पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी, नव्या कोरोनाबाधितांची संख्या दोन आकड्यात
मागील 24 तासांत पुणे शहरात नव्याने कोरोनाबाधित आढळलेल्यांची संख्या 100 च्या खाली आली असून आज नव्याने 97 कोरोनाबाधितांची नोंद पुणे शहरात करण्यात आली आहे. तर 233 कोरोनाबाधितांवर यशस्वी उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.
ऑक्टोबरमध्ये कोरोनाचा कहर? बालकांना अधिक धोका, पुरेशी तयारीही नाही- गृह मंत्रालयाचा अहवाल
देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा धोका नीती आयोगानं व्यक्त केलाय. आता सोबतच देशाच्या गृह मंत्रालयाच्या अखत्यारित काम करणाऱ्या नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट च्या तज्ञांनी देखील एक चिंताजनक अहवाल सादर केला आहे.या अहवालानुसार ऑक्टोबर महिन्यात देशात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना सर्वाधिक धोका असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे की, जर लहान मुलं मोठ्या संख्येनं कोरोना संक्रमित झाले तर त्यांच्यासाठी बाल सुविधा सेवा जसं की डॉक्टर, मेडिकल स्टाफ, व्हेंटिलेटर आणि अॕम्बुलेंस अशा सुविधाही पुरेशा उपलब्ध नाहीत. हा अहवाल पंतप्रधान कार्यालयाला पाठवण्यात आला आहे.
महेश मांजरेकर यांची कॅन्सरवर मात , मुंबईतील रुग्णालयात पार पडली शस्त्रक्रिया
सिनेइंडस्ट्रीत असे बरेच कलाकार आहेत जे कॅन्सरवर मात करून घरी परतले आहेत. आता या यादीत प्रसिद्ध दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांचादेखील समावेश झाला आहे. महेश मांजरेकर यांची एक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या नुकतीच पार पडली.
महेश मांजरेकर यांना ब्लॅडर कॅन्सर झाल्याचे निदान झाले आहे. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्यास सांगितली होती. नुकतीच ही शस्त्रक्रिया मुंबईतील रुग्णालयात पार पडली आणि ते घरीदेखील परतले आहेत.
टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, १० दिवसांपूर्वी मुंबईतील एच.एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलमध्ये महेशची सर्जरी पार पडली. आता ते घरी आले असून पूर्णपणे फिट आहे. ऑपरेशन पूर्णपणे यशस्वी झाले असून घरी आल्यानंतर त्यांना बरे वाटत आहे.
चंद्रपूर अंधश्रध्दा प्रकरण : गावात तणावपूर्ण शांतता, 13 जणांना अटक
एकवीसाव्या शतकात विज्ञानाचा सूर्य तळपत असताना अंधश्रद्धेची झापड लावून जगणारा समाज आपल्या आजूबाजूलाच असल्याची धक्कादायक प्रचिती चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी (खुर्द) या गावात घडलेल्या घटनेने आली आहे.भानामती केल्याच्या संशयावरून वृद्ध महिला-पुरुषांना भर चौकात हातपाय बांधून गावकऱ्यांसमोर अमानुष मारहाण करण्यात आली. या मारहाणीत सात जण जखमी झाले. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेत आतापर्यंत १३ जणांना अटक करण्यात आली आहे. प्रशासनाच्या पुढाकाराने गावात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी समुपदेशन सुरू केले आहे. गावात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
‘…..तर सामूहिक जलसमाधी नक्की , जगण्यात अर्थ राहिला नाही…’
स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला इशारा दिला आहे.पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना भरीव मदत न मिळाल्यास सामूहिक जलसमाधीशिवाय पर्याय नाही, असा इशाराच शेट्टी यांनी राज्य सरकारला दिला आहे. केंद्र सरकारने गतवर्षी जाहीर केलेल्या मदतीवरही त्यांनी भाष्य केलं. तसेच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही निशाणा साधला. शेट्टी यांनी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता.
‘मी पॅकेज घोषित करणारा मुख्यमंत्री नाही, मी मदत करणारा आहे, असे म्हणत मुख्यमंत्र्यांनी नुसती घोषणाच केली, प्रत्यक्षात शेतकऱ्यांना जाहीर केलेली मदत अतिशय तुटपुंजी आहे, शेतकऱ्यांची केलेली ही चेष्टा आम्ही खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी यासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहिला नाही’, असे ठणकावत २३ ऑगस्ट रोजी पूरग्रस्त शेतकऱ्यांचा प्रचंड मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टींनी यापूर्वीच दिला होता. त्यानुसार, आज त्यांनी मोर्चा काढला.
पुण्याच्या लेकीची उत्तुंग भरारी, आदिती कटारेची
भारतीय वायुदलात निवड
भारतीय संरक्षण दलाच्या वायुसेनेत पिंपरी चिंचवडच्या शाहुनगरमधील आदिती कटारेची निवड झाली आहे.या कौतुकास्पद निर्णयाने पुणेकरांची मान अभिमानाने उंचावली आहे. एरोनॉटिकल इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स तुकडीच्या शॉर्ट सर्विस कमिशनसाठी देशभरातून ३१ जणांची निवड झाली. यात आदितीचा समावेश आहे.
आदितीचे शालेय शिक्षण चिंचवडच्या कमलनयन बजाज स्कूलमध्ये झाले असून दहावीला तिला ८९.८२ टक्के गुण मिळाले होते. सन २०१९ मध्ये तिने ८० टक्के गुणांसह कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगची पदवी मिळवली. गेली दोन वर्षे ती बार्कले बँकेत सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करीत आहे. लेफ्टनंट कर्नल प्रदीप ब्राह्मणकर (निवृत्त) यांच्या ॲपेक्स संस्थेतून आदितीने एस. एस. बी. मुलाखतीसाठीचे मार्गदर्शन घेतले. आदितीचे वडील कल्याण कटारे हे व्यावसायिक असून ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी खुल्या भागांचा पुरवठा करतात. आई मंजूषा गृहिणी आहेत. पाच सप्टेंबरपासून ती हैदराबादमधील प्रशिक्षणास सुरुवात करणार आहे.
टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे गोविंदा पथकांची निराशा
मागील वर्षापासून कोरोनाच्या संकटामुळे सर्वच सण साजरे करण्यावर निर्बंध आले आहेत. यंदाही हे निर्बंध कायम आहेत. काही गोष्टी सुरु झाल्या असल्यातरी निर्बंध अजूनही कायम आहेत.दरम्यान मुंबईकरांचा लाडका सण असणाऱ्या दहीहंडी सण साजरी करण्यावरही यंदा बंदी घातली आहे. मात्र टास्क फोर्स आणि मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे दहीहंडी मंडळांची निराशा झाली आहे. भाजप म्हणत आहे की आम्ही आंदोलन करू पण उत्सवाचं राजकारण होऊ नये अशी आपली भावना असल्याचे गोविंदा पथकांनी व्यक्त केली आहे. आम्हाला आमच्या जागेवरची मानाची दहीहंडी फोडण्यास परवानगी मिळावी. कोविड 19 संसर्गाची जाणीव ठेवूनच सुरक्षित दहीहंडी उत्सव आम्हाला आमच्या जागेवरच करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणीही दहीहंडी मंडळाने केली आहे.
SD Social Media
9850 60 3590