आज दि.५ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

SBI बँक खातेधारकांनो सावधान! बँकेनं जारी केला अलर्ट

आजच्या डिजिटल युगाच्या काळात आपली अनेक कामं घरबसल्या ऑनलाईन करता येतात. आज बँकिंग, शिक्षणापासून ते इतर अनेक कामं ऑनलाइन मोठ्या सहजतेनं होत आहेत. एकीकडे डिजिटायझेशनमुळे आपली कामं खूप सोपी झाली आहेत. तर दुसरीकडे  सायबर फसवणुकीचे जगही खूप वाढले आहे. फसवणूक करणारे रोज नवनवीन पद्धती शोधून लोकांची फसवणूक करत आहेत. तुमचे SBI बँकेत खाते असल्यास. अशा परिस्थितीत ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. अनेकदा SBI खातेधारकांना बँकेच्या नावाने अनेक प्रकारचे बनावट कॉल येतात. SBI ने आपल्या खातेदारांसाठी एक विशेष अलर्ट जारी केला आहे. यामध्ये बँकेनं आपल्या ग्राहकांना अनोळखी नंबरवरून पाठवलेल्या कोणत्याही फसवणुकीच्या लिंकवर क्लिक करू नये, असं सांगितलं आहे. अन्यथा मोठं नुकसान होऊ शकतं.

एसबीआयनं आपल्या खातेधारकांना अलर्ट जारी केला आहे की, जर इतर कोणत्याही नंबरवरून येणाऱ्या कॉलवर बँकेशी संबंधित आवश्यक माहिती मागवली गेली तर अशा परिस्थितीत तुम्हाला बँकेशी संबंधित तपशील शेअर करण्याची गरज नाही. असं केल्यानं तुम्ही मोठ्या फसवणुकीला बळी पडू शकता.

रावणाची सासरवाडी जोधपूरमध्ये बांधलंय मंदिर; इथं दहन नाही तर व्यक्त होतो शोक

दसऱ्याच्या दिवशी देशभरात रावणाचे दहन करून सत्याचा असत्यावर विजय असं प्रतिक म्हणून दसरा साजरा केला जातो. मात्र, जोधपूरमध्ये स्वत:ला रावणाचे वंशज म्हणवून घेणाऱ्या श्रीमाळी ब्राह्मण समाजातील लोक लंकापती रावणाच्या मंदिरात शोकसंस्कारासह पूजा-अर्चा करतात. त्यामुळे दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रावण भक्तांची गर्दी पाहायला मिळते.

रावणाचे सासरे जोधपूरमध्ये असल्याचे मानले जाते. रावणाची पत्नी महाराणी मंदोदरी ही जोधपूरच्या मंडोरच्या राजाची कन्या होती. रावण लंकेतून मिरवणूक घेऊन जोधपूरच्या मंडोरेला आला तेव्हा गोदगोत्रातील श्रीमाळी ब्राह्मणही त्याच्या सोबत मिरवणुकीत इथे आले. लग्नानंतर रावण मंदोदरीसोबत लंकेत परतला पण गोदगोत्रातील श्रीमाळी ब्राह्मण जोधपूरमध्येच राहिले. तेव्हापासून आजतागायत ते येथे दशनानची पूजा करतात. हा समाज दसरा शोक म्हणून साजरा करतो. इथे रावणाचे दहन होत नाही.

रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार 3 शास्त्रज्ञांना जाहीर, एकाला 21 वर्षांनी दुसऱ्यांदा मिळाला सन्मान

रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. क्लिक आणि बायोर्थोगोनल रसायनशास्त्राच्या विकासासाठी बुधवारी तीन शास्त्रज्ञांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यामध्ये कॅरोलिन आर बर्टोझी, मॉर्टन मेडेल आणि के बॅरी शार्पलेस यांचा समावेश आहे. 81 वर्षीय शार्पलेस यांना 2001 मध्ये इतर दोन शास्त्रज्ञांसह या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. क्लिक केमिस्ट्री आणि बायोर्थोगोनल केमिस्ट्री या नावाने ओळखल्या जाणार्‍या तंत्रज्ञानाचा वापर सेल्सचा शोध घेण्यासाठी आणि जैविक प्रक्रियांचा मागोवा घेण्यासाठी जागतिक स्तरावर केला जातो.

