काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी देशातील राजकीय परिस्थितीवर चर्चा करणारे राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पहिल्यांदाच काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. गेल्या दहा वर्षात काँग्रेस 90 टक्के निवडणुका हरली आहे. विरोधी पक्षाचं नेतृत्व करणं हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही, असा हल्लाच प्रशांत किशोर यांनी चढवला आहे.
प्रशांत किशोर यांनी ट्विट करून हा हल्ला चढवला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मुंबईत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी यूपीएचं अस्तित्व नाकारणारी प्रतिक्रियाही दिली होती. त्यानंतर प्रशांत किशोर यांनी हे ट्विट केल्याने त्याला अधिक महत्त्व प्राप्त झालं आहे.
प्रबळ विरोधी पक्ष बनण्यासाठी काँग्रेस ज्या विचाराचं प्रतिनिधीत्व करते ते महत्त्वाचं आहे. पण विरोधी पक्षाचं नेतृत्व करणं हा काही काँग्रेसचा दैवी अधिकार नाही. गेल्या दहा वर्षात काँग्रेस 90 टक्के निवडणुका हरली आहे. त्यामुळे अशावेळी लोकशाही पद्धतीने विरोधी पक्षाचं नेतृत्व कुणी करावं हे काँग्रेसने ठरवू द्यावं, असं प्रशांत किशोर यांनी म्हटलं आहे.
ममता बॅनर्जी या पश्चिम बंगालमध्ये सत्तेत आल्यापासून राजकीय मोट बांधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी त्यांच्या विरोधी पक्षांच्या नेत्यांशी भेटीगाठी घेतल्या. दोन दिवसांपूर्वी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी विदेशात राहून राजकारण कसं करता येईल? असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधींवर हल्ला चढवला होता. काल त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत तासभर चर्चा केली. त्यानंतर पवार आणि ममतादीदी मीडियाला सामोरे गेले. यावेळी ममतादीदींनी थेट पवारांसमोरच यूपीएचं अस्तित्व नाकारलं. तसेच सर्व विरोधी पक्षांनी एक आल्याशिवाय भाजपचा पराभव होणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. त्यानंतच प्रशांत किशोर यांनी ट्विट केलं आहे. ममता बॅनर्जी यांच्या प्रयत्नांना बळ देण्यासाठी प्रशांत किशोर यांनी टायमिंग साधला आहे का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.
यापूर्वी जुलैमध्ये प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधींची भेट घेतली होती. प्रशांत किशोर यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचीही भेट घेतली होती. केसी वेणुगोपालही या बैठकीला उपस्थित होते. तब्बल तासभर ही बैठक चालली होती. या बैठकीत देशाचा राजकीय कल, देशातील काँग्रेसची सध्याची स्थिती आणि त्यावरील उपाय यावरही चर्चा झाली होती.