राज्यात पूर्वमोसमी पावसाचा हंगाम सुरू झाला आहे. राज्यात गुरुवारपासून (१८ मार्च) मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. कोकणातही पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.
मार्च ते मे या कालावधीत पूर्वमोसमी पाऊस होतो. उष्णतेसह समुद्रातून बाष्प येऊन कमी दाबाचे पट्टे या काळात तयार होत असतात. पश्चिमी चक्रवातामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यांत पावसाची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रातही १८ ते २० मार्च या कालावधीत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
मध्य महाराष्ट्रात नाशिक, जळगाव आणि पुणे जिल्ह््यांत काही ठिकाणी, मराठवाड्यात औरंगाबाद, जालना, परभणी आणि बीड जिल्ह््यांत, विदर्भात नागपूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह््यांत पावसाचा अंदाज आहे. कोकणातील रत्नागिरी आणि रायगड येथेही पावसाची शक्यता आहे.
तापमानातही होणार वाढ
पावसाचा अंदाज असला तरी राज्यात दिवसाचे तापमान वाढणार आहे. सरासरी तापमान २ ते ३ अंश सेल्सिअस अंशांनी वाढणार आहे. पुणे, सोलापूर, सांगली, औरंगाबाद, बीड आदी भागांत ३६ ते ३७, तर नांदेड, अकोला, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, बुलढाणा आदी भागांत कमाल तापमान ३८ ते ३९ अंशांवर आहे. एक-दोन दिवसांत त्यात किंचित घट होण्याची शक्यता आहे