अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 13 अमेरिकन कमांडो शहीद झाले आहेत, असे अमेरिकेने म्हटले आहे. या हल्ल्याचा तीव्र निषेध करत आमचे सैनिक आणि निरापराध नागरिक मारले गेले आहेत, याचे दु:ख आहे. या दु:खामुळे व्हाइट हाऊसवरील ध्वज अर्ध्यावर खाली आणला आहे. दरम्यान, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी काबूल विमानतळाजवळ झालेल्या हल्ल्यात 13 यूएस कमांडोच्या मृत्यूबाबत दुजोरा दिला आहे आणि म्हटले आहे की, आमच्या सैनिकांनी हजारो लोकांचे प्राण वाचवताना बलिदान दिले आहे.
त्यांनी ट्विट केले, ‘काबूलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अमेरिकन लष्कराचे 13 सदस्य मारले गेले. हजारो लोकांचे प्राण वाचवताना हे धाडसी सैनिक मरण पावले, ते नायक आहेत. पुढच्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या, ‘डग्लस अॅमहॉफ आणि मी अमेरिकन गमावलेल्या अमेरिकनांबाबत शोक व्यक्त करतो. हल्ल्यात जखमी झालेल्या अमेरिकनांसाठी आम्ही प्रार्थना करतो. मारल्या गेलेल्या आणि जखमी झालेल्या अफगाण नागरिकांबद्दलही आम्हाला वाईट वाटते.
काबूल विमानतळावर झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात ठार झालेल्या अमेरिकन सैनिकांच्या मृत्यूबद्दल अमेरिकेने शोक व्यक्त केला आहे आणि व्हाईट हाऊसवरील आपला झेंडा खाली केला आहे. माहिती देताना प्रेस सेक्रेटरीने सांगितले की 30 ऑगस्टपर्यंत अमेरिकन ध्वज खाली ठेवला जाईल.
काबूल विमानतळावरील दहशतवादी हल्ल्यानंतर अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्लामिक स्टेटला (ISIS) कडक शब्दात इशारा दिला आहे. बायडेन म्हणाले की, ISIS ला त्याची मोठी आणि जबर किंमत मोजावी लागेल. ही जखम आम्ही विसरणार नाही. आम्ही प्रत्येक दहशतवादी शोधून त्यांना ठार मारु.
गुरुवारी अफगाणिस्तानमधील काबूल विमानतळाजवळ एका जमावावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात आणि बंदूकधाऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात किमान 72 जण ठार झाले आणि अनेक जण जखमी झाले. या हल्ल्यात 13 अमेरिकन कमांडो ठार झाले आहेत, तर 18 जखमी झाले आहेत. एका अफगाण अधिकाऱ्याने दावा केला आहे की विमानतळावरील हल्ल्यात किमान 60 अफगाणी ठार झाले आहेत आणि सुमारे 143 इतर जखमी झाले आहेत.