आजपासून सर्वत्र नवरात्र उत्सव सुरू होत आहे. नवरात्रोत्सव चैतन्य आणि भक्ती भावाचे महापर्व आहे. त्यानिमित्ताने नऊ दिवस महाराष्ट्रातील आदिशक्ती मातेच्या, कुलस्वामिनीच्या विविध रूपांची माहिती या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत.
या देवी सर्वभूतेषु
मातृ रुपेण संस्थिता:
नमस्तस्ये नमस्तस्ये
नमस्तस्ये नमो नमः
घराघरात जिचे मातृरूपात अस्तित्व असतेच अशा आदिशक्ती कुलस्वामिनीची स्थापना करून नऊ दिवस, नऊ रात्री श्रद्धा भक्तीने जागर करायचा म्हणजे नवरात्र…।
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी तिथि असे नऊ दिवस घरोघरी कुलदेवतेची स्थापना करतात. आपल्या घरावर आपल्या कुटुंबावर तिचे कृपाछत्र असावे, आपले दैवत अधिक प्रभावी व्हावे, अदृश्य अशा वाईट आणि दृष्ट शक्तीपासून आपले संरक्षण व्हावे यासाठी आपल्या भारतीय संस्कृतीत नवऱात्राचे व्रत एक अमूल्य ठेवा पूर्वापार जतन केला जातोय.
आमच्या सनातन धर्मात अतिशय कर्तव्य पूर्ण साधनेतून सांभाळली जाणारी ही परंपरा आहे. त्यातून मिळणारी सकारात्मक ऊर्जा तिच्या सर्व भक्तांसाठी कल्याणकारी शक्तीचा स्रोत असतो.
अश्विन प्रतिपदेच्या दिवशी एका पळसाच्या पत्रावळीवर काळ्या मातीचा सपाट ढीग करून त्यात गहू, ज्वारी, बाजरी, उडीद, मूग, हरभरा, मसूर असे सप्तधान्य पेरले जाते. काही ठिकाणी फक्त गहूच पेरतात. त्यावर मंगल कलश ठेवून, त्यावर कुंकूवाचे स्वस्तिक काढतात वर तबकडी किंवा वाटीत लाल वस्त्र टाकून देवीचा टाक किंवा देवीची मूर्ती स्थापित करतात.
देवीची स्थापना
नऊ दिवसांच्या नऊ माळा लावल्या जातात. नवीन वस्त्र देवीला परिधान केले जातात. घटस्थापने बरोबर समई, नंदादीप दिव्याची ही स्थापना करतात. आमचे आदिशक्ती स्वरूप दीप ज्योतीप्रमाणे तेजोमय आहे, स्फूर्ती देणारे आहे, नवी ऊर्जा, शक्ती देणारे आहे. देवीची शोडषोपचारे पूजा करून विविध सुवासिक फुले, माळा,वेणी, हार, गजरे अर्पिली जातात. अनेक ठिकाणी सुंदर सुरेख अशी आरास केलेली असते. नाना अलंकारांनी नटलेल्या देवीचा शृंगार बघण्यासारखा असतो.
नऊ दिवसांचे मंगलमय वातावरण
विविध रंगांच्या रोषणाई आणि दिव्याच्या माळनी देवीचा गाभारा, मंदिर सुशोभित केले जातात. नैवेद्य दाखवला जातो. शंख नाद, झांज, नगारे ,घंटा यांच्या ठेक्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या देवीच्या आरत्या गाऊन तिची स्तुती गायली जाते. देवी अथर्वशीर्ष, सप्तशती पाठ ,देवी अष्टक असे विविध स्तोत्राचे पठण केले जाते. जो तो आपापल्या श्रद्धा,भक्ती भावाने या आपल्या कुलस्वामिनीचे, आदिशक्तीचे मनोभावे पूजन करत असतात ,उपासना करतात. नऊ दिवस उपवास, धान्य फराळ करून नवव्या दिवशी देविला पंचपक्वानाचा नैवेद्य अर्पित करता. देवी आपल्याकडे नऊ दिवसाच्या साठी पाहुणी आलेली असाही एक समज असतो . तो विश्रांतीचा काळ समजला जातो.
