राज्य सरकारपाठोपाठ केंद्र सरकारने सुद्धा सण, उत्सव साजरे करू नये, असे आदेश दिले आहे. पण, तरीही मनसेनं दहीहंडी उत्सव साजरा करणारच असा पवित्रा घेतला आहे. कलम 149 प्रतिबंधात्मक कारवाईची नोटीस बजावून देखील मनसे आपल्याला मतावर ठाम असून मनसेने ठाण्यात दहिहंडी उत्सवाची तयारी केली असून ज्या नौपाडा भागातील मैदानात मनसेने दहीहंडी उत्सव साजरा करण्याची तयारी सुरू देखील केली आहे.
पावसामुळे मैदानात उगवलेले गवत कापण्याचे काम मनसेने सुरू केले असून मंडप देखील उभारले जाणार आहे. या कामाची पाहणी करण्याकरता मनसे नेते बाळा नांदगावकर हे ठाण्यात आले होते. बंदी आणायची तर सर्व सणांवर आणा फक्त हिंदू सणांवर का? बस सुरू, रेल्वे सुरू इतर गर्दीची ठिकाणे सुरू, मग सणांवर निर्बंध का? असा सवाल यावेळेस मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सरकारला केला.
तर कितीही नोटीसा आल्या तरी मनसे दहीहंडी उत्सव साजरा करण्यावर ठाम आहे असा पुर्नरुच्चार देखील बाळा नांदगावकर यांनी केला. यावेळेस ठाण्यातील मनसे शहर प्रमुख रवींद्र मोरे यांच्यासह अनेक मनसे पदाधिकारी कार्यकर्ते दहीहंडी उत्सवाची तयारी करत होते. यातील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ठाणे पोलिसांनी कलम १४९ नुसार प्रतिबंधात्मक नोटीसा बजावल्या आहेत, असं असूनही आम्ही दहीहंडी साजरी करणारच असा इशारा पुन्हा एकदा या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दिला.