पेट्रोल आणि डिझेलच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. इंधनाच्या दरात सतत वाढ होत असल्याने पेट्रोल आणि डिझेलचे दर हे विक्रमी पातळीवर पोहोचले आहेत. देशातील बहुतांश शहरात पेट्रोलची किंमत ही 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचा दर हा स्थिर आहे. रविवारसह आज सोमवारी (19 जुलै) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे देशांतर्गत तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवत आहेत.
जुलै महिन्यात सलग नऊ वेळा पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. तर डिझेलच्या किंमती या 5 वेळा वाढल्या आहेत. तर एकदा त्यात घट करण्यात आली आहे. यापूर्वी जून महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती तब्बल 16 दिवस वाढवण्यात आल्या होत्या. तर मे महिन्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती 16 दिवस वाढवण्यात आल्या. किरकोळ इंधन दरामधील ही दरवाढ 4 मे 2021 पासून सुरू झाली आहे. यापूर्वी 5 राज्यांमधील निवडणुकांच्या दरम्यान सलग 18 दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल झाला नव्हता.
देशभरातील सर्वात महाग पेट्रोल आणि डिझेल राजस्थानमधील गंगानगर आणि मध्य प्रदेशातील अनुपपूर या ठिकाणी आढळत आहे. गंगानगरमध्ये आज पेट्रोल 113.21 रुपये आणि डिझेल 103.15 रुपये दराने उपलब्ध आहे. तर अनूपपूरमध्ये आज पेट्रोलची किंमत 112.78 रुपये तर डिझेलची किंमत 101.15 रुपये प्रतिलिटर आहे.