सर्वत्र उत्साहात दसरा साजरा होतो आहे. बऱ्याच ठिकाणी रावणदहन केलं जातं आहे. विजयादशमीच्या या उत्साहात भयंकर दुर्घटना घडली आहे. रावणदहनात रावणाचा पेटता पुतळा गर्दीवर कोसळला आहे. हे भयानक दृश्य कॅमेऱ्यात कैद झालं आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. व्हिडीओ पाहूनच अंगावर अक्षरशः काटा येईल.
हरयाणाच्या यमुनानगरमधील ही धक्कादायक घटना आहे. भल्या मोठ्या रावणाचा पुतळा पेटवण्यात आला. पुतळा जसा जळला तसा तो खाली कोसळला. तिथंच खाली लोक रावणदहन केल्याचा आनंद व्यक्त करत होते. सर्वजण उत्साहात होते. या गर्दीवरच हा पेटता रावण कोसळला.
एएनआयने ट्वीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार, यमुनानगरमध्ये दसऱ्यादिनी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. तिथं रावण, मेघनाथ आणि कुंभकर्ण यांचा पुतळा बनवून जाळण्यात आला. अचानक रावणाचा पेटलेला पुतळा लोकांच्या गर्दीवर पडला.
पेटलेल्या पुतळ्याची आग आणि फटाके यात बरेच लोक होरळपले. या दुर्घटनेच नागरिक गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दहनाआधीच कोसळला रावणाचा पुतळा
तर दुसरीकडे हरयाणाच्याच फतेहाबादमध्ये दहनाआधीच पुतळा कोसळला. पुतळा क्रेनने उचलत असताना मध्येच तुटला आणि तो जमिनीवर पडला. त्यानंतर जेसीबीच्या मदतीने कसंबसं पुतळा पुन्हा उभा करण्यात आला आणि तो जाळण्यात आला.
पावसामुळे रावणाच्या पुतळ्याची डोकी मोडली
उत्तर प्रदेशच्या लखनऊ, कानपूरसह बऱ्याच ठिकाणी पावसाने हाहाकार घातला. पावसामुळे विजयादशमीच्या उत्साहात विघ्न आलं. ठिकठिकाणी रावणाच्या पुतळ्याचे हाल झाले. कुठे वाऱ्यामुळे पुतळा उभा राहत नव्हता तर कुठे पावसामुळे पुतळे भिजले होते. कानपूरमध्ये तर रावणाच्या पुतळ्याची 10 पैकी 5 डोकीही मोडली.