्ष तयार करण्यात आले होते. या ठिकाणी अनेक कैदी क्वारंटाईन करण्यात आले होते. महम्मद सुलेमान दिल्लीतील ‘एनडीपीएस’ ड्रग्ज प्रकरणातही सहभागी होता.