बायोर्थोगोनल प्रक्रियेच्या वापरामुळे संशोधकांना कर्करोगाच्या औषधांवर संशोधन करणे सोपे झाले आहे, ज्याची क्लिनिकल चाचण्यांमध्ये चाचणी केली जात आहे, असे पुरस्कार देणाऱ्या संस्थेने एका निवेदनात म्हटले आहे. हा पुरस्कार रॉयल स्वीडिश अॕकॅडमी ऑफ सायन्सेसद्वारे दिला जातो. पारितोषिकात एक पदक आणि 10 दशलक्ष स्वीडिश क्राउन किंवा $915,072 दिले जातात. 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात रोख स्वरूपात दिले जातील.

सोलापूरच्या देवीचे पाकिस्तान कनेक्शन, आजही जपलाय ठेवा! 

नवरात्र म्हणजे देवीच्या जागराचा उत्सव. नवरात्रीचे नऊ दिवस दुर्गामातेचे वेगवेगळ्या रूपाचे स्मरण केले जाते. देवीच्या उपासनेनंतर आपल्यावरील सर्व संकटांचे निवारण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. नवरात्रीमधील नऊ दिवस चालेल्या या उत्सवाची सांगता विजयादशमीच्या दिवशी होते. विजयादशमी हा सत्याचा असत्यावरील विजय साजरा करण्याचा दिवस. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या आजच्या दिवशी राज्यभरातील भाविक देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेतात. या दर्शनानं त्यांच्या नवरात्र उत्सवाची सांगता होते. राज्यातील काही देवीची मंदिरं ही प्राचीन आहेत. या प्राचीन मंदिरांमध्ये सोलापूरचे हिंगुलांबिका देवीच्या मंदिराचा समावेश होते. सव्वाशे वर्ष जुन्या असलेल्या या मंदिराचे पाकिस्तानशीही कनेक्शन आहे.भारत आणि पाकिस्तान यांची फाळणी होण्यापूर्वी तत्कालीन सोलापूरातील बासुतकर,पेंडकर,महिंद्रकर,तांदळे,बुलबुले मंडळींनी पाकिस्तान जाऊन या मूळ मुर्तीच्या शिला सोलापूरात आणल्या होत्या. सध्याच्या पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये या मातेचे मूळ मंदिर आहे.

नवरा बायकोचं प्रेम पुन्हा बहरणार; अश्विनी श्रेयसला प्रेमाची कबुली देणार

झी मराठीवरील  ‘तू चाल पुढं’ ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील अश्विनीची गोष्ट प्रेक्षकांना चांगलीच भावते आहे. तुमच्या आमच्यातली सामान्य गृहिणी आपल्या कुटुंबाला कशी आधार देते हे बघायला प्रेक्षकांना आवडतं.  ‘तू चाल पुढं’ या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची पसंती मिळवण्यात बाजी मारली आहे. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करणारी, कुटुंब साभांळणारी आणि वेळी नवऱ्याला आपल्या बाजूनं कसं मनवायचं हे उत्तमरित्या माहिती असणारी अश्विनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक स्त्रीच्या पसंतीस उतरली आहे. अश्विनी पतीला पाठींबा देते पण वेळ आली तर त्याच्या चुकाही दाखवून देते. पण यामुळे तिने विशेष करून महिला प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. आता मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. यामध्ये अश्विनी आणि श्रेयसचे खास क्षण पाहायला मिळणार आहेत.

