आयपीएलच्या यंदाच्या पर्वात प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठीच्या शर्यतीत सर्वात पुढे असणाऱ्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाने एक मोठा विजय मिळवत आपलं प्लेऑफमध्ये जाण्याचं स्वप्न अजून बळकट केलं आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सला 86 धावांनी मात देत मोठा विजय स्वत:च्या नावे केला आहे.
प्रथम फलंदाजी करताना शुभमन गिलत्या अर्धशतकाच्या जोरावर केकेआरने 171 धावां स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर मात्र केकेआरच्या गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने उत्कृष्ट गोलंदाजी करत 85 धावांवर राजस्थानला सर्वबाद करत 86 धावांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह गुणतालिकेतील चौथ स्थानही त्यांनी कायम ठेवलं असून नेट रन रेटमध्ये अव्वल स्थानावर असणाऱ्या दिल्लीलाही मागे सोडले आहे. विजयानंतर केकेआरचा कर्णधार इयॉन मॉर्गनसह सर्व संघ अतिशय आनंदी दिसत होता.
सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानने गोलंदाजी निवडली. त्यामुळे केकेआरचा संघ प्रथम फलंदाजीला आला. यावेळी केकेआरची सलामी जोडी व्यंकटेश अय्यर आणि शुभमनने उत्तम सुरुवात करुन दिली. पण 38 धावांवर अय्यर बाद झाल्यानंतर काही फलंदाज लवकर बाद झाले. ज्यानंतर राहुल त्रिपाठीने मात्र गिलसोबत सामना सांभाळला. दरम्यान सलामीवीर शुभमनने 44 चेंडूत 4 चौकार आणि 2 षटकार खेचत 56 धावा केल्या. तर त्रिपाठीने 21 धावांची साथ त्याला केली. त्यामुळे केकेआरने 171 धावांपर्यंत मजल मारली.
लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानालर आलेल्या राजस्थान संघाची फलंदाजी अगदी पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे ढासळली. यशस्वी जैस्वाल शून्यावर बाद झाला. त्यानंतर पुढे सर्वच फलंदाज अगदी काही धावांत बाद झाले. 40 धावांच्या आत तर 7 फलंदाज तंबूत परतले होते. केवळ राहुल तेवतियाने 44 धावा केल्या पण तो बाद होताच राजस्थान सर्वबाद झाली आणि 86 धावांनी केकेआर विजयी झाली. केकेआरकडून शिवम मावीने 4, लॉकी फर्ग्यूसनने 3 आणि वरुणसह शाकिबने प्रत्येकी 1 विकेट घेतला. तर राजस्थानचा एक गडी धावचीत झाला.