तुळजाभवानी मंदिरात दररोज 15 हजार भाविकांनाच दर्शन मिळणार, कोजागरी यात्रा रद्द

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून या उत्सव काळात दररोज केवळ 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. भाविकांना मंदिरात प्रवेश असेल मात्र त्यांना अभिषेक इतर विधींना परवानगी नाही. देवीचे महंत,सेवेकरी व मानकरी यांच्या उपस्थितीत देवीचे कुलाचार विधी संपन्न होणार आहेत.

नवरात्री काळात प्रशासनाने काढलेले नियम काय?
परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही. मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे.

यात्रा काळात कोरोना नियमांचे पालन बंधनकारक असून हॉटेल, दुकानात असलेल्या कर्मचारी यांचे 2 डोस झालेले असून त्याची यादी प्रशासनाला कळवावी लागणार आहे. उस्मानाबाद जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थान अध्यक्ष कौस्तुभ दिवेगावकर यांनी शारदीय नवरात्र उत्सव कसा साजरा करावा याबाबत लेखी आदेश काढले आहेत.

गर्दी होऊ नये व कोरोना नियमांचे पालन करावे यासाठी दररोज पहाटे 4 ते रात्री 10 या वेळेत फक्त 15 हजार भाविकांना प्रवेश दिला जाणार आहे. तुळजापूर येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येतात त्यात 15 हजार भाविकांची प्रवेश मर्यादा घातल्याने आगामी काळात गर्दीवर नियंत्रण आणणे प्रशासनासमोर एक मोठे आव्हान असणार असून यामुळे गोंधळ उडनार आहे.

तुळजाभवानी मंदीरात 65 वर्षाच्या वरील ज्येष्ठ नागरिक, दुर्धर आजारग्रस्त व्यक्ती, गरोदर स्त्रिया व 10 वर्षाखालील बालके यांना प्रवेश नसणार नाही याबाबत मंदिर व्यवस्थापनाने उपाययोजना कराव्यात तसेच मास्क,सॅनिटायझर वापरावे. मंदिराच्या परिसरातील 200 मीटरपर्यंत सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सर्व भाविकांनी प्रशासनाकडून केलेल्या सूचनांचे आणि नियमांचे पालन करुन सहकार्य करावे,असे आवाहन श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापक तथा तहसीलदार यांनी केले आहे.

नवरात्र उत्सवातील कोजागिरी पौर्णिमा रद्द करण्यात आली आहे तर या काळात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्ह्यात जिल्हा बंदी तर तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. पौर्णिमाला कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यासह देशभरातुन नागरिक तुळजापूर येथे आई तुळजाभवानी देवीचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. त्यामुळे या 3 दिवसात एकही भाविकाला जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.