अश्विनी आणि श्रेयसमध्ये काही काळापासून नाराजी होती. अश्विनी जरी त्याला सतत पाठींबा देत असली तरी श्रेयस मात्र नेहमी तिला कमी लेखतो. तिला वाईट बोलतो. हे अश्विनीला सुद्धा आवडत नाही. ती वेळोवेळी त्याला सुनावत असते, त्याची चूक दाखवून देण्याचा प्रयत्न करते. पण आता श्रेयसला त्याची चूक लक्षात येणार असं नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून लक्षात येतंय. नवीन प्रोमोनुसार, अश्विनी आणि श्रेयसच्या रोमँटिक क्षण आपल्याला मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ते दोघे चक्क डेटवर जाणार आहेत.

दसऱ्याच्या दिवशी रावणाचं नाही तर शूर्पणखेचं दहन, पत्नी पीडित संघटनेने मांडली व्यथा

दसऱ्याच्या दिवशी सर्वत्र रावण दहन केले जाते. मात्र,औरंगाबाद शहरातील पत्नी पीडित पुरुष संघटनेकडून अनोख्या पद्धतीने दसरा सण साजरा केला गेला. पत्नीच्या छळाला कंटाळलेल्या पत्नी पीडित पुरुष संघटनेच्या सदस्यांकडून रावणाची बहीण शूर्पणखा हिचा पुतळा दहन करून पतीचा छळ करणाऱ्या पत्नीचा निषेध व्यक्त करण्यात आला.

ज्याप्रमाणे महिलांचा पुरुषांकडून शारीरिक व मानसिक छळ होतो. त्याचप्रमाणे पुरुषांचाही महिलांकडून शारीरिक व मानसिक छळ केल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहे. महिलांकडून पुरुषांच्या तक्रारी वाढत असल्यामुळे औरंगाबाद शहरामध्ये पत्नी पीडित पुरुषांची एक पत्नीपीडित पुरुष संघटना तयार झाली आहे. या संघटनेच्या माध्यमातून पत्नीकडून होणाऱ्या अन्याय विरोधात काम करण्याचं बळ व लढण्याचे बळ पत्नीपीडित संघटनेच्या माध्यमातून दिले जाते.

शिंदे गटाचा दसरा मेळावा जीवावर बेतला, नाष्ट्याला उतरले अन् हार्ट अटॅकने मृत्यू झाला

दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी शिंदे गटाकडून राज्यभरातून कार्यकर्ते गाड्यात भरभरू आणले जात आहे. पण या सगळ्या राड्यात एका कार्यकर्त्याला आपला जीव गमवावा लागला आहे. शिंदे गटाच्या कार्यकर्त्याचा मुंबईमध्ये हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे.

मुंबईला शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. श्रीकृष्णा मांजरे असं मृतक कार्यकर्त्याचं नाव आहे. मृतक श्रीकृष्णा मंत्री संजय राठोड यांचे समर्थक होते. मृतक मांजरे हे यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालूक्यातील हरसुलचा रहिवाशी होते.

आता TRS नाही तर BRS, केसीआर यांची नव्या पक्षासह राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री

देशाच्या राष्ट्रीय राजकारणात आता आणखी एका प्रादेशिक पक्षाने उडी घेतली आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या पक्षाचे तेलंगणा राष्ट्र समितीचे (TRS) नाव बदलून भारत राष्ट्र समिती (BRS) केले आहे, पुढील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी संयुक्त आघाडी स्थापन करण्यासाठी केसीआर यांनी अनेक विरोधी नेत्यांची भेट घेतली होती. त्यानंतर टीआरएसचे नाव बदलून बीआरएस करण्याचा निर्णय महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. त्याची अधिकृत घोषणा बुधवारी करण्यात आली.

पीटीआयच्या म्हणण्यानुसार, तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि टीआरएस अध्यक्ष के चंद्रशेखर राव यापूर्वी त्यांच्या कॅम्प ऑफिस आणि अधिकृत निवासस्थानातून टीआरएस मुख्यालय तेलंगणा भवनात पोहोचले होते. वाटेत त्यांचे कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केले. पक्षाच्या राज्य कार्यकारिणी सदस्य आणि इतर निवडून आलेल्या प्रतिनिधींनी टीआरएस नवीन पक्षात विलीन करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर हे नवीन नाव पुढे आले आहे.