आदिशक्तीची ओटी भरतात
पहिल्या दिवशी स्थापना आणि नवव्या दिवशी तिची खणा-नारळाने ओटी भरून पाठवणी केली जाते. नऊ दिवस भजन, पोवाडे, गोंधळ, जप, मंत्र असा भरगच्च भक्तीमय वातावरणात देवीचा जागर केला जातो. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही केले जाते. अनेक ठिकाणी दांडिया सारखे नृत्य प्रकार सादर करतात. आपली देवी, आदिशक्ती बद्दल भक्ती प्रदर्शित करण्यात स्त्री पुरुष मुलं सहभागी होतात. माहेरी आलेली सासुरवाशीण लेक सासरी जाताना तिची ओटी भरून पाठवण करण्याची आमची फार जुनी पुरातन प्रथा आहे . त्याच प्रमाणे साधारण अष्टमी आणि नवमीच्या दिवशी सुवासिनी देवीची खणानारळाने ओटी भरतात. निर्गुण तत्वाला साडी खण नारळाची ओटी भरणे म्हणजे मूर्त सगुण रूप साकार होणे. आपल्या धर्माच्या रूढी परंपरेनुसार ओटीला अनन्यसाधारण महत्त्व आहेच. शरीर मनाने नाजूक कोमल असलीतरी नवनिर्मितीचे आणि वंशवृद्धी चे बळकट सामर्थ्य तिच्यात आहे. ओटी तिचा मुख्य अवयव समजले जाते. त्यालाच ओटीपोट असेही म्हणतात. गर्भाशयाचे सामर्थ्य असलेल्या सुवासिनीची म्हणूनच भरली जाते तिला मातृत्व आणि संतती प्राप्त व्हावी यासाठी ओटी भरतात.
दुर्गासुरावर विजय मिळवला म्हणून विजयादशमी
नवरात्रीचे नऊ दिवस मोठ्या भक्ती भावाने असे निघून जातात आणि देवी विजया दशमीच्या दिवशी अर्थात दसऱ्याच्या दिवशी अश्वारूढ होऊन सीमोल्लंघनाला निघते. राक्षसांचा राजा दुर्गासुर ज्याने तप करून ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की त्रिभुवनात तुला कोणीही वीरपुरुष जिंकू शकला नाही, या वरामुळे दुर्गासुर इतका प्रबळ झाला की त्याने चंद्र, वरूण, इंद्र आणि यम यांना बंदी केले, शेवटी दुर्गासुराच्या वधासाठी पार्वतीने वेगळे रूप घेतले आणि त्या रूपाला विजया असे नाव दिले. तिला विविध शस्त्रांनी सज्ज केले शंकराने आपला त्रिशुळ दिला, तिला विष्णुने आपले सुदर्शन चक्र आणि कवच दिले. अशाप्रकारे प्रत्येक देवाने आपली वेगवेगळी शस्त्रे तिला अर्पण केली. ही शस्त्रे पेलण्यासाठी पार्वतीने आठ- बाहू धारण केले. या अष्टभुजा धारण केलेल्या पार्वतीने नऊ दिवस लढून दहाव्या दिवशी दुर्गासुराचा नाश केला, अशीही आख्यायिका आहे आणि म्हणून दहाव्या दिवसाला विजयादशमी असेही म्हणतात. आणि विजयादशमीचे आनंद सोहळ्या नंतर नवरात्रीची समाप्ती होते.
नवरात्र उत्सवाचे हे नवे पर्व आपण सर्वांसाठी समृद्धी आणि आरोग्यदायक करावे या सदिच्छा.
सौ.अंजली हांडे, जळगाव