मलेरिया वरील जगातील पहिल्या
लसीला आरोग्य संघटनेची मान्यता
मलेरियामुळे दरवर्षी जगभरात तब्बल ४,००,००० जणांचा मृत्यू होतो. यात आफ्रिकन देशांमधील लहान मुलांची संख्या सर्वाधिक आहे. अशा या जीवघेण्या मलेरिया आजारावरील जगातील पहिल्या लसीला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिलीय. RTS S/AS01 असं या मलेरिया लसीचं नाव आहे. यामुळे मलेरियामुळे होणाऱ्या मृत्यूंवर नियंत्रण राखण्यात यश येणार आहे. विशेष म्हणजे मलेरियाचे सर्वाधिक बळी आफ्रिकन देशांमध्ये जातात. दर मिनिटाला एका लहान मुलाचा मलेरियामुळे जीव जातो.
अजित पवार यांच्या
बहिणीच्या पब्लिकेशनवर छापा
अजित पवारांशी संबंधित कारखान्यांच्या संचालकांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून कारवाई केली जात असल्याची माहिती समोर येत आहे. साताऱ्यातील जरंडेश्वर साखर कारखान्यावर प्राप्तिकर विभागाने छापा टाकला आहे. फक्त जरंडेश्वरच नाही तर दौंड शुगर, आंबलिक शुगर, पुष्पदंतेश्वर शुगर, नंदुरबार या खासगी साखर कारखान्यांवर कारवाई सुरू असल्याचं कळत आहे. हे सर्व साखर कारखाने अजित पवारांच्या निकटवर्तीयांचे असल्याचं कळत आहे. दरम्यान अजित पवार यांची बहीण विजया पाटील यांच्या मुक्ता पब्लिकेशनवर देखील छापा टाकला आहे.
हे खालच्या पातळीचं
राजकारण : अजित पवार
माझ्याशी संबंध आहे म्हणून यंत्रणांच्या धाडी टाकणं हे खालच्या पातळीचं राजकारण असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले आहेत. माझे नातेवाईक असल्याने धाडसत्र सुरु आहे याचं वाईट वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. “छापेमारी कोणावर करावी हा प्राप्तिकर विभागाचा अधिकार आहे. जर काही शंका आली तर ते छापेमारी करु शकतात. माझ्याशी संबंधित काही कंपन्यांवर छापेमारी झाली आहे. मी राज्याचा अर्थमंत्री असल्याने आर्थिक शिस्त कशी लावायची असते, कोणताही कर कसा चुकवायचा नाही हे मला चांगलं माहिती आहे. माझ्याशी संबंधित कंपन्यांचे कर वेळीच भरले जातात,” असं अजित पवारांनी यावेळी सांगितलं.
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी
यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश
भाजपानं आपली राष्ट्रीय कार्यकारिणीची नवी यादी आज जाहीर केली आहे. या यादीमध्ये महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचा समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपामध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांचा राष्ट्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांच्या जबाबदारीमध्ये बदल करण्यात आलेला नाही. महत्त्वाचा बदल दिसला तो म्हणजे पक्षाचे सर्वात ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांच्या बाबतीत. गेल्या वेळी लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी यांना मार्गदर्शक म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. त्यांचा समावेश राष्ट्रीय कार्यकारिणीत करण्यात आला आहे.
येत्या काही तासात राज्यातील काही
भागात मुसळधार पावसाचा इशारा
राज्यात येत्या काही तासात पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज 07 ऑक्टोबर रोजी दुपारी 3 वाजता नवा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यांसह अनेक ठिकाणी 30-40 किमी प्रति तास वेगाने वादळी वाऱ्यासह गडगडाटी वादळ आणि मध्यम ते तीव्र पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अहमदनगर, पालघरमध्ये पुढील 3-4 तासांच्या दरम्यान बाहेर जाताना खबरदारी घेण्याचं आवाहन आयएमडी मुंबई विभागाने केलं आहे.
दसऱ्या पर्यंत राज्यात शंभर कोटी
लसीचे डोस देण्याचे उद्दिष्ट
करोनाच्या रुग्णवाढीवर काही प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात राज्य सरकारला यश आलेलं आहे. मात्र, अजूनही तिसऱ्या लाटेचा धोका कायम असून त्यासाठी वेगाने पूर्ण जनतेचं लसीकरण करणं आवश्यक असल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. या पार्श्वभूमीवर देशभरात दसऱ्यापर्यंत १०० कोटी लसीचे डोस देण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारने ठेवलेलं असताना राज्य सरकारने त्यासाठी ‘मिशन कवच कुंडल’ योजनेची घोषणा केली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये त्यासंदर्भात घोषणा केली.
लखीमपूर प्रकरणी मंत्र्याच्या
मुलाविरोधात गुन्हा दाखल
उत्तर प्रदेशातील लखीमपूर हिंसाचार प्रकरणामध्ये लखनऊचे पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी पोलीस दल केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांचा पुत्र आशीषच्या मागावर असल्याचं सांगितलं आहे. लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणी आशीषविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सध्या आशीषच्या मागावर आहेत. आशीषला अटक करण्यासाठी पोलिसांची पथक काम करत आहेत. एफआयआरमध्ये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीनगर मध्ये दहशतवाद्यांकडून
गोळीबार , दोन शिक्षकांचा मृत्यू
जम्मू -काश्मीरमध्ये पुन्हा एकदा नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांचे लक्ष्य बनले आहेत. श्रीनगरच्या ईदगाह परिसरात गोळीबार झाल्याचे वृत्त आहे, ज्यात दोन शिक्षकांचा मृत्यू झाला आहे. अज्ञात हल्लेखोरांनी शाळेच्या मुख्याध्यापक आणि सफा कडल येथील एका शिक्षकाची गोळ्या घालून हत्या केली. हल्लेखोर दहशतवादी असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम सुरू आहे.
रवी शास्त्री, निक वेब
टीम इंडियाला सोडणार
यंदाच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेनंतर टीम इंडियाला नवीन प्रशिक्षक मिळण्याची अपेक्षा आहे. विश्वचषकानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपत आहे आणि बीसीसीआय नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. दरम्यान, संघाशी संबंधित आणखी एका दिग्गज व्यक्तीने संघ सोडण्याची घोषणा केली आहे. टीम इंडियाचे स्ट्रेंथ आणि कंडिशनिंग प्रशिक्षक निक वेब विश्वचषकानंतर संघ सोडतील. त्यांनी यासंदर्भात बीसीसीआयला कळवले आहे.
SD social media
9850 60 3590