लग्नाला चालेल्या वऱ्हाडाची बस दरीत कोसळली, 25 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावामध्ये 45 ते 50 लोकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ असलेल्या रिखनीखाल-बिरोखल महामार्गावर ही घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ही बस लालढांगहून काडा तल्ला इथं जात होती. बिरोखाल येथील सीमडी बँडजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली.

गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने कोसळले घर, तिघांचा मृत्यू

दिल्लीनजीक असलेल्या गाझियाबाद येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी एका गॅसच्या सिलिंडरचा स्फोट झाल्याने घर कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर आणखी दोन जण खाली दाबले गेले असल्याची माहिती आहे.

ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला जाणार का शिंदेंच्या? ‘शिवसैनिक’ दिपाली सय्यद म्हणाल्या…

महाराष्ट्राच्या राजकारणात पहिल्यांदाच शिवसेनेचे दोन दसरा मेळावे रंगणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी येथे होणार आहे तर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचा मेळावा दादरच्या शिवाजी महाराज पार्कमध्ये पार पडणार आहे. शिवसेनेच्या या दोन्ही गटांकडून दसरा मेळाव्यासाठी मोठं शक्तीप्रदर्शन केलं गेलं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येनं लोक दसरा मेळाव्यासाठी मुंबईत दाखल झाले आहेत. या सगळ्यात शिवसेनेचे हे दोन गट एकत्र येण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्री आणि शिवसैनिक असलेल्या दीपाली सय्यद या कोणत्या मेळाव्याला हजेरी लावणार याकडे सर्वांचं लक्ष होतं. अखेर दिपाली सैय्यद यांनी या प्रश्नावर मौन सोडलं आहे.दीपाली विचारे नेमकं कोणाच्या मेळाव्याला हजेरी लावणार असा प्रश्न त्यांना विचारला असता त्यांनी महाराष्ट्र टाइम्सशी बोलताना सांगितलं, ‘मला आवडलं असतं दोन्ही मेळाव्यात जायला. 10 मिनिट इकडे 10 मिनिटं तिकडे. अशा दोन्ही मेळाव्यांना मी गेले असते. पण मी मस्तपैकी घरी बसून टीव्हीवर दोन फोन बाजूला ठेवून दोघांची भाषणं ऐकणार आहे’.

धार्मिक असंतुलन नजरेआड करून चालणार नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

नागपूरच्या रेशीमबाग मैदानात आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा (RSS) विजयादशमी सोहळा पार पडला. या सोहळ्यात सरसंघचालक मोहन भागवत यांनी स्वयंसेवकांचे प्रबोधन केले. देशात धर्माच्या आधारावर निर्माण होणारे लोकसंख्येचे असंतुलन यापुढे नजरेआड करून चालणार नाही, असे सरसंघचालकांनी म्हटले आहे. एखाद्या देशात लोकसंख्येचा असमतोल तयार होतो, तेव्हा त्या देशाच्या भौगोलिक सीमादेखील बदलून जातात, असा इशारा भागवत यांनी दिला आहे. देशात लोकसंख्या धोरण तयार व्हायला पाहिजे. ते सर्वांसाठी समान पद्धतीने लागू व्हावे, अशी मागणी मोहन भागवत यांनी केली आहे.

ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकावे लागण्याची खंत -बुमरा

पाठीच्या दुखापतीमुळे ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला मुकावे लागण्याची मला खंत आहे. मात्र, या स्पर्धेदरम्यान भारतीय संघाला माझे पूर्ण समर्थन असेल, असे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा मंगळवारी म्हणाला.जायबंदी बुमरा ऑस्ट्रेलियात होणाऱ्या आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषकाला मुकणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी अधिकृतरीत्या जाहीर केले होते. बुमराची सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये गणना केली जाते. त्यामुळे तो विश्वचषकात खेळू न शकणे भारतासाठी मोठा धक्का मानला जातो आहे.